Wednesday, December 6, 2006

चूल आणी मूल

चूल आणी मूल हा विषय आहे माझ्या आजीच्या वेळचा !

माझी आजी ठार बहिरी(७५% वैगुण्य) होती.... फक्त ओरडलेलेच काय ते कळायचे !
मला चांगलेच आठवते, लहानपणी आम्ही मुद्दाम काहीही न बोलता फक्त तोंड हालवायचो, मग आजी पण 'काय? काय?' करींत एक हात कानामागे कर्ण्यासारखा ठेवून ऐकण्याचा प्रयत्न करायची. मामांची पोरं, मावशीची पोरं व मी जबरदस्त हसायचो. वाटायचे कशी आजीची गंमत केली !
मोठे झाल्यावर कळले की तीला सगळं समजायचे - आईने सांगितले -
"तीला माहित असायचे की, तुम्ही पोरं तीची टेर खेचताहात ते !"
"कसें काय ?"
आई:" ती म्हणायची - एक पोरं आपलं ओठ हालवतं व मी कानावर हात नेला की बाकीची फिदीफिदी करतात - त्यांना मजा वाटते म्हणून मी पण ढोंग करते".

मला साधं वरणं खूप आवडायचे व जेव्हा फोडणी दिलेले वरणं केले असेल तेव्हा माझा थयथयाट पूर्ण वाडीला ऐकू जायचा (आता सोसायटीला ऐकू जातो) मग हळूच मला सांगायची,
"मी शेजारून तुझ्यासाठी वरण आणते थांब" पदराखालून फोडणी दिलेल्या वरणाची वाटी नेऊन चक्कर मारून परत यायची व मी मात्र मिटक्या मारीत ते वरण खायचो....
हा समजूतदार पणा चूल आणी मूल सांभाळूनच आलेला !
ह्या बाईने बहिरी असून संसार केला! -
४ मुलांना जन्म दिला व व्यवस्थित वाढवले !! एकही वाया गेला नाही !!!
हे यश त्यांचे की तीचे ? कुणाचेही असो -

"चूल आणी मूल" ह्या विषयावर बोलायचे झाल्यास तीचा अजून एक किस्सा आठवतो....
माझी आई सांगते- तीच्या लहानपणी तीची आई वारली, ती जन्माने बहिरी नव्हती,(म्हणून ती बोलू शकत होती )
८/९ वर्षांची असतांना कानात सारखी खाज येते म्हणून तीच्या आत्याने थोडे जास्त गरम तेल दोन्ही कानात टाकले ! टाकतांना 'लहान मूल आहे - रडणारच' म्हणून लक्ष न देता तसेंच सोडले - जेव्हा आजीचे वडील घरी आले व तीचे रडणे थांबेना तेव्हा वैद्याकडे नेल्यावर झालेला प्रकार कळला तो पर्यंत उशीर झाला होता.
पुढे आत्याचे लग्न झाले - आजीचे वडील व आजी एकटे राहायला लागले तेव्हा ती स्वयंपाक करून, घर सांभाळून विविध कला शिकली !
शाळेत जाण्याचा प्रश्नच नव्हता ! एक तर चिंचणीत शाळा नाही- पालघर लांब पडणार...
न्यायला आणायला कुणी नाही त्यात ही ठार बहिरी !
तरी मी माझ्या लहानपणी तीला वर्तमानपत्र वाचतांना पाहिले आहे.
- हे कसें शक्य झाले ह्या गोष्टींचे अजूनही नवल वाटते. नुसते मलाच नाही तर माझे सर्वांत मोठे मामा (जे आता हयांत नाहीत) त्यांनाही आठवत नाही ती वाचायला केव्हा शिकली ते !
चूल आणी मूल सांभाळणारी ठार बहिरी बाई वर्तमानपत्र वाचते हे काही मंडळींच्या पचनी पडणार नाही !

नुसता संसार केला असता तर गोष्ट वेगळी होती....
माझे आजोबा मुंबईतल्या फोर्ट भागात स्टॅंडर्ड चाटर्ड बॅंकेत नोकरी वर होते व राहायचे गिरगांवात - डुआर्ट लेन मध्ये- डुआर्ट लेन मध्ये पिटर अल्वारीस सारखी मंडळी राहून गेलेली आहेत - आसपास बहुसंख्य ख्रिश्चन.
ही बाई कधी मोडकं तोडकं इंग्रजी बोलायला शिकली देव जाणे !
हा काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा..... इंग्रज बँकेत नोकरी करणारे आजोबा नऊवारी साडीतल्या आजीला घेऊन बँकेत पार्ट्यांना जायचे - चूल आणी मूल सांभाळलेली ही बाई तेथे कशी वावरत असेल हे चित्र डोळ्यापुढे आले की लाज वाटावी की अभिमान वाटावा हेच समजत नाही !

आम्ही शाळेत असतांनाची गोष्ट - समोरच्या मार्था आजीच्या घराचे विभाजन झाले - आम्ही भुसावळला राहायचो, आजीने मार्थाच्या मुलांना खूप समजवण्याचा प्रयत्न केलेला होता तरी ते घडलेच. मार्था व मोठा मुलगा त्यांच्या चेंबुरच्या जुन्या घरी राहायला गेल्याचे कळले. आम्ही मुंबईत सुट्टीत आलो की, माझी आजी मला घेऊन मार्थाकडे चेंबुरला एकटी जायची.
७० नंबरची बस दोन हत्ती सिनेमा समोरून पकडून आम्ही चेंबुरला जाऊन परत यायचो......
शाळा न शिकलेली, चिंचण गांवातली, कर्मठ भटाची बहिरी पोरं चूल आणी मूल सांभाळून हे उपद्व्याप करायचे हे काही जणांना सांगून पटणारे नाही.
तीची दोन मूलं म्हणजे माझे दोन्ही मामा चांगल्या हुद्यांवर बँकेत लागले - तेही नॅशनल ग्रिंड्लेज व स्टॅन्डर्ड चाटर्ड सारख्या, माझी एक मावशी अमेरिकेला असतें - जी इंग्लंडच्या ऑक्स्फर्ड महाविद्यालयात शिक्षण घेऊन (तेही आजोबांच्या पश्चात) अमेरिकेची नागरिक झाली.
कित्येकदा बोलवूनही अमेरिकेला न गेलेली माझी आजी तेथले फोटो जरूर मागवायची - फोटो बरोबर आलेल्या पत्रातले वर्णन वाचून वाचून ते फोटोसकट तिचे तोंडपाठ होते - आल्या गेल्याला ती अशा रितीने ते सांगायची जसें ती स्वत: त्या भागांत राहून आलेली आहे. -
चूल आणी मूल सांभाळणाऱ्या अडाणी गावंढळ बाईने मुलांना गावंढळ होवू दिले नाही ह्याचे कौतूक करावे तेव्हढे कमी आहे.

No comments: