Wednesday, December 6, 2006

नोकरी - एक प्रवास १

अभियांत्रिकी विद्यालयाची शेवटच्या वर्षाची परीक्षा झाल्या झाल्या जळगांवला ओळखीने एका छोट्या इंजिनियरिंग फर्म मध्ये सर्व्हिस इंजि. ची तात्पुरती नोकरी मिळाली. बरोबरीचे बरेचसे मित्र मुंबईचे होते. त्यांनी परीक्षा झाल्या झाल्याच घरच्या वाटा धरलेल्या होत्या. भुसावळसारख्या गावात 'टाईम्स' दुपारच्या गाडीने येई. संध्याकाळी घरी जाताना रेल्वेच्या वाचनालयात जाऊन नोकरीच्या संधी चाळत बसायचा उद्योग मागे लागला! - एका महिन्यातच १०/१२ ठिकाणी दगड टाकले होते (खडे लहान वाटतात) त्यातले काही भिरभिरत लागले मुंबईतच व एका मुहूर्तावर, ४ दिवसांत येतो असा निरोप जळगांवला कळवून सटकलो !
जूनच्या २० ला एक मुलाखत होती.... ती यथातथाच गेली. जुलैच्या ५ ला दुसरी होती - मुंबई सेंट्रलला मराठा मंदिरच्या मागेच वाय.एम. सी.ए.च्या प्रशस्त कॉन्फ़रन्स हॉल मध्ये मुलाखतीला बोलावले होते. एक प्रेमळ आजोबां सारखा दिसणारा,मराठी बोलणारा पण मद्रासी माणूस; त्याच्या बाजूला एक जपानी माणूस व शेवटी त्या जपान्या इतकाच बुटका पण हिटलर टाइपच्या मिशा व चेहरा असलेला एक मानव म्हणण्यासारखा प्राणी बसलेला होता. माझी मुलाखत सुरू होण्या आधी एका टिपटाप दिसणाऱ्या तरूण व हसतमुख चेहऱ्याच्या मुलाने (मुलीने नाही.... दुर्दैव!) मुलाखतीला आलेल्यांचे स्वागत केले.
- मला एक समजत नाही; इंजिनियर्स चे व मुलींचे जन्मता वाकडे असते का ? महाविद्यालयात सगळीकडे रखरखीत वाळवंट... खाजगी महाविद्यालयांना परवानगी मिळाल्यानंतर आमची प्रथम बॅच - आमच्या बॅचमधील ३ कोर्सना मिळून १९८ मुलांमागे फक्त ४ मूली - त्यातल्या दोघी अगदी बाळबोध वळणाच्या व लता मंगेशकर टाइप दोन वेण्या घालणाऱ्या. उरलेल्या दोघींपैकी एक बोदवड गावाहून, वेळ मिळाला की यायची.... ती तशी दिसायला बरी होती पण ड्फ्फर असावी.... पहिल्या वर्षी तिला मिळाला डच्चू; तो तीच्या वाडवडिलांना पचनी न पडल्याने तिचे नांवच काढून टाकले कॉलेजमधून - आम्हीही म्हटले जाऊ द्या - नाहीतरी आठवड्यातले दोन दिवस येणार त्यासाठी उरलेले ४ दिवस कोण डोकं पिकवेल ? चौथी होती केरळची -दिवसां दिसली असती उजेडात; मावळतीला कठीण परिस्थिती झाली असती- हे सर्व बघून महाविद्यालय म्हणजे हिरवळ व त्यावर बागडणारी फुलपाखरे हे समीकरण माझ्या गांवी कधीच नव्हते...... कॉलेजच्या एका बाजूला झेड.टी.एस. म्हणजे रेल्वेचे प्रशिक्षण केंद्र- दुसरीकडे आर.पी. डी. म्हणजे मिल्ट्रीवाल्यांचा कसलातरी डेपो. मागे विस्तीर्ण शेते व रेल्वे यार्ड तर चौथ्या बाजूला रेल्वेची खांडव्याला जाणारी रेल्वेलाइन-लाइन मारायची ती कोणावर हा एक प्रश्नच होता...असो..
'विश्वनाथ' नांव कळले त्या हसतमुख चेहऱ्याच्या मुलाचे - बघता क्षणी आवडेल असे व्यक्तिमत्त्व - त्याला बघून मुलाखतीचे दडपण जरा कमी झालेले. माझा स्वाक्षरी केलेला फॉर्म हातात पडल्यावर त्याने मराठीत काहीतरी विचारले - मग उरला सूरलेला फॉर्मलपणा नाहीसा झाला.... खाजगीत विचारावे अश्या सुरात 'किती जण येऊन गेले' हा प्रश्न भीत भीत (त्याला नाही - संख्येला) मी विचारला - 'अजून चालू झाले नाहीत इंटरव्ह्यूज्' ..... मी खूश ! आजूबाजूला काही हुशार काही ड्फ्फर चेहरे....एक-दोघे बोलबच्चन - ते सगळी कडून पिटून आलेले मोहरे असावेत-बोलण्यावरून दोनचार ठिकाणच्या नोकऱ्या त्यांनी नाकारल्याचे जाणवत होते. माझे टेन्शन परत वर जायला लागले - एकतर मराठी मीडियमचा पोऱ्या, त्यात भुसावळ सारख्या गांवातला ! नशीब 'विश्वनाथ' च्या जागी फाकडू पोरगी नव्हती नाही तर तिला इम्प्रेस करून करून त्यांनी माझ्यासारख्यांची फ्या..फ्या च उडवली असती.
विचारांच्या तंद्रीत असताना खांद्याला हलकासा स्पर्श जाणवला... तो मुलगा मला आंत जायला खुणावत होता.... धीरगंभीर चेहऱ्याने मी धीर न सोडता मध्ये गेलो. - 'बस !' आजोबा चक्क मराठीत बोलले ! पुढे एक एक करीत 'हिटलर' प्रश्न विचारत होता...... एकाही प्रश्नावर गाडी अडकली नव्हती व 'कळीचा' प्रश्न धाडकन समोर आला - ज्या प्रॉडक्ट्स मध्ये ती कंपनी काम करीत होती तिच्यावर आधारीत उत्पादने मी जळगांवला हाताळलेली होती. त्या प्रश्नाचे विचारपूर्वक उत्तर दिल्यावर 'हिटलर' जरा मवाळला.... "व्हेन वुड यू लाइक टू जॉईन ?" "टुडे ?" माझ्या उत्तरावर जपानी खळखळून हसला- "रहोगे कहाँ ?" हिट्लर ! "मामा है मेरा-वो पार्लामे रेहता है ।" बहुदा हिटलराला भारतातल्या पोरांच्या बेकारीचे प्रदर्शन जपान्यापुढे करायचे नसावे..... "ठीक है; बाहर जाकर बैठो !"....... मी बाहेर !
दोन चार पोरं मध्ये जाऊन फटाफट परत आली.. एक बोलबच्चन मध्ये गेला तो बराच वेळ अडकलेला होता.... दुसरा 'विश्वनाथ' वर फणफणायला लागला. मी 'विश्वनाथ'ला 'जरा जाऊन येतो' म्हटलं व जिन्याकडे सरकलो "मी.कुळकर्णी; ह्या बाजूला-" करीत त्याने बाथरुमची वाट दाखवायचा प्रयत्न केला - पण माझ्या हातातले सिगारेटचे पाकीट त्याला दाखवत मी आलोच चा इशारा करीत सटकलो व दोन मिनिटांतच परतलो - दुसरा बोलबच्चन मध्ये होता.
......थोड्या वेळाने विश्वनाथ मध्ये जाऊन आला... आल्यावर त्याच्या हातात एक व्हिजीटींग कार्ड होते. माझ्या हातात ते कार्ड कोंबून त्याने "उद्या ह्या पत्त्यावर सकाळी ९.३० ला या" असे मोघम सांगितले - कार्ड घेऊन मी रेंगाळतच खाली जायला निघालो....
नोकरी मिळाली की नाही हे कळलेलेच नव्हते! कार्डावर निळ्या अक्षरांत "जे. मित्रा & ब्र. प्रा.लि."हा मुलाखत पत्रावरचाच ठसा व पी. सुब्रमण्यम - मॅनेजर ऍडमिनीसीस्ट्रेशन - हे नांव!! नांव, चेहरा व हुद्द्यावरून आजोबांचे हे कार्ड असावे असे ताडले. कवळी बिल्डिंग, एस.के.बोले रोड- दादर प.- बॉम्बे २८ असा पत्ता !!! संभ्रमातच मामीला काय उत्तर द्यायचे ह्याचा विचार करीत मी मुंबई सेंट्रल स्टेशन ची वाट धरली -
माधव कुळकर्णी.

No comments: