Wednesday, December 6, 2006

ठाणे कट्टा- अनुभवकथनठाणे कट्ट्यावर प्रत्येक उपस्थित मनोगतीने आपला आविष्कार प्रकट केला. मी माझ्या कलकत्त्याच्या रहवासातले अनुभवकथन काहीसे अशा रितीने केले..... शब्द न् शब्द आठवत नसला तरी कथन असे होते-
*******************
आपल्या जवळ जे मुबलक प्रमाणात उपलब्ध असते त्याची किंमत आपणास कळत नसते हा अनुभव मला महाराष्ट्र व मराठी माणसे सोडल्यावर मिळाला.
जेथे पूर्वी नोकरी करीत असे तेथून 'कलकत्त्याचे कार्यालय' उघडण्याचा व सुरू करण्याचा आदेश हातात पडला..... बदली झाल्याक्षणी कलकत्त्याची काही जुजबी माहिती काढली व बाड बिस्तर घेऊन मार्गस्थ झालो. कलकत्त्याचा कर्मचारी (जो आधीच नेमला गेला होता) वेळेवर हावडा स्थानकावर घ्यायला आलाच नाही. ५/६ तास वाट बघून शेवटी जायचे ठरवले.
'तुला कुठे काही समस्या आल्यास हाजरा रोड वरील महाराष्ट्र मंडळात जा' असे मामांनी निघताना सांगितल्याचे एकदम आठवले. कसे बसे एकदाचे सामान टॅक्सीत कोंबले व हाजरा रोड वरील महाराष्ट्र निवासात पोहचलो....
टॅक्सीतून सामान उतरवत असतानाच दारवानाने प्रश्न केला "क्या साब ट्रान्स्फर हो गया है क्या ?"
"अरे वा तुला कसे कळले ?"
"सब मराठी लोग ट्रान्स्फर होने के बाद इधर ही आते है !" ( चला मीच एकटा मूर्ख ठरलेलो नव्हतो तर !)
व्यवस्थापक श्री. प्रभाकर डोळ्यांकडे जाऊन उभा राहिलो-
"खोली ? एप्रिल महिन्यात सगळे बुक असते हो कुळकर्णी "
"काहीतरी करा आता, मी तर सगळे सामान घेऊनच आलो आहे."
"डॉर्मेट्रीत सोय करतो मग दोन दिवसात बघू काय करायचे ते !"
स्थिरस्थावर झाल्यावर व भाड्याने घर घेतल्यावर नियमित महाराष्ट्र निवासात जाऊ लागलो.
तेथल्या वयस्कर मंडळींनी आस्थेने विचारपूस करीत ओळख वाढवली. सम वयस्क मंडळीही येता जाता स्मितहास्य देत असत. हळू हळू मी कलकत्त्यात रुळू लागलो होतो.....
अचानक एक दिवस मला अपघात झाला व माणुसकीचा प्रत्यय ह्या नवख्या शहरात आला. फक्त महाराष्ट्र निवास हे उद्गार तोंडातून बाहेर पडताच महाराष्ट्र निवास व मंडळाच्या सदस्यांनी जी मदत केली ती आयुष्यात न विसरण्याजोगी आहे. इस्पितळात दोन वेळचा डबा ते औषधोपचार व सर्व प्रकारची मदत ह्या अनोळखी मराठी मंडळींनी केली.

आज मी कलकत्त्याच्या ह्याच महाराष्ट्र मंडळाचा आजीव सदस्य आहे. नंतरच्या काळात युवा सचिव (युथ सेक्रेटरी) होतो, एकांकिका स्पर्धेत एकांकिका दिग्दर्शित केली, गणेशोत्सवात सक्रिय सहभाग होताच.... व मुंबईला परते पर्यंत असंख्य नाती जोडली गेलीत. आजही ही नाती टिकून आहेत व मैत्री दृढ झालेली आहे !

कोणाची कलकत्त्याला बदली झाल्यास हाजरा रोड वरचे महाराष्ट्र निवास व श्री. प्रभाकरराव डोळे हे नांव लक्षात ठेवा..... बाकीची सोय आपोआप होईल !

No comments: