Saturday, March 10, 2007

तेजस्विनी-शेवट

सुरेखा ताईंचा पुढचा पूर्ण आठवडा विविध सत्कार समारंभाला हजेरी लावण्यात गेला.लोक प्रतिनिधींना सरकारी नोकरी करता येत नसल्याने सुरेखा ताईंना नगरपालिका चालवत असलेली ती शाळा सोडावी लागणार होती. शाळेतल्या नोकरीचा राजीनामा देताना त्यांचे डोळे भरून आले होते..... शाळेने त्यांना निरोप द्यायचे ठरवले. सोबत झेड.पी. सदस्य झाल्याबद्दल सत्कारही करण्याचे योजिले होते. शाळेतला सत्कार समारंभ मोहिनी इंगळेच्या हस्ते झालेला होता. मोहिनीला निवडणुकीत हरल्याचे सोयर सुतकही नव्हते.वैद्य बुवांनी घरी बोलवून सौ. च्या हस्ते सुरेखाताईंची खणानारळाने ओटी भरली व तोंड भरून 'गरीबांच्या कामाला ये' असा आशीर्वाद देत त्यांचा सत्कार करून निरोप दिला.येत्या सोमवारपासून सभागृह भरणार होते. अजून चार दिवस बाकी होते, सुरेखाताईंची उत्सुकता शिगेला पोहचली होती.**********************************जिल्ह्यात एक एका सभासदाची जुळवा जुळव सुरू झाली. झेडपीच्या अध्यक्षपदासाठीचा उमेदवार कोण ह्यावर जोरदार चर्चा सुरू होती.जिल्ह्यातल्या ४ सर्कल मधून झेड.पी.च्या ४८ जागा होत्या. भुसावळ, यावल, चोपडा व जामनेर सर्कलमधून भा.ज.मो. व जनजागृती पक्षाची सरशी झालेली होती. बावीस जागांपैकी चौदा जागांवर युतीला यश आलेले होते. आयोगाने मान्य केल्यास सावद्यात फेरमतदान झाले असते ते वेगळेच.... तर जळगाव, एदलाबाद सर्कल मधून विकास आघाडीने बाजी मारली होती. सव्वीस जागांपैकी अठरा जागा त्यांनी कमावल्या होत्या. काही बंडखोर व काही अपक्ष उमेदवार तळ्यात मळ्यांत करीत होते. पण एकूण परिस्थिती पाहता विकास आघाडी पक्षाचाच उमेदवार अध्यक्ष पदी येण्याचे जवळपास नक्की होते. आघाडीतल्या असंतुष्टांनी विरोधात मतदान केल्यासच राजेंद्र गाजरेंचा पराभव झाला असता. तशी शक्यता मात्र धूसर होती.
संतोषभाऊंना फोडाफोडीचे राजकारण खेळायचे नव्हते. 'जसे पेरावे तसे उगवते' ह्या मताचे ते होते. जे यश पक्षाने कमावले ते अपेक्षेपेक्षा जास्त होते.... अचानक मिळालेल्या सत्तेपेक्षा विरोधी बाकांवर बसून विरोध करणे त्यांनी पसंत केले असते. ह्याच विचारसरणीचे भाजमो चे पक्षश्रेष्ठी होते. एकूण मिळालेल्या वीस जागांपैकी भाजमो च्या पाच तर जनजागृतीच्या पंधरा जागा होत्या.... उपाध्यक्ष पदासाठी वासूभाऊंसारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला बसवून इतर समित्यांच्या निवडींवर लक्ष देण्याचे बैठकीत ठरले.राजाभाऊ व देसाई साहेबांचा पंचायतींच्या कामकाजाचा अभ्यास कामी आला. भाजमो ने राजाभाऊंची खास वाखाणणी केली. असा अभ्यासक मिळाल्याने पक्षाची ताकद दुप्पट झाल्याचे मत बैठकीत पक्ष धुरंधरांनी नोंदवले.संतोषभाऊंना आपल्या जवळ असलेल्या हिऱ्यांची व्यवस्थित पारख होती..... राजाभाऊंची निरीक्षणे त्यांच्या सवयीची होती.....
विकास आघाडीत मात्र अचानक झालेल्या पराभवाच्या वादळाचे सावट सर्वदुर पसरले. राजेंद्र बोरसें विरुद्ध कधी नव्हे तो आवाज उठू लागलेला होता. अनेक समित्यांची अध्यक्षपदे ह्या वेळी पक्षातल्या विरोधकांना द्यावी लागणार असल्याची चिन्हे दिसत होती. खुद्द राजेंद्रचे अध्यक्षपद टिकते की नाही ह्याबद्दलच शंका कुशंका उपस्थित होऊ लागलेल्या होत्या.ह्याच पार्श्वभूमीवर संतोषभाऊंनी सावद्याच्या जागेवरून उठवलेला गदारोळ आयोगाने मान्य करीत सावद्याच्या जागेवर फेरमतदानाची संतोषभाऊंची मागणी मान्य केली व आघाडीवर अजून एक घाव पडला. मात्र जोवर सावद्याच्या जागेवर फेरमतदान होत नाही तोवर सभागृह भरवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला. संतोषभाऊंना व युतीला जिल्हाधिकाऱ्यांच्या ह्या निर्णयाने फारसा फरक पडणार नव्हता पण आघाडीत मात्र चलबिचल सुरू झाली. झेडपी अध्यक्षपदावरून व विविध समित्यांच्या अध्यक्षपदांवरून पक्षांतर्गत घोडेबाजाराला उत येणार होता.
देसाई साहेब व राजाभाऊंसारखे खंदे राजकीय अभ्यासक परिस्थितीवर बारीक नजर ठेवून होते. त्यांच्या मते आघाडीतल्या फक्त तीन मतांनी पारडे पालटणार होते. जामनेरचे महेश भिरूड गळ घातल्यास संतोषभाऊंसाठी वासुभाऊंना मत द्यायला तयार झाले असते. तोच प्रकार मुक्ताईनगरच्या अपक्ष उमेदवाराचा होता. बावीस मते जमत होती फक्त तीन मते वासुभाउंच्या पारड्यात पडली तर वासुभाऊंनी ह्या उतार वयांत उपाध्यक्षाऐवजी अध्यक्ष पदाचे स्थान ग्रहण केले असते. पण त्यासाठी कुठलीही तडजोड करायला जनजागृतीचे व भाजमो चे पक्षधुरीणी अजिबात तयार नव्हते. स्वच्छ राजकारण करणे हेच संतोषभाऊंचे प्रमुख ध्येय होते.*************************************सावद्यात उमेदवारांना प्रचार करता येणार नव्हता परंतू मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्यास हरकत नव्हती. जनजागृती पक्षाने ह्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला व भाजमोच्या कार्यकर्त्यांचा ताफा पथनाट्ये तर जनजागृतीच्या महिलांनी सामूहिक हळदीकुंकू वगैरे समारंभ आयोजीत करीत जोरदार मुसंडी मारली.आयोगाच्या अधिकाऱ्यांचे बारकाईने लक्ष सर्व प्रकारांकडे असल्याने आघाडी ज्या विषयांत पारंगत होती त्यात तिला चक्क अपयश आले. दारूच्या बाटल्या व पैशांची पाकिटे वाटण्याआधीच लपवून ठेवण्याची वेळ त्यांच्या कार्यकर्त्यांवर आली.माळी वहिनींचा विजय म्हणजे फक्त एक औपचारिकता राहून गेली.जिल्ह्यातले युतीचे बळ आणखी एका जागेने वाढले.आघाडीतली चलबिचल वेगळेच रूप घेऊ लागली.**************************************बाहेर पाखरांची किलबिल चालू झाली... गायींच्या गोठ्यातून हंबरड्याचा आवाज मोठा व्हायला लागला.गल्लीच्या कोपऱ्यावरच्या मंदिरातून काकड आरतीचे स्वर घुमू लागले...... हळूहळू यावल गांवाला जाग येत होती.सूर्य उगवायला अजून बराच वेळ होता तरीही लोकांची प्रात:कालीन कामे सुरू झालेली होती. रोजच्या सारखाच हाही दिवस उजाडत होता.पण सुरेखाताईंसाठी मात्र ह्या दिवसाचे विशेष महत्त्व होते.आज त्यांना ह्या घराशी जन्मभराचे नाते जोडून आठ वर्षे पूर्ण झाली होती......आणी आजच सभागृहात झेड.पी. सभासद म्हणून त्या शपथही ग्रहण करणार होत्या.....गाढ झोपलेल्या राजाभाऊंवर एकवार नजर फिरवत त्या बिछान्यातून उठल्या, देवघरात जाऊन देवाला नमन करीत त्यांनी मागल्या पडवीचे दार उघडले. त्यांना बघताच कृष्णा अजूनच जोरजोरात हंबरायला लागली. तिच्या पुढे चाऱ्याची चळत व पाण्याची बादली ठेवून त्यांनी तिच्या पाठीवरून ममतेने हात फिरवला.....देवा पाठोपाठ कृष्णा गायीचे दर्शन घेतल्या खेरीज त्यांच्या दिवसाला सुरुवात होत नसे.सकाळची सर्व कामे आटोपून होईपर्यंत राजाभाऊ कॉलेजला जायला तयार झाले होते. "आज काय आणू ?" हळूच त्यांनी विचारले.गोंधळात पडल्यासारखा चेहरा करीत त्या म्हणाल्या, "कशाबद्दल ? शपथ ग्रहण करणार म्हणून का ?"अवखळपणे हसत राजाभाऊ म्हणाले,"नव्हे... आम्हाला आजन्म कैदी बनवल्याबद्दल"सुरेखा ताईंच्या स्मितहास्या सोबत त्यांनी घर सोडले....
सुरेखा ताईंना दुपारची शाळा असे. बाराच्या ठोक्याला त्या घर सोडत त्यापूर्वी बालवाडीतल्या वैशुला त्या घेऊन येत. वैशुला आजी भरवत असताना त्यांना निघावे लागे. आज पासूनचा दिनक्रम वेगळा असणार होता. सकाळी दहाला वैशुला बालवाडीत सोडून त्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयांत जाणार होत्या. सभागृहाच्या कामकाजाला सकाळी साडे दहाला सुरुवात होणार होती. दुपारी एकला सभागृह संपताच त्या घरी जाणार होत्या. काही दिवस हाच दिनक्रम ठेवून मग एखादी अंगणवाडी शिक्षिकेची नोकरी करायचा विचार त्यांनी केला होता. आपल्या शिक्षणाचा फायदा समाजाला व्हायलाच हवा ह्या राजाभाऊंच्या मतांशी त्या सहमत होत्या.
जिल्हापंचायतीच्या कार्यालयात त्या सव्वा दहाच्या सुमारास पोहचल्या तेव्हा एकही सभासद हजर नव्हता. गेल्या गेल्याच त्यांची मोकाशी नांवाच्या कारकुनाशी ओळख झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव श्री. नारायण अत्तरदेंचा तो सचिव होता. बरीचशी महत्त्वाच्या फायली ज्यांच्यावर शेवटचे हात फिरवावे लागत, त्या मोकाशींकडेच येत. मोकाशींनी तोंड भरून सुरेखाताईंचे कौतुक केले..."राजाभाऊ जाधवांना मी ओळखतो ताई.... आपले भाषणही ऐकले आहेच, तुम्हाला आठवत नाही पण आंबेगावहून आपली बदली येथे झाली तेव्हा त्या फाइल वर मीच काम केले होते." मोकाशींनी आठवणी सांगितल्या."हो, मी लग्नापूर्वी आंबेगावलाच शिक्षिका म्हणून होते....पण मी बदलीच्या कामानिमित्त झेड.पी. त मात्र कधी आले नव्हते" त्यांनी आठ वर्षापूर्वीच्या त्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करीत म्हटले.इतक्यात भराडे बाई व माळी वहिनी तेथे आल्या.सगळ्या जणी मग सभागृहाकडे कुच करू लागल्या. एका नव्या युगांत सुरेखाताईंचा प्रवेश होत होता......
एक एक करीत सभासद सभागृहात दाखल होत होते. जिल्हा परिषदेचे सदस्य, ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध समित्या व उपसमित्यांचे सदस्य हे एकत्रच जिल्हा परिषदेच्या कामकाजाखाली मोडत. ग्रामपंचायत व झेड.पी.च्या सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा तर समित्यांच्या सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाल असे सरकारने ठरवून दिले होते. झेड.पी.चे सदस्य जिल्हा पंचायतीच्या अख्यतारीत येत असलेल्या कामकाजांवर प्रतिनिधित्व करीत तर ग्राम पंचायतीच्या कामांवर त्यांचे सदस्य काम करीत.प्रत्येक समितीवर एक सभापती, एक उपसभापती, तीन झेडपी सदस्य, तिघे ग्रामपंचायतीचे सदस्य व तीन नगरपालिकेचे सदस्य काम बघत.समितीकडे कामकाज जास्त असल्यास उपसमीती नेमली जाई. नगरपालिकेचे सदस्य स्वत:च्या वेगळ्या निवडणुकांतून निवडून येत व त्यांचे अधिकार मर्यादित असले तरी त्यांच्या अनुमतीखेरीज कामे पुढे सरकत नव्हती. झेड.पी., ग्राम पंचायत व नगरपालिका ह्या तिघी स्वायत्त संस्था होत्या व गावागावातून राज्य व केंद्र सरकारच्या योजना राबवण्यात त्यांना मदत करीत होत्या. राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या झेड.पी व ग्रामपंचायतींच्या सभासदांना पगार व भत्ते राज्य सरकार देई तर नगरपालिकेच्या सभासदांना नगरपरिषद देई.वरचा मलिदा मात्र त्यांना स्वत:ची अक्कल लढवूनच कमावावा लागे.......
सुरुवातीसच ओळख समारंभ पार पडला त्यानंतर लगेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्तरदेंनी वयोवृद्ध वासुभाऊंना शपथ ग्रहण करायला व्यासपीठावर बोलावले. इतरांनी जेष्ठते नुसार एका पाठोपाठ एक स्वत:च्या डायस समोरच उभे राहून शपथ घ्यायची होती.......
उंच छत असलेल्या भव्य सभागृहात एक आवाज अत्यंत आत्मविश्वासाने उमटला.......
"मी, सौभाग्यवती सुरेखा राजेश्वर जाधव, ईश्वरास साक्ष ठेवून शपथ घेते की.........
'तेजस्विनी'च्या एका नव्या पर्वाच्या प्रथम अध्यायाला सुरुवात झालेली होती.
~समाप्त~

No comments: