Wednesday, December 6, 2006

ठाणे कट्टा- अनुभवकथनठाणे कट्ट्यावर प्रत्येक उपस्थित मनोगतीने आपला आविष्कार प्रकट केला. मी माझ्या कलकत्त्याच्या रहवासातले अनुभवकथन काहीसे अशा रितीने केले..... शब्द न् शब्द आठवत नसला तरी कथन असे होते-
*******************
आपल्या जवळ जे मुबलक प्रमाणात उपलब्ध असते त्याची किंमत आपणास कळत नसते हा अनुभव मला महाराष्ट्र व मराठी माणसे सोडल्यावर मिळाला.
जेथे पूर्वी नोकरी करीत असे तेथून 'कलकत्त्याचे कार्यालय' उघडण्याचा व सुरू करण्याचा आदेश हातात पडला..... बदली झाल्याक्षणी कलकत्त्याची काही जुजबी माहिती काढली व बाड बिस्तर घेऊन मार्गस्थ झालो. कलकत्त्याचा कर्मचारी (जो आधीच नेमला गेला होता) वेळेवर हावडा स्थानकावर घ्यायला आलाच नाही. ५/६ तास वाट बघून शेवटी जायचे ठरवले.
'तुला कुठे काही समस्या आल्यास हाजरा रोड वरील महाराष्ट्र मंडळात जा' असे मामांनी निघताना सांगितल्याचे एकदम आठवले. कसे बसे एकदाचे सामान टॅक्सीत कोंबले व हाजरा रोड वरील महाराष्ट्र निवासात पोहचलो....
टॅक्सीतून सामान उतरवत असतानाच दारवानाने प्रश्न केला "क्या साब ट्रान्स्फर हो गया है क्या ?"
"अरे वा तुला कसे कळले ?"
"सब मराठी लोग ट्रान्स्फर होने के बाद इधर ही आते है !" ( चला मीच एकटा मूर्ख ठरलेलो नव्हतो तर !)
व्यवस्थापक श्री. प्रभाकर डोळ्यांकडे जाऊन उभा राहिलो-
"खोली ? एप्रिल महिन्यात सगळे बुक असते हो कुळकर्णी "
"काहीतरी करा आता, मी तर सगळे सामान घेऊनच आलो आहे."
"डॉर्मेट्रीत सोय करतो मग दोन दिवसात बघू काय करायचे ते !"
स्थिरस्थावर झाल्यावर व भाड्याने घर घेतल्यावर नियमित महाराष्ट्र निवासात जाऊ लागलो.
तेथल्या वयस्कर मंडळींनी आस्थेने विचारपूस करीत ओळख वाढवली. सम वयस्क मंडळीही येता जाता स्मितहास्य देत असत. हळू हळू मी कलकत्त्यात रुळू लागलो होतो.....
अचानक एक दिवस मला अपघात झाला व माणुसकीचा प्रत्यय ह्या नवख्या शहरात आला. फक्त महाराष्ट्र निवास हे उद्गार तोंडातून बाहेर पडताच महाराष्ट्र निवास व मंडळाच्या सदस्यांनी जी मदत केली ती आयुष्यात न विसरण्याजोगी आहे. इस्पितळात दोन वेळचा डबा ते औषधोपचार व सर्व प्रकारची मदत ह्या अनोळखी मराठी मंडळींनी केली.

आज मी कलकत्त्याच्या ह्याच महाराष्ट्र मंडळाचा आजीव सदस्य आहे. नंतरच्या काळात युवा सचिव (युथ सेक्रेटरी) होतो, एकांकिका स्पर्धेत एकांकिका दिग्दर्शित केली, गणेशोत्सवात सक्रिय सहभाग होताच.... व मुंबईला परते पर्यंत असंख्य नाती जोडली गेलीत. आजही ही नाती टिकून आहेत व मैत्री दृढ झालेली आहे !

कोणाची कलकत्त्याला बदली झाल्यास हाजरा रोड वरचे महाराष्ट्र निवास व श्री. प्रभाकरराव डोळे हे नांव लक्षात ठेवा..... बाकीची सोय आपोआप होईल !

नोकरी - एक प्रवास १

अभियांत्रिकी विद्यालयाची शेवटच्या वर्षाची परीक्षा झाल्या झाल्या जळगांवला ओळखीने एका छोट्या इंजिनियरिंग फर्म मध्ये सर्व्हिस इंजि. ची तात्पुरती नोकरी मिळाली. बरोबरीचे बरेचसे मित्र मुंबईचे होते. त्यांनी परीक्षा झाल्या झाल्याच घरच्या वाटा धरलेल्या होत्या. भुसावळसारख्या गावात 'टाईम्स' दुपारच्या गाडीने येई. संध्याकाळी घरी जाताना रेल्वेच्या वाचनालयात जाऊन नोकरीच्या संधी चाळत बसायचा उद्योग मागे लागला! - एका महिन्यातच १०/१२ ठिकाणी दगड टाकले होते (खडे लहान वाटतात) त्यातले काही भिरभिरत लागले मुंबईतच व एका मुहूर्तावर, ४ दिवसांत येतो असा निरोप जळगांवला कळवून सटकलो !
जूनच्या २० ला एक मुलाखत होती.... ती यथातथाच गेली. जुलैच्या ५ ला दुसरी होती - मुंबई सेंट्रलला मराठा मंदिरच्या मागेच वाय.एम. सी.ए.च्या प्रशस्त कॉन्फ़रन्स हॉल मध्ये मुलाखतीला बोलावले होते. एक प्रेमळ आजोबां सारखा दिसणारा,मराठी बोलणारा पण मद्रासी माणूस; त्याच्या बाजूला एक जपानी माणूस व शेवटी त्या जपान्या इतकाच बुटका पण हिटलर टाइपच्या मिशा व चेहरा असलेला एक मानव म्हणण्यासारखा प्राणी बसलेला होता. माझी मुलाखत सुरू होण्या आधी एका टिपटाप दिसणाऱ्या तरूण व हसतमुख चेहऱ्याच्या मुलाने (मुलीने नाही.... दुर्दैव!) मुलाखतीला आलेल्यांचे स्वागत केले.
- मला एक समजत नाही; इंजिनियर्स चे व मुलींचे जन्मता वाकडे असते का ? महाविद्यालयात सगळीकडे रखरखीत वाळवंट... खाजगी महाविद्यालयांना परवानगी मिळाल्यानंतर आमची प्रथम बॅच - आमच्या बॅचमधील ३ कोर्सना मिळून १९८ मुलांमागे फक्त ४ मूली - त्यातल्या दोघी अगदी बाळबोध वळणाच्या व लता मंगेशकर टाइप दोन वेण्या घालणाऱ्या. उरलेल्या दोघींपैकी एक बोदवड गावाहून, वेळ मिळाला की यायची.... ती तशी दिसायला बरी होती पण ड्फ्फर असावी.... पहिल्या वर्षी तिला मिळाला डच्चू; तो तीच्या वाडवडिलांना पचनी न पडल्याने तिचे नांवच काढून टाकले कॉलेजमधून - आम्हीही म्हटले जाऊ द्या - नाहीतरी आठवड्यातले दोन दिवस येणार त्यासाठी उरलेले ४ दिवस कोण डोकं पिकवेल ? चौथी होती केरळची -दिवसां दिसली असती उजेडात; मावळतीला कठीण परिस्थिती झाली असती- हे सर्व बघून महाविद्यालय म्हणजे हिरवळ व त्यावर बागडणारी फुलपाखरे हे समीकरण माझ्या गांवी कधीच नव्हते...... कॉलेजच्या एका बाजूला झेड.टी.एस. म्हणजे रेल्वेचे प्रशिक्षण केंद्र- दुसरीकडे आर.पी. डी. म्हणजे मिल्ट्रीवाल्यांचा कसलातरी डेपो. मागे विस्तीर्ण शेते व रेल्वे यार्ड तर चौथ्या बाजूला रेल्वेची खांडव्याला जाणारी रेल्वेलाइन-लाइन मारायची ती कोणावर हा एक प्रश्नच होता...असो..
'विश्वनाथ' नांव कळले त्या हसतमुख चेहऱ्याच्या मुलाचे - बघता क्षणी आवडेल असे व्यक्तिमत्त्व - त्याला बघून मुलाखतीचे दडपण जरा कमी झालेले. माझा स्वाक्षरी केलेला फॉर्म हातात पडल्यावर त्याने मराठीत काहीतरी विचारले - मग उरला सूरलेला फॉर्मलपणा नाहीसा झाला.... खाजगीत विचारावे अश्या सुरात 'किती जण येऊन गेले' हा प्रश्न भीत भीत (त्याला नाही - संख्येला) मी विचारला - 'अजून चालू झाले नाहीत इंटरव्ह्यूज्' ..... मी खूश ! आजूबाजूला काही हुशार काही ड्फ्फर चेहरे....एक-दोघे बोलबच्चन - ते सगळी कडून पिटून आलेले मोहरे असावेत-बोलण्यावरून दोनचार ठिकाणच्या नोकऱ्या त्यांनी नाकारल्याचे जाणवत होते. माझे टेन्शन परत वर जायला लागले - एकतर मराठी मीडियमचा पोऱ्या, त्यात भुसावळ सारख्या गांवातला ! नशीब 'विश्वनाथ' च्या जागी फाकडू पोरगी नव्हती नाही तर तिला इम्प्रेस करून करून त्यांनी माझ्यासारख्यांची फ्या..फ्या च उडवली असती.
विचारांच्या तंद्रीत असताना खांद्याला हलकासा स्पर्श जाणवला... तो मुलगा मला आंत जायला खुणावत होता.... धीरगंभीर चेहऱ्याने मी धीर न सोडता मध्ये गेलो. - 'बस !' आजोबा चक्क मराठीत बोलले ! पुढे एक एक करीत 'हिटलर' प्रश्न विचारत होता...... एकाही प्रश्नावर गाडी अडकली नव्हती व 'कळीचा' प्रश्न धाडकन समोर आला - ज्या प्रॉडक्ट्स मध्ये ती कंपनी काम करीत होती तिच्यावर आधारीत उत्पादने मी जळगांवला हाताळलेली होती. त्या प्रश्नाचे विचारपूर्वक उत्तर दिल्यावर 'हिटलर' जरा मवाळला.... "व्हेन वुड यू लाइक टू जॉईन ?" "टुडे ?" माझ्या उत्तरावर जपानी खळखळून हसला- "रहोगे कहाँ ?" हिट्लर ! "मामा है मेरा-वो पार्लामे रेहता है ।" बहुदा हिटलराला भारतातल्या पोरांच्या बेकारीचे प्रदर्शन जपान्यापुढे करायचे नसावे..... "ठीक है; बाहर जाकर बैठो !"....... मी बाहेर !
दोन चार पोरं मध्ये जाऊन फटाफट परत आली.. एक बोलबच्चन मध्ये गेला तो बराच वेळ अडकलेला होता.... दुसरा 'विश्वनाथ' वर फणफणायला लागला. मी 'विश्वनाथ'ला 'जरा जाऊन येतो' म्हटलं व जिन्याकडे सरकलो "मी.कुळकर्णी; ह्या बाजूला-" करीत त्याने बाथरुमची वाट दाखवायचा प्रयत्न केला - पण माझ्या हातातले सिगारेटचे पाकीट त्याला दाखवत मी आलोच चा इशारा करीत सटकलो व दोन मिनिटांतच परतलो - दुसरा बोलबच्चन मध्ये होता.
......थोड्या वेळाने विश्वनाथ मध्ये जाऊन आला... आल्यावर त्याच्या हातात एक व्हिजीटींग कार्ड होते. माझ्या हातात ते कार्ड कोंबून त्याने "उद्या ह्या पत्त्यावर सकाळी ९.३० ला या" असे मोघम सांगितले - कार्ड घेऊन मी रेंगाळतच खाली जायला निघालो....
नोकरी मिळाली की नाही हे कळलेलेच नव्हते! कार्डावर निळ्या अक्षरांत "जे. मित्रा & ब्र. प्रा.लि."हा मुलाखत पत्रावरचाच ठसा व पी. सुब्रमण्यम - मॅनेजर ऍडमिनीसीस्ट्रेशन - हे नांव!! नांव, चेहरा व हुद्द्यावरून आजोबांचे हे कार्ड असावे असे ताडले. कवळी बिल्डिंग, एस.के.बोले रोड- दादर प.- बॉम्बे २८ असा पत्ता !!! संभ्रमातच मामीला काय उत्तर द्यायचे ह्याचा विचार करीत मी मुंबई सेंट्रल स्टेशन ची वाट धरली -
माधव कुळकर्णी.

नोकरी- एक प्रवास २

गाडीत बसल्यावर अचानक ट्यूब पेटली - रिटर्न तिकीट आहेच तर दादरला उतरून जागा बघून घेऊ म्हणजे सकाळी गडबडीत उशीर झाला तरी शोधण्यात वेळ जाऊ नये. कबूतर खाना ते पोर्तुगीज चर्च च्या रस्त्यावर मधोमध ही बिल्डिंग असल्याचे विश्वनाथ बोलल्याचे आठवत होतं. चालतच शोध घेता घेता शेवटी एकदाची दुमजली इमारत सापडली - शुद्ध चाळं !....- आधी विश्वासच बसेना - आपण नोकरीची स्वप्न पाहतो तेंव्हा आपले कार्यालय, तेथील वातावरण, आजू बाजूचे वातावरण हे सगळे कसे चित्रासारखे डोळ्यासमोर उभे राहते- जो बँकेत नोकरीस लागतो त्याच्या नजरेसमोर बँकेचे चित्र, जो इस्पितळात नोकरी धरतो त्याच्या नजरेसमोर ते चित्र..... मी एखाद्या बऱ्यापैकी सर्व्हिस इंडस्ट्रीचे स्वप्न मनांत बाळगलेले होते. - पहिल्या मजल्यावर जाणारा जिना चढत - मनांत म्हटले, 'अजून कुठे आपल्याला नक्की माहित आहे की, ह्याच कार्यालयात आपल्याला नोकरी करायचीय ?' परत फिरलो..... घरी मामींनी विचारले 'काय झाले ?''उद्या 2nd Interview घेतील बहुतेक.' मी उगीचच भाव खाल्ला ! 'दोनदोन-तीनतीन वेळा बोलावतात मेले, एकदा काय ते विचारून आटोपून टाकायचे !' मामींचा सात्त्विक संताप उफाळून आला.
दुसऱ्या दिवशी कालचेच कपडे न घालता वेगळा ड्रेस चढवून मी निघालो. जागा पाहून ठेवलेली त्यामुळे प्रॉब्लेम झालाच नाही. गेल्यावर अजून एक धक्का..... जागेला टाळे ! मी कपाळावर हात मारला! शेजारची लहान मुले उघडी नागडी फिरत होती.... बायका मंडळींचा टिपीकल चाळीतल्या सारखा आरडा ओरडा चालू होता... मध्येच एक माणूस गॅलरीत येऊन पचकन खाली थुंकून परत घरात जायचा.... ज्या गाळ्यात हे ऑफिस (?) होते तो गाळा जिन्याला लागूनच होता; जिन्यावरून अर्ध्या चड्डीत वर-खाली करणारी काही पुरूष मंडळी अगदी नमुनेदार बेवडी दिसत होती.... तेव्हढ्यात 'आजोबा' आले. त्यांच्या तुरुतुरु चालीवरून त्यांना यायला उशीर झाला असावा हे कळतच होते. वर आल्या आल्या अगदी जुन्या ओळखीचे हास्य त्यांच्या चेहऱ्यावर पसरले. चाव्यांचा एक जुडगा माझ्याकडे देत- व बंद दाराच्या शटर कडे बोट दाखवत त्यांनी मला कुलूप उघडण्याची खूण केली....... व माझ्या पहिल्या नोकरीचा प्रथम दिवस - दुकानासारखे दिसणारे ऑफिसचे शटर वर उघडून झाला !
तसे म्हटल्यास मी जळगांवला नोकरी वजा काम करीत होतोच; पण जेथे जायचो त्या गृहस्थांनी पगार वगैरे अश्या फॉर्मल गोष्टी कधी केल्याच नाहीत. रेल्वेचा पास काढून द्यायचे - अधून मधून खर्चाला पैसे द्यायचे; मन लावून काम शिकवायचे (हेच माझ्यासाठी महत्त्वाचे होते) व आपुलकीने वागायचे. 'इंस्टकॉन इंजिनियर्स' हे काही जळगावातले मोठं खटलं नव्हतं, पण माझ्या सारख्या कित्येक गरजूंना व्यवस्थित मार्गदर्शन करून स्वतःच्या पायावर उभे करण्याचे पुण्य त्यांनी पदरांत सामावून घेतलेले होते. ह्या दुकान वजा ऑफिसचे शटर वर करताना मला माहितही नव्हते की, जळगावात त्यांच्या कडे दुरुस्त केलेली काही इक्वीपमेंट्स माझ्या व्यावसायिक जीवनाची कवाडे सताड उघडी करतील.
सुब्रमण्यम साहेबांचे वय वाटत होते त्याहून बरेच कमी होते. हार्डली ४५चे ते गृहस्थ जरा पोक्त वाटत म्हणून मी मनांतल्या मनांत त्यांना आजोबा ठरवून मोकळा झालो होतो. गप्पा सुरू झाल्या.... श्री. सुब्रमण्यम साहेब दिल्लीला असत. माटुंग्यात त्यांचे आतापर्यंतचे आयुष्य गेलेले. विश्वनाथन हा त्यांच्या सख्ख्या बहिणीचा मुलगा ! काही कामासाठी बाहेर गेलेला होता तो तासाभरात येणार होता. आधीचे ऑफिस वरळीला होते ते मित्रा साहेबांच्या जावयाने लाटले - म्हणून ही व्यवस्था तातडीने व तात्पुरती करावी लागलेली होती. हिटलरचे खरे नांव 'पवन' आहे व तोच माझा डायरेक्ट बॉस असणार होता - सर्व्हिस मॅनेजर ! मी मोठा आवंढा गिळला..... मनात म्हटले ह्या तुफानाचे नांव पवन कोणी ठेवले असावे ? माझ्या बरोबर अजून एकाची नियुक्ती झालेली होती - त्याचे नांव प्रसाद कुळकर्णी होते - तो येण्यातच होता..... विश्वनाथन वर तणफण करणारा दुसरा बोलबच्चन अवतरला- माहित नाही का..... पण ज्याच्याशी पहिल्या भेटीत माझे सुर जुळत नाहीत त्याच्याशी जन्मभर ते तसेच राहतात. आमच्या दोघांच्या नशिबाने त्याने दीड महिन्यातच कंपनी सोडली ! माझा पगार रुपये ९००/- ठरवण्यात आलेला होता - व ८ जुलैला मला प्रशिक्षणासाठी दिल्लीला प्रस्थान करायचे होते...... ह्या सगळ्या गप्पा मारीत सुब्रमण्यम साहेबांनी तीनदा चहा मागून प्यायले. चहाची गंमत तर न्यारीच होती... टेबलावरचा फोन उचलून ते चहावाल्याला फोन करीत - दहा मिनिटे झाल्यावर परत रिमाइंडर देत - तेंव्हा कुठे चहा येई. तोही स्टीलच्या वाटीत उपड्या ग्लास मध्ये - एकुलता एक. मला गंमत वाटली.... एक चहा - पिणारे सुरुवातीला आम्ही दोघे - नंतर २ चहा - तिघे ! मग ३ मध्ये विश्वनाथ आल्यावर चौघे.... ! पण फोन मात्र ७/८ गेले असतील....
मी व प्रसादने सुब्रमण्यम साहेबांकडूनच पैसे घेऊन मुंबई सेंट्रलला जाऊन राजधानीचे चेअर कारचे तिकीट काढले - तेथेच प्रसादने मला सांगून टाकले- 'इथला सीन काही ठीक नाही; मला नाही वाटत मी जास्त दिवस येथे टिकेन' 'मग तू त्यांना सांगत का नाहीस ?' 'अरे, मला दोन महिन्यांनी जरा बऱ्यापैकी जॉब मिळणार आहे. तोवर टाइम पास होईल'..... जेथे दात आहे तेथे चणे नाही व जेथे चणे आहेत तेथे दात नाहीत !
दिल्लीला प्रथमच जात होतो. पटकन भुसावळला जाऊन उरलेले कपडे घेऊन यावे लागणार होते. विचार करायलाही उसंत मिळत नव्हती. दिल्लीला जायच्या आधी श्री. सुब्रमण्यम कडून प्रॉडक्ट्स ची काही माहिती मिळवली - थोडा अभ्यास केला व प्रशिक्षणासाठी दिल्लीला रवाना झालो..... रात्रभर चेअर कार मध्ये डोळ्याला डोळा लागलेला नव्हता..... एक जीवन - एक प्रवास सुरू केल्याची जाणीव मनात होती, हा प्रवास पूर्ण होईल की नाही त्याची धास्ती मनांत होती !
*************************************
आज जवळपास २० वर्षे झाली. हा अभ्यास, हा प्रवास अजूनही चालूच आहे.... मधल्या काळात बऱ्याच घडामोडी घडून गेल्या - नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला - नोकरीत काही गमतीदार घटना घडल्या, काही काळजाला घरे पाडणाऱ्या घटना !- कुठे अंगावर शहारे आणणारे अपघात झाले तर दर्शनासारखी पत्नी मिळाली..... नोकरीत सुरू केलेले हे व्यस्त जीवन कुठे जाऊन थांबेल, देव जाणे- पण नोकरीतला तो प्रवास मात्र मनांत कायम घर करून राहिलाय !
श्री. सुब्रमण्यम, श्री.पवन, मॅथ्यु, विशू, अब्राहम (माझा व्यवसाय भागीदार) मिलिंद जोशी इ. माझे जुने सहकारी आजही माझ्या ह्या प्रवासातले सहप्रवासी आहेत हे गेल्या जन्माचे ऋणानुबंध तर नव्हेत ?

चूल आणी मूल

चूल आणी मूल हा विषय आहे माझ्या आजीच्या वेळचा !

माझी आजी ठार बहिरी(७५% वैगुण्य) होती.... फक्त ओरडलेलेच काय ते कळायचे !
मला चांगलेच आठवते, लहानपणी आम्ही मुद्दाम काहीही न बोलता फक्त तोंड हालवायचो, मग आजी पण 'काय? काय?' करींत एक हात कानामागे कर्ण्यासारखा ठेवून ऐकण्याचा प्रयत्न करायची. मामांची पोरं, मावशीची पोरं व मी जबरदस्त हसायचो. वाटायचे कशी आजीची गंमत केली !
मोठे झाल्यावर कळले की तीला सगळं समजायचे - आईने सांगितले -
"तीला माहित असायचे की, तुम्ही पोरं तीची टेर खेचताहात ते !"
"कसें काय ?"
आई:" ती म्हणायची - एक पोरं आपलं ओठ हालवतं व मी कानावर हात नेला की बाकीची फिदीफिदी करतात - त्यांना मजा वाटते म्हणून मी पण ढोंग करते".

मला साधं वरणं खूप आवडायचे व जेव्हा फोडणी दिलेले वरणं केले असेल तेव्हा माझा थयथयाट पूर्ण वाडीला ऐकू जायचा (आता सोसायटीला ऐकू जातो) मग हळूच मला सांगायची,
"मी शेजारून तुझ्यासाठी वरण आणते थांब" पदराखालून फोडणी दिलेल्या वरणाची वाटी नेऊन चक्कर मारून परत यायची व मी मात्र मिटक्या मारीत ते वरण खायचो....
हा समजूतदार पणा चूल आणी मूल सांभाळूनच आलेला !
ह्या बाईने बहिरी असून संसार केला! -
४ मुलांना जन्म दिला व व्यवस्थित वाढवले !! एकही वाया गेला नाही !!!
हे यश त्यांचे की तीचे ? कुणाचेही असो -

"चूल आणी मूल" ह्या विषयावर बोलायचे झाल्यास तीचा अजून एक किस्सा आठवतो....
माझी आई सांगते- तीच्या लहानपणी तीची आई वारली, ती जन्माने बहिरी नव्हती,(म्हणून ती बोलू शकत होती )
८/९ वर्षांची असतांना कानात सारखी खाज येते म्हणून तीच्या आत्याने थोडे जास्त गरम तेल दोन्ही कानात टाकले ! टाकतांना 'लहान मूल आहे - रडणारच' म्हणून लक्ष न देता तसेंच सोडले - जेव्हा आजीचे वडील घरी आले व तीचे रडणे थांबेना तेव्हा वैद्याकडे नेल्यावर झालेला प्रकार कळला तो पर्यंत उशीर झाला होता.
पुढे आत्याचे लग्न झाले - आजीचे वडील व आजी एकटे राहायला लागले तेव्हा ती स्वयंपाक करून, घर सांभाळून विविध कला शिकली !
शाळेत जाण्याचा प्रश्नच नव्हता ! एक तर चिंचणीत शाळा नाही- पालघर लांब पडणार...
न्यायला आणायला कुणी नाही त्यात ही ठार बहिरी !
तरी मी माझ्या लहानपणी तीला वर्तमानपत्र वाचतांना पाहिले आहे.
- हे कसें शक्य झाले ह्या गोष्टींचे अजूनही नवल वाटते. नुसते मलाच नाही तर माझे सर्वांत मोठे मामा (जे आता हयांत नाहीत) त्यांनाही आठवत नाही ती वाचायला केव्हा शिकली ते !
चूल आणी मूल सांभाळणारी ठार बहिरी बाई वर्तमानपत्र वाचते हे काही मंडळींच्या पचनी पडणार नाही !

नुसता संसार केला असता तर गोष्ट वेगळी होती....
माझे आजोबा मुंबईतल्या फोर्ट भागात स्टॅंडर्ड चाटर्ड बॅंकेत नोकरी वर होते व राहायचे गिरगांवात - डुआर्ट लेन मध्ये- डुआर्ट लेन मध्ये पिटर अल्वारीस सारखी मंडळी राहून गेलेली आहेत - आसपास बहुसंख्य ख्रिश्चन.
ही बाई कधी मोडकं तोडकं इंग्रजी बोलायला शिकली देव जाणे !
हा काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा..... इंग्रज बँकेत नोकरी करणारे आजोबा नऊवारी साडीतल्या आजीला घेऊन बँकेत पार्ट्यांना जायचे - चूल आणी मूल सांभाळलेली ही बाई तेथे कशी वावरत असेल हे चित्र डोळ्यापुढे आले की लाज वाटावी की अभिमान वाटावा हेच समजत नाही !

आम्ही शाळेत असतांनाची गोष्ट - समोरच्या मार्था आजीच्या घराचे विभाजन झाले - आम्ही भुसावळला राहायचो, आजीने मार्थाच्या मुलांना खूप समजवण्याचा प्रयत्न केलेला होता तरी ते घडलेच. मार्था व मोठा मुलगा त्यांच्या चेंबुरच्या जुन्या घरी राहायला गेल्याचे कळले. आम्ही मुंबईत सुट्टीत आलो की, माझी आजी मला घेऊन मार्थाकडे चेंबुरला एकटी जायची.
७० नंबरची बस दोन हत्ती सिनेमा समोरून पकडून आम्ही चेंबुरला जाऊन परत यायचो......
शाळा न शिकलेली, चिंचण गांवातली, कर्मठ भटाची बहिरी पोरं चूल आणी मूल सांभाळून हे उपद्व्याप करायचे हे काही जणांना सांगून पटणारे नाही.
तीची दोन मूलं म्हणजे माझे दोन्ही मामा चांगल्या हुद्यांवर बँकेत लागले - तेही नॅशनल ग्रिंड्लेज व स्टॅन्डर्ड चाटर्ड सारख्या, माझी एक मावशी अमेरिकेला असतें - जी इंग्लंडच्या ऑक्स्फर्ड महाविद्यालयात शिक्षण घेऊन (तेही आजोबांच्या पश्चात) अमेरिकेची नागरिक झाली.
कित्येकदा बोलवूनही अमेरिकेला न गेलेली माझी आजी तेथले फोटो जरूर मागवायची - फोटो बरोबर आलेल्या पत्रातले वर्णन वाचून वाचून ते फोटोसकट तिचे तोंडपाठ होते - आल्या गेल्याला ती अशा रितीने ते सांगायची जसें ती स्वत: त्या भागांत राहून आलेली आहे. -
चूल आणी मूल सांभाळणाऱ्या अडाणी गावंढळ बाईने मुलांना गावंढळ होवू दिले नाही ह्याचे कौतूक करावे तेव्हढे कमी आहे.

पत्रकारांचे उद्योग धंदे

चिपकू पत्रकारांची एक जमात मागे एकदा पेपरांत बघायला (म्हणजे वाचायला) मिळाली!
ह्या वेळी "स्टींग ऑपरेशन" करायचा प्रयत्न केला गेला तो खुद्द पाटलांचाच ! घ्या .... म्हणजे गृहमंत्र्याला असा अडकवला की आपल्याला जे हवे ते त्याच्या कडून उकळायला बरें !
धन्य ती पोरगी व तीच्यावर झालेले संस्कार !
वॉटरगेट- सारखी प्रकरणे किंवा अरुण शौरी सारखे पत्रकार इतिहास जमा झालेत असे वाटण्या इतपत आजची परिस्थिती ह्या पीत पत्रकारितेने निर्माण केली आहे !पत्रकार काय कुठेही काहीही करू शकतात.

वैद्यकीय क्षेत्रातले एक माझ्यासमोर घडलेले उदाहरण देतो -
एका पापभीरू डॉक्टरला सतत फोन यायचे -तुम्ही रुग्णांना नको त्या चाचण्या करायला भाग पाडत आहात- तुमच्या बद्दल पेपर मध्ये मी लिहिणार आहे.एक दोन वेळा त्या डॉक्टरांनी त्या फोन करणाऱ्याला 'आम्ही तसे काही करीत नाही' असे पटवण्याचा प्रयत्न केला. तरी अधून मधून हे फोन येणे चालूच राहिले शेवटी कंटाळून त्यांनी अंधरीच्या डी.एन.नगर पो.स्टे. ला तक्रार दिली -
सापळा लावून पत्रकाराला पकडला- निव्वळ पैशांसाठी आपल्या पत्रकारितेचा उपयोग (?) करणारे हे महाशय केवळ डॉक्टरांच्या चांगुलपणा मुळे सुटले.
PRESS ची पाटी लावून अवैध मालवाहतूक व प्रवासी वाहतूक करणारी वाहने ह्यांचीच. पकडले गेल्यावर ''प्रेस म्हणजे अमुक तमुक प्रिटींग प्रेस हो'' असे सांगायला ही मंडळी कमी करीत नाही !कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे उगवणारी ही पत्रके व त्यांचे पत्रकार पाहिले की समाजातल्या ह्या वर्गाची दया येते.....
पाटलांचे नशीब थोरं - वेळीच सावध झाले नसते तर फुकाच्या सापळ्यात अडकले असते-

ह्याच पत्रकारांसारखीच आता हल्ली इलेक्ट्रौनीक मेडिया मधल्या वॄत्तनिवेदकांची चलती आहे.
प्रिन्स ला खड्ड्यात पडलेला बघून ह्यांना आनंदाचे भरते यायचेच काय ते बाकी होते. ७२ तासांचे "लाईव्ह" चित्रीकरण करताना तो मुलगा "लाइव्ह" राहील की "डेड" होईल ह्याचे सोयर सुतकही त्यांना नव्हते.

प्रमोद महाजन ह्यांना हिंदूजाला ठेवले होते तेव्हा त्याच इस्पितळात काही कामानिमीत्त जावे लागले.
शक्यतो तुमचे उपकरण आमच्या कडे पाठवा अशी वारंवार विनंती करूनही काही कारणात्सव "इंडोस्कोपी" विभागाला ते शक्य होऊ शकले नाही. शेवटी जाणे भागच पडल्यामुळे तेथे जाऊन पोहचलो. सर्व म्हणजे सर्वच वाहिन्यांचे वॄत्त प्रतिनीधींचा तेथला तमाशा बघून लाजेने मान खाली घालावी लागली.
इस्पितळात पूर्ण गंभीर वातावरण होते. फक्त प्रमोद महाजनच नव्हे तर त्यांच्या सारखेच असंख्य रुग्ण् खाटेवर मॄत्युशी निकराची झुंज देत होती. त्यांना साथ देण्यासाठी अथक परिश्रम करणारे वैद्यकिय व्यवसायातले कर्मचारी वर्ग होते तर त्यांच्या परतण्याच्या वाटेवर सर्वच रुग्णांचे नातेवाईक, बायका मुले, आई वडिल हे काळजीने ग्रस्त होत देवाकडे धावा करीत होते व ह्या सर्वच प्रकारांच्या विरूद्ध असे बेशीस्त वर्तन मेडीयाच्या प्रतिनीधींचे होते.

मुंबई लोकल बौम्ब स्फोटातील खाटेवर पडलेल्या रुग्णाकडून "बाईट्स" घेणा-या ह्या वर्गाची कीव करावीशी वाटते;
बिच्चारे पोटा ची खळगी भरण्यासाठी प्रामाणिकपणा सोडून काय काय करावे लागते ह्यांना !
"प्रोफेशनल एथिक्स" नावाचा प्रकार ह्यांच्या गावीही नसावा पण फक्त ह्या वर्गाला दोष देऊनही उपयोगाचे नाही......
कैमेरासमोर येण्याची किंवा सतत प्रसिद्धी मिळवण्याची धडपड करणारी मंडळी प्रत्येक क्षेत्रात असतातच.

झांसीराणी लक्ष्मीबाई -बुंदेले हर बोलोके मुह - हमने सुनी कहानी थी ।
खुब लढी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी..... !


राणी लक्ष्मीबाईंच्या स्वातंत्र्य समरातील आहुतीला १८ जुन रोजी जवळपास दिडशे(१४७) वर्ष पूर्ण होतील त्यानिमीत्ताने त्या समरातील विरांना एक श्रद्धांजली."१८५७ चा स्वातंत्र्य समर" ह्या स्वा.वीर सावरकर ह्यांच्या पुस्तकातील काही भाग घेउन त्याची इतिहासाशी जोडणी केली आहे.
********************************************
गंगाधर रावांची पत्नी झाल्यावर लगेच विधवा होण्याचे दुर्भाग्य नशिबी आलेल्या-जळगांव जिल्ह्यातील पारोळ्याच्या मोरोपंत तांब्यांची कन्या झांशीची राणी झाली. गंगाधररावांनी मागे सोडलेले झांसीचे वैभव व दामोदर हा दत्तक मुलगा सांभाळण्याचे परम कर्तव्य लक्ष्मीवर दुर्दैवाने आले होते. दुर्भाग्य व संकट एकटी येत नाहीत - डलहौसीने १८५४ मध्ये दत्तक मुलांना वारसाहक्क देण्याचे नाकारून झांशीचे राज्य इंग्रज सत्तेत खालसा करण्याचा कुटील डाव आरंभला.
"मेरी झांसी नही दुंगी" ची गर्जना करीत लक्ष्मीने त्यांचे अधिपत्य स्विकारण्यास नकार दिला व "मेरी झांसी नही दुंगा" ची आरोळी प्रांतात दुमदुमली. ३/४ वर्ष प्रजा संगोपनाचे कार्य लक्ष्मीबाई करित असतां संस्थान घशात घालायचा डाव इंग्रज खेळत होते. "झांसी नही दुंगी" ही काय गडबड आहे हे पाहण्यासाठी सर ह्यु रोज ब्रिगेडियर जन.व्हिटलॉक व चार हजार शस्त्रसज्ज सैन्य व भयंकर तोफांसह बुंदेल खंडाकडे चालून गेला.
मद्रहून निघून सर ह्यु रोजने काल्पीपर्यंत १८५७च्या समरविरांच्या ताब्यातला प्रदेश जिंकत जावे, तर जबलपुराहून निघून सर व्हिटलॉकने बिना, कर्की वगैरे मुलूख घेत घेत सर ह्यु रोजला मिळावे व अशा रितीने ह्या दोन फौजांनी गंगा-यमुनेच्या दक्षीणेकडील प्रदेशात सत्ता संपादित करावी असा कार्यक्रम ठरला होता. सर ह्यु रोजने २० मार्च.१८५८ ला झांसी पासून १४ मैलांवर तळ ठोकला. २३च्या रात्री उशीराने आंग्लसेनेशी झुंज सुरू झाली. इंग्रजांचा रणपंडीत सर ह्यु रोज व झांसीची कोवळ्या वयाची अबला राणी लक्ष्मी ! कोण अपूर्व झुंझ ! ता. २५ पासून लढाईला खरे तोंड फुटले. अत्यंत शौर्याने राणीने बुंदेलखंडांच्या कडव्या शिपायांसह किल्ला लढला. इंग्रजांजवळ इतकी साधन सामुग्री असतांनाही झांशीचा वेढा फोढायला त्यांना तब्बल ३१ ता. पर्यंत लढावे लागले. सर ह्यु रोज च्या अवाढव्य सैन्याला झांशी पुरून उरली. तोफखान्याच्या अग्निवर्षावामुळे कोसळलेली भिंतही रातोरात गवंडी बोलावून आणून दिवस उजाडण्याच्या आत पूर्ववत भिंत बांधणारे शत्रू चे विर सर ह्यु रोजने आयुष्यात प्रथमच पाहिले होते.
तात्या टोपे विन्डहेमचा पराभव करून काल्पी मार्गे येत असता राणीची चिठ्ठी त्यांना मिळाली पण महीनो लढलेल्या त्यांच्या सेनेने इंग्रजांपुढून पळ काढला. बेटवा नदिवर झालेल्या त्या घनघोर युद्धांत इंग्रजांनी तात्या टोपेंच्या सेनेचा पराभव केला. येथे राणीने किल्ला लढवून ठेवला होता पण दक्षिण तट पडल्यावर मोजक्या सैन्य व प्रमुख माणसांसह राणीने मध्य रात्री किल्ला सोडला. तेहरी संस्थानाचा देशद्रोही पहारा फोडून काल्पीच्या दिशेने नानासाहेब पेशवे व तात्या टोपेंना सामिल होण्यासाठी पसार झाली. बौकर व त्याचे साथी तिच्या पाठलागावर लागले पण त्याला युद्धात जखमी करून दामोदरास पाठीशी बांधलेली राणी तेथून निसटली..... १०२ मैलांचे अंतर घोड्यावरून दिवस भर कापत ती काल्पीला पोहचली. काल्पीला पोहचताच तिच्या त्या कर्तव्य तत्पर घोड्याने प्राण सोडला !

रावसाहेब पेशव्यांनी व लक्ष्मीबाईने स्वराज्यासाठी रक्तांचा शेवटचा थेंब शरिरात असेपर्यंत शत्रुशी अखंड युद्ध चालू ठेवण्याचा निश्चय केला ! येथे झांशीत ब्रिगे.जन. व्हिटलॉकने मोरोपंत तांब्यांना पकडून फाशी दिले. झांशीत अमानुष कत्तली व नादिरशाही लूट केल्यावर ब्रिगे. शांत झाला. मधल्या काळात राणी पेशव्यांबरोबर पुढील संघर्षाची तयारी करिंत होती. काल्पी पासून ४२ मैलांवरिल कुंच गावी सर्व स्वराज्याचे विर एकत्र जमा झाले परंतू अपुर्व सावळा गोंधळ झाला. अनेक सेनापतींखाली हुकुमांनी लढलेल्या ह्या सेनेचा आपापसांत ताळमेळ नसल्याने एका हुकुमशाही इंग्रज सेनापतीच्या अधिपत्याखालिल सेनेने त्यांचा धुव्वा उडवला. तेथे तात्या टोपेंनी पराभवाची लक्षणे दिसतांच ग्वाल्हेर कडे कुच केले - काल्पी तर हातातून जात होती - ग्वाल्हेरला जावून तेथल्या मंडळींना फोडायचे कर्तव्य शिरावर घेऊन ते काल्पीहून निघाले. इंग्रजी इतिहासात ह्या महत्वपूर्ण चालीची 'पळपुटेपणा' म्हणून नोंद करून निर्भत्सना केली गेली.
तात्या टोपे इंग्रजी सेना काल्पी सर करेल ह्या अंदाजाने ग्वाल्हेर कडे फोडाफोड करायला कुच करित असतांनाच अचानक विरश्री संचारल्या गत स्वातंत्र्यविरांनी काल्पीला उचल खाल्ली. सर ह्यु रोजची २५वी नेटिव्ह इन्फंर्ट्री मेजर आर च्या कुशल नेतृत्वा खाली सामोरी आली पण राणी लक्ष्मी ह्या रणचंडीके च्या झंझावातासमोर साफ निष्प्रभ ठरली. त्या विशी बाविशीच्या तरूण रणलक्ष्मीचा आवेग, आवेश, तिचा बेफाम सुटलेला घोडा, तिची रपासप चालणारी समशेर, पाहून मेजर आर च्या अधिपत्याखालील सेनेची दाणादाण उडाली. तिचा तो भयंकर चमचमाट पाहून दिपलेला सर ह्यु भानावर येउन आपले राखलेले उंटावरचे सैन्य घेऊन पुढे घुसला. त्या नविन जोमाच्या सैन्याच्या बळावर कसेबसे मेजर आर ची वाघीणीच्या जबड्यातून सुटका झाली. त्या काळातील एका इंग्रज अधिकायाने लिहून ठेवले आहे.... " सर ह्यु ला पंधरा मिनीटे उशिर होता तर तीने आमची कत्तल उडवली असती. त्या उंटावरच्या सैन्याने आम्हाला वाचविले - त्या दिवसापासून माझे प्रेम उंटावर जडलेले आहे."
उंटावरल्या शाहण्या सर ह्यु ने स्वत:ची अब्रू वाचवण्यात यश मिळवले. आणखी एक दोन दिवस छोट्या मोठ्या चकमकींनंतर इंग्रज काल्पीत प्रवेशले. नानासाहेब पेशव्यांनी व तात्या टोपे ह्या मर्द मराठी गड्याने अथक परिश्रमाने वाढवलेले काल्पीचे साम्राज्य आंग्लांच्या गळ्याखाली उतरले(२४ मे).
सापडले नाहीत ते फक्त स्वांतंत्र्य विर ! काल्पीहून युक्तीने त्यांनी ग्वाल्हेर कडे पळ काढला होता. त्यात राणीही सामील होती.
प्रकृती अस्वास्थ्याने सर ह्यु रोजने आपला चार्ज सोडला व बंडखोरांचा बिमोड करण्यात यश मिळवल्याच्या आनंदात इंग्रज सेना विसावा घेण्यासाठी बसू लागली. तेव्हढ्यात एक जयघोष गर्जना झाली...."आही रावसाहेब पेशवे आहोत, आम्ही स्वराज्यासाठी व स्वधर्मासाठी लढत आहोत" गोपाळपुराहून रावसाहेबांनी ही घोषणा करताच इंग्रजांच्या पायाखालील जमीन परत हादरली........

होय ! तीच ही गर्जना....
जीने इंग्रज साम्राज्याला ललकारलेले होते. काल्पीच्या किल्याचा आश्रय सुटतांच ती प्रथम गोपाळपूर च्या वातावरणात गुंजली...पण ह्यावेळेस आशेचे चिन्ह राहिलेले नव्हते. नर्मदे पासून यमुने पर्यंत व पुढे हिमालयापर्यंत इंग्रजांनी सर्व प्रदेश जिंकून घेतला होता.
जवळ सैन्य उरले नाहे, एका किल्ल्याचाही आधार नाही. पराजयाने व द्रव्य संपल्याने नवीन सैन्य मिळण्याची आशा नाही. एक काय तो तात्या टोपे उरलेला ! गोपाळपूरला तात्या परत आले होते. कानपूर पडतांच काल्पी व काल्पी पडतांच कुठला तरी प्रदेश बगलेत मारणे आवश्यक होतेच. वडिलांच्या भेटीचे निमीत्तमात्र करून ग्वाल्हेरला भेट देण्यास गेलेला हा क्रांतीविर ग्वाल्हेर फोडूनच परत गोपाळपूराला रावसाहेबांना भेटण्यास आला.
ग्वाल्हेरात गुप्त रुपाने वावरीत त्यांनी सैन्याच्या मुख्य अधिकाऱ्यांची वचने घेतली. दरबारी व सरदारी पुढाऱ्यांकडून लागेल ते सहाय्य मिळवण्यात त्यांना यश आले होते. ग्वाल्हेरची खडान खडा माहिती काढून व तिथले सिंहासन भुंग्या प्रमाणे पोखरून परत रावसाहेबांना जावून गोपाळपूरास मिळाला.
तात्या टोपे गोपाळपूरास येताच सर्व मिळून निघाले ग्वाल्हेर सर करायला. २८ मे ला सर्व येउन थडकले आमेन महालात.
शिंद्याला पत्रही पाठवलेले होतेच."आम्ही तुमच्याकडे स्नेह भावाने येत आहोत. पुर्वीचा संबंध ध्यान्यात ठेऊन साह्य करावे म्हणजे आम्हांस दक्षिणेकडे जाता येइल." ह्या पत्राचे प्रत्युत्तर म्हणून शिंद्यांनी १ जुनला आपली खास बालेघाटी फलटण व सर्व सैन्य सज्ज करून श्रीमंतांवर चालून आला.
आपल्या स्वदेशध्वजाला मिळण्यासाठी जयाजी शिंदे येतो आहे असे वाटत असतांनाच राणीच्या लक्षात त्याचा कावा आला.
"वंदन नव्हे तो ध्वज भंजन करण्यास येत आहे" म्हणत राणी आपल्या ३०० स्वारांसह पुढे घुसली व समशेर उपसून शिंद्यांच्या तोफांवर तुटून पडली. तेव्हढ्यात तीला जयाजी शिंदे दिसला.
क्रोधाने भडकलेली ही धावती वीज मस्तकावर तडाडकन आदळताच शिंदेंची दाणादाण उडाली. त्याच्या बालेघाटी सैन्याचा असा बोजवारा उडत असता, तिकडे त्याच्या इतर सैन्याने तात्या टोपेंना पाहताच लढण्याचे नाकारले व सर्व सैन्य तात्यांस जावून मिळाले.

तेव्हा जयाजी उर्फ भागोजीराव शिंदे व त्याचे दिवाण दिनकरराव ह्यांनी ग्वाल्हेरचे रणच नव्हे तर सिंहासन सोडून आग्र्याकडे धुम ठोकली.ग्वाल्हेर शहराने रावसाहेबांचे स्वागत मंगलवाद्यांचा कडकडाट करून केले. ग्वाल्हेरचा द्रव्यभांडार अमरचंद भाटियाने श्रीमंतांना अर्पण केला. ग्वाल्हेरांत स्वातंत्र्यविरांना सहानुभूती दाखवणारे कैदेत होते त्यांची मुक्तता झाली. स्वदेश व स्वधर्माला ग्वाल्हेर जागले...
राजा स्वदेशास मिळत नाही पण ग्वाल्हेर स्वदेशास साथ देते असे चित्र तयार झाले.
मग स्वदेश शिंद्यांना कुठून मिळणार ? तोफा स्वदेशाकडे, पायदळ स्वदेशाकडे, घोडदळ स्वदेशाकडे......
सर्व सरदार व मानकरी स्वदेशासाठी,
सर्व देव व देवालये स्वदेशासाठी ,
सर्व ग्वाल्हेर स्वदेशासाठी.
पण शिंदे ? ......
ते मात्र इंग्रजांकडे व इंग्रजांसाठी....
मग ग्वाल्हेर कुठून त्यांना साथ देणार ?
३ जुन १८५८ ला ग्वाल्हेरने स्वराज्यभिषेक केला तो श्रीमंतांचा.... !
सर्व अपापल्या एतमामाप्रमाणे आसनांवर विराजमान होते......
सरदार, मुत्सद्दि, शिलेदार, सेनाधिकारी, अरब, रोहिल, पठाण, रजपूत, रांगडे, परदेशी, आणि इतर वीरश्रेष्ठ आपापल्या सैनिकी पोषखात सशस्त्र श्रीमतांना दाखल झाले. श्रीमंतांनी सर्वांची योग्य दखल घेतली. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले....
रामराव गोविंदांना मुख्य प्रधानकी तर तात्या टोपेंची सरसेनापती पदी निवड झाली......
तात्या टोपे..... कुठलेही राज्य नव्हते त्यांच्या जवळ .....
कुठल्याही संस्थानाचे ते संस्थानिक नव्हते......
तरीही ... बिऱ्हाड पाठीवर बांधून हा विर देशभर शिर तळहातावर घेवून वणवण फिरला.....
कुणासाठी ? कशासाठी ?? फक्त स्वातंत्र्यासाठी !!!
मग तो सरसेनापती होणार नाही तर कोण होणार ?

सर्व हिंदू संस्थानिक लढले.... मेले.... अमर झाले..... पण जेव्हा त्यांच्या स्वतःवर बालंट आले तेव्हा ..... लढले ... फक्त स्वत:चे संस्थान वाचवण्याच्या हिशेबाने... तात्या एकटे देशाच्या स्वातंत्र्याच्या हिशेबाने लढले होते म्हणून त्यांची निवड केली गेली ती सर सेनापती म्हणून !
त्यानंतर श्रीमंतांनी अष्ट प्रधान नेमले, वीस लाख रुपयांची सैन्यात वाटणी केली, सर्वांना योग्य तो मान मरतब मिळाल्याचे सुख श्रीमंतांनी पाहीले... आंग्ल सेनेला या नवीन प्रकट झालेल्या सिंहासनाच्या स्थापनेने पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला होता. आणी हेच उद्देश तात्यांचे व रावसाहेबांचे होते कारण ह्याची वार्ता मिळताच सर ह्यु रोज विश्रांतीची व प्रकृती अस्वास्थाची कल्पना पाठीस घालून रणांगणात येण्यास सिद्ध झाला.
सर ह्यु रोज ने कुणालाही कानोकान खबर न लावता मोठे सैन्य व तोफखाना जमवायला सुरूवात केली. इंग्रजांची कुटील रणनीती मर्द मराठ्या तात्याच्या नितीच्या वेगळी होती.
इंग्रज निकालाला महत्व देत.... तात्या नितीमत्तेला...!
विजय कुणाचा होणार हे काळ ठरविणार होता....अचानक इंग्रजी फौजा मुरार ला दाखल झाल्याची वार्ता पोहचली अन तात्यांच्या मर्जी विरूद्ध त्यांना इंग्रजांचा बिमोड करण्यासाठी मुरार पर्यंत धाव घ्यावी लागली... चुकलेल्या ठोकताळ्यांचे हिशेब वर्षोनूवर्ष देशाच्या जनतेला मोजावे लागतात.....सर ह्यु रोज आपल्या उत्कृष्ठ सेनेच्या बरोबर ग्वाल्हेर वर चालून आला.
तो पर्यंत तात्या टोपेंनी जोरदार लढाई केली पण मुरार वाचवण्यात त्यांना यश आले नाही(१६ जून १८५७) इंग्रजांनी मुरारची छावणी जिंकून घेतली. सर ह्यु रोज बरोबर पळून गेलेला शिंद्याही आलेला होता. त्याने ग्वाल्हेरच्या भोळ्या लोकांना स्वामिनिष्ठेच्या आवरणाखाली फुटवण्याचा प्रयत्नही केला. मुरारची छावणी जाताच समरसेनेला पुन्हा अवसान भरले पण अपयशाची चिन्हे दिसू लागताच फाटाफूट होत चालली.

परंतू असल्या बिकट प्रसंगीही रणलक्ष्मी लक्ष्मीराणी अचंचल निश्चयाने तलवार घेऊन तयार आहे. तिला आता धास्ती कसली ? आशा आणी निराशा ह्यांना तिने पायाखाली तुडविले आहे. ऐहिक वैभवाची तिला किळस आलेली आहे.
आता एकच महत्वाकांक्षा उरली आहे - लढत लढत रणांत मरेपर्यंत हा स्वातंत्र्यध्वज माझ्या तलवारीने ताठ तोललेला असो! ती किंवा तो धुळीत न पडता रणांत पडावा ! तिने त्या बेबंद सैन्याची शक्य तितकी व्यवस्था केली व आपण पूर्व बाजूचे संरक्षण करण्याचे काम अंगावर घेतले.
तिने नेहमीचा लष्करी पोषाख अंगावर चढविला, उमद्या घोड्यावर ती स्वार झाली, तिने म्यानातून आपली रत्नजडीत समशेर बाहेर काढली व आपल्या सैन्याची कडक कवाईत घेऊ लागली !
तिने कोटाकी सराईच्या बाजूने आपले मोर्चे उत्कृष्ठ तहेने सज्ज केले.
अश्या ह्या युद्धदेवीच्या सैनापत्याखाली तिच्याच तेजाचे अनुरूप असे अतुल सैन्य असते तर ? अतुल नसलेले ते सैन्यदेखील तिच्या या रणोत्साहाने वीरावून गेले -
कारण इंग्रजी सैन्य दिसतांच जिकडे तिकडे कर्ण, तंबूर, रणभेरी वाजू लागून आकाशमंडळ दणाणले. व राणी तिच्या निवडक स्वारांसह रणात समशेर चमकावीत तळपू लागली.
तिच्या बरोबर 'मंदर' व 'काशी' ह्या तिच्या जिवलग दासीही तळपत आहेत.
राणी लक्ष्मीबाई आज शौर्यस्फूर्तीच्या शिखरास पोहचली.
आकाश धूराने,धुळीने, रक्ताने,निनादाने व गर्जनेने जरी खच्चून भरलेले होते तरी तितक्यातूनही ती विजेसारखी चमका मारून निराळी पडत होती!
तिच्या फळीवर स्मिथचा वारंवार मारा झाला. पण तिने तिच्या सैन्याची फळी फुटू दिली नाही. दिवसभर ती लढत होती. तिचे सैन्य जोषास चढून तिच्या समशेरीबरोबर शत्रुंना सपासप कापत होते. अखेर स्मिथ हटला. त्याने तिची फळी फोडण्याचा नाद सोडून दिला, व त्या काळसर्पीणीच्या बिळाची दिशा सोडून दुसया बाजूला तो वळू लागला.

जूनची १८ ता. उजाडली. इंग्रजी सेनेचा दिवस अमोघ होता. निरनिराळ्या दिशांनी ग्वाल्हेरवर चढाई करीत आज ग्वाल्हेर घेण्यासाठी त्यांनी शिकस्त चालविली. इतर दिशांकडे खुद्द सर ह्यू रोज गेलेला होता व झाशीराणीच्या दिशेला तो कालचा परतवलेला परंतु आज हट्टास पेटलेला व नव्या कुमकीने सबळ झालेला योद्धा 'स्मिथ'च चालून आला.
राणी आपल्या दळासह सिद्धच होती. आज डोक्यास भरजरीची चंदेरी बत्ती, तमामी अंगरखा, पायात पायजमा आणि गळ्यात मोत्यांचा कंठा रुळत होता.
भात्यातून बाण ~
मेघांतून विज ~
गुहेतून सिंहीण ~
तशी घोड्यावर तळपणारी लक्ष्मीबाई ~ हातातली समशेर उपसून शत्रूवर सरळ चालून गेली.
इंग्रजी योद्धे मी मी म्हणणारे पण तिच्यासमोर बेजार झाले.
"तिने आपल्या सैन्यासह तत्काल, अखंडीत व भयंकर हल्ले चालू केले आणि जरी तिचे सैन्य पुन:पुन्हा धारातीर्थात बुडून एकसारखे कमी कमी होत चालले, तरी राणी सर्वांच्या पुढे तळपत चाललेली दिसे. तिच्या भंगलेल्या सैन्यास पुन्हा गोळा करीत व शौर्याचे उत्कर्ष गाजवीत रणावलेली दिसे !" असे इंग्रज इतिहासात लिहीले आहे.
तिची बाजू अशी अतुल शौर्याने झुंजत असता, इतर बाजूंनी समरविरांना भंगवून इंग्रजी सैन्य तिच्या पिछाडी वर गर्जत आलेले तिला दिसले. तोफा बंद झालेल्या, सैन्य उधळून गेलेले, जवळ १५-२० घोडेस्वार काय ते शिल्लक, चोहोबाजुंनी इंग्रजी विजयी लगट !
राणी लक्ष्मीने आपल्या दासीसह तो शत्रुचा कोट फोडून समरविरांच्या मुख्य भागास मिळण्यासाठी घोड्यास टाच दिली - मागोमाग हुर्सास फलटणीचे आंग्ल स्वार चित्त्याप्रमाणे गोळ्या सोडीत मागे पडले. तरी ती झांशीची राणी समशेरीने सपासप मार्ग काढीत पुढे जात होती. मागे तिच्या दासीला फिरंग्यांनी घेरले व यमसदनास धाडले - राणीच्या हे लक्ष्यात येताच तीच्या दासीच्या मदतीसाठी ती मागे फिरली - चवताळून त्या फिरंग्यांवर धावली, तिच्या एकेका वारात एकेक शिर धडावेगळे होत होते !
दासीच्या वधाचा बदला घेउन ती परत समरविरांच्या मुख्य प्रवाहाला मिळण्यासाठी घोडदौड करू लागली.एका लहानशा ओढ्याला येऊन ती भिडली.
एक उडी व शत्रूच्या टप्प्यातून निसटलीच !
परंतू घोडा उडी घेईना- मांत्रीकाच्या विस्तवाचे वर्तुळ जणू त्याच्या भोवती पसरलेले होते-
तो घोडा त्या ओढ्याच्या भोवती भोवती फिरे पण उडी घेईना !
तिचा तो रणांगणात प्रथीत झालेला जुना घोडा जर आज असतां !
तोवर द्ष्टीक्षेपात इंग्रजी सैन्य आले ! अन क्षणार्धात तिच्यावर कोसळले !! पण तिच्या तोंडून शरणाचा शब्द नाही !!!

त्यांच्या अनेक तलवारींशी तिच्या समशेरीचे एकुलते एक पाते भिडले !
समोरच्या अघाताशी तिने खडाखड खटका उडविला, पण एका फिरंग्याने तिच्या मस्तकावर मागून वार केला ! त्या वारासरशी तिच्या मस्तकाचा दक्षिण भाग विच्छीन्न होऊन तो नेत्रही बाहेर आला !! - तितक्यात तिच्या छातीवर समोरून वार झाला अन मग चारही बाजूंनी !!!
लक्ष्मीच्या शरिरातला शेवटचा रक्तबिंदू गळू लागला-"समर देवते, हा घे तूला शेवटचा बळी" असेच जणू सुचवित असावा! तसल्या आसन्नमरण स्थितीतही त्या मानिनीने आपल्यावर वार करणाया त्या गोया सार्जंटचा चुराडा केला...
धन्य ती राणी आणी धन्य तीला जन्म देणारी ती भारतभूमी !
ती शेवटचे श्वासोश्वास करू लागली.
इमानी सेवक रामचंद्रराव देशमुख जवळ पोहचले-त्यांनी त्या स्थानावरून त्या जखमी वाघीणीला दुर नेण्यात यश मिळवले-रक्ताने लाल झालेली ती रणलक्ष्मी रणशय्येवर पहुडली- गंगादास बाबांनी तिला शितजल दिले व तीचा प्राण-तो दिव्य आत्मा-तिच्या मृण्मय पिंजयातून उडून अंतर्धान पावला.
तिचे निधन होताच रामचंद्ररावांनी जवळच्या गंजीतल्या गवताने तिची चिता रचली-
गादिवर नव्हे... चितेवर-ती स्वतंत्र्य राणी सारखीच लढता लढता अमरत्वाच्या मंदिरात विराजमान झाली !

सत्तावन्न च्या स्वातंत्र्य समरातील अग्नीकल्लोळाची ही शेवटची ज्वाला स्वर्गाकडे गेली !अशी ही रणलक्ष्मी लक्ष्मीराणी - कृतकिर्ती - कृतकृत्य विभुती राष्ट्राच्या अस्मितेला सफलता देते.
अत्युत्तम सद गुणांची ही मंजूषा होती.

जातीने स्त्री ......
वयाने पंचविशीच्या आत.......
रुपाने खुबसूरत............
वर्तनाने मनमोहक.........
प्रजेची प्रिती.....
आचरणाने सच्छील.....
स्वदेश भक्तीची ज्वाला....
स्वातंत्र्याची स्वतंत्र्यता......
मानाची माननियता.....
रणाची रणलक्ष्मी........
भारतभूमीची सुकन्या......
झांशीची राणी लक्ष्मीबाई......

"लक्ष्मीराणी आमची आहे" हे म्हणण्याचा मान मिळणे परम वैभव...
इंग्लंडच्या इतिहासालाही तसला मान अजून मिळालेला नाही!
भारतभुमीचे सौभाग्य की राणी लक्ष्मीवर गर्वोक्ती करण्याचे भाग्य ह्या भुमीला मिळाले !

~ समाप्त ~