Wednesday, December 6, 2006

नोकरी- एक प्रवास २

गाडीत बसल्यावर अचानक ट्यूब पेटली - रिटर्न तिकीट आहेच तर दादरला उतरून जागा बघून घेऊ म्हणजे सकाळी गडबडीत उशीर झाला तरी शोधण्यात वेळ जाऊ नये. कबूतर खाना ते पोर्तुगीज चर्च च्या रस्त्यावर मधोमध ही बिल्डिंग असल्याचे विश्वनाथ बोलल्याचे आठवत होतं. चालतच शोध घेता घेता शेवटी एकदाची दुमजली इमारत सापडली - शुद्ध चाळं !....- आधी विश्वासच बसेना - आपण नोकरीची स्वप्न पाहतो तेंव्हा आपले कार्यालय, तेथील वातावरण, आजू बाजूचे वातावरण हे सगळे कसे चित्रासारखे डोळ्यासमोर उभे राहते- जो बँकेत नोकरीस लागतो त्याच्या नजरेसमोर बँकेचे चित्र, जो इस्पितळात नोकरी धरतो त्याच्या नजरेसमोर ते चित्र..... मी एखाद्या बऱ्यापैकी सर्व्हिस इंडस्ट्रीचे स्वप्न मनांत बाळगलेले होते. - पहिल्या मजल्यावर जाणारा जिना चढत - मनांत म्हटले, 'अजून कुठे आपल्याला नक्की माहित आहे की, ह्याच कार्यालयात आपल्याला नोकरी करायचीय ?' परत फिरलो..... घरी मामींनी विचारले 'काय झाले ?''उद्या 2nd Interview घेतील बहुतेक.' मी उगीचच भाव खाल्ला ! 'दोनदोन-तीनतीन वेळा बोलावतात मेले, एकदा काय ते विचारून आटोपून टाकायचे !' मामींचा सात्त्विक संताप उफाळून आला.
दुसऱ्या दिवशी कालचेच कपडे न घालता वेगळा ड्रेस चढवून मी निघालो. जागा पाहून ठेवलेली त्यामुळे प्रॉब्लेम झालाच नाही. गेल्यावर अजून एक धक्का..... जागेला टाळे ! मी कपाळावर हात मारला! शेजारची लहान मुले उघडी नागडी फिरत होती.... बायका मंडळींचा टिपीकल चाळीतल्या सारखा आरडा ओरडा चालू होता... मध्येच एक माणूस गॅलरीत येऊन पचकन खाली थुंकून परत घरात जायचा.... ज्या गाळ्यात हे ऑफिस (?) होते तो गाळा जिन्याला लागूनच होता; जिन्यावरून अर्ध्या चड्डीत वर-खाली करणारी काही पुरूष मंडळी अगदी नमुनेदार बेवडी दिसत होती.... तेव्हढ्यात 'आजोबा' आले. त्यांच्या तुरुतुरु चालीवरून त्यांना यायला उशीर झाला असावा हे कळतच होते. वर आल्या आल्या अगदी जुन्या ओळखीचे हास्य त्यांच्या चेहऱ्यावर पसरले. चाव्यांचा एक जुडगा माझ्याकडे देत- व बंद दाराच्या शटर कडे बोट दाखवत त्यांनी मला कुलूप उघडण्याची खूण केली....... व माझ्या पहिल्या नोकरीचा प्रथम दिवस - दुकानासारखे दिसणारे ऑफिसचे शटर वर उघडून झाला !
तसे म्हटल्यास मी जळगांवला नोकरी वजा काम करीत होतोच; पण जेथे जायचो त्या गृहस्थांनी पगार वगैरे अश्या फॉर्मल गोष्टी कधी केल्याच नाहीत. रेल्वेचा पास काढून द्यायचे - अधून मधून खर्चाला पैसे द्यायचे; मन लावून काम शिकवायचे (हेच माझ्यासाठी महत्त्वाचे होते) व आपुलकीने वागायचे. 'इंस्टकॉन इंजिनियर्स' हे काही जळगावातले मोठं खटलं नव्हतं, पण माझ्या सारख्या कित्येक गरजूंना व्यवस्थित मार्गदर्शन करून स्वतःच्या पायावर उभे करण्याचे पुण्य त्यांनी पदरांत सामावून घेतलेले होते. ह्या दुकान वजा ऑफिसचे शटर वर करताना मला माहितही नव्हते की, जळगावात त्यांच्या कडे दुरुस्त केलेली काही इक्वीपमेंट्स माझ्या व्यावसायिक जीवनाची कवाडे सताड उघडी करतील.
सुब्रमण्यम साहेबांचे वय वाटत होते त्याहून बरेच कमी होते. हार्डली ४५चे ते गृहस्थ जरा पोक्त वाटत म्हणून मी मनांतल्या मनांत त्यांना आजोबा ठरवून मोकळा झालो होतो. गप्पा सुरू झाल्या.... श्री. सुब्रमण्यम साहेब दिल्लीला असत. माटुंग्यात त्यांचे आतापर्यंतचे आयुष्य गेलेले. विश्वनाथन हा त्यांच्या सख्ख्या बहिणीचा मुलगा ! काही कामासाठी बाहेर गेलेला होता तो तासाभरात येणार होता. आधीचे ऑफिस वरळीला होते ते मित्रा साहेबांच्या जावयाने लाटले - म्हणून ही व्यवस्था तातडीने व तात्पुरती करावी लागलेली होती. हिटलरचे खरे नांव 'पवन' आहे व तोच माझा डायरेक्ट बॉस असणार होता - सर्व्हिस मॅनेजर ! मी मोठा आवंढा गिळला..... मनात म्हटले ह्या तुफानाचे नांव पवन कोणी ठेवले असावे ? माझ्या बरोबर अजून एकाची नियुक्ती झालेली होती - त्याचे नांव प्रसाद कुळकर्णी होते - तो येण्यातच होता..... विश्वनाथन वर तणफण करणारा दुसरा बोलबच्चन अवतरला- माहित नाही का..... पण ज्याच्याशी पहिल्या भेटीत माझे सुर जुळत नाहीत त्याच्याशी जन्मभर ते तसेच राहतात. आमच्या दोघांच्या नशिबाने त्याने दीड महिन्यातच कंपनी सोडली ! माझा पगार रुपये ९००/- ठरवण्यात आलेला होता - व ८ जुलैला मला प्रशिक्षणासाठी दिल्लीला प्रस्थान करायचे होते...... ह्या सगळ्या गप्पा मारीत सुब्रमण्यम साहेबांनी तीनदा चहा मागून प्यायले. चहाची गंमत तर न्यारीच होती... टेबलावरचा फोन उचलून ते चहावाल्याला फोन करीत - दहा मिनिटे झाल्यावर परत रिमाइंडर देत - तेंव्हा कुठे चहा येई. तोही स्टीलच्या वाटीत उपड्या ग्लास मध्ये - एकुलता एक. मला गंमत वाटली.... एक चहा - पिणारे सुरुवातीला आम्ही दोघे - नंतर २ चहा - तिघे ! मग ३ मध्ये विश्वनाथ आल्यावर चौघे.... ! पण फोन मात्र ७/८ गेले असतील....
मी व प्रसादने सुब्रमण्यम साहेबांकडूनच पैसे घेऊन मुंबई सेंट्रलला जाऊन राजधानीचे चेअर कारचे तिकीट काढले - तेथेच प्रसादने मला सांगून टाकले- 'इथला सीन काही ठीक नाही; मला नाही वाटत मी जास्त दिवस येथे टिकेन' 'मग तू त्यांना सांगत का नाहीस ?' 'अरे, मला दोन महिन्यांनी जरा बऱ्यापैकी जॉब मिळणार आहे. तोवर टाइम पास होईल'..... जेथे दात आहे तेथे चणे नाही व जेथे चणे आहेत तेथे दात नाहीत !
दिल्लीला प्रथमच जात होतो. पटकन भुसावळला जाऊन उरलेले कपडे घेऊन यावे लागणार होते. विचार करायलाही उसंत मिळत नव्हती. दिल्लीला जायच्या आधी श्री. सुब्रमण्यम कडून प्रॉडक्ट्स ची काही माहिती मिळवली - थोडा अभ्यास केला व प्रशिक्षणासाठी दिल्लीला रवाना झालो..... रात्रभर चेअर कार मध्ये डोळ्याला डोळा लागलेला नव्हता..... एक जीवन - एक प्रवास सुरू केल्याची जाणीव मनात होती, हा प्रवास पूर्ण होईल की नाही त्याची धास्ती मनांत होती !
*************************************
आज जवळपास २० वर्षे झाली. हा अभ्यास, हा प्रवास अजूनही चालूच आहे.... मधल्या काळात बऱ्याच घडामोडी घडून गेल्या - नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला - नोकरीत काही गमतीदार घटना घडल्या, काही काळजाला घरे पाडणाऱ्या घटना !- कुठे अंगावर शहारे आणणारे अपघात झाले तर दर्शनासारखी पत्नी मिळाली..... नोकरीत सुरू केलेले हे व्यस्त जीवन कुठे जाऊन थांबेल, देव जाणे- पण नोकरीतला तो प्रवास मात्र मनांत कायम घर करून राहिलाय !
श्री. सुब्रमण्यम, श्री.पवन, मॅथ्यु, विशू, अब्राहम (माझा व्यवसाय भागीदार) मिलिंद जोशी इ. माझे जुने सहकारी आजही माझ्या ह्या प्रवासातले सहप्रवासी आहेत हे गेल्या जन्माचे ऋणानुबंध तर नव्हेत ?

No comments: