Saturday, March 10, 2007

तेजस्विनी-१०

मोहिनी इंगळेला बघायला खूप गर्दी जमायची. मोहिनीचे भाषण म्हणजे 'ह्याला मत द्या, त्याला मत द्या व बरोबरीने मलाही मत द्या' इतकेच असे. पण तरी खाली बसल्यावर तिला मिळणाऱ्या टाळ्या बरेच काही सांगून जात होत्या. निवडणुका दहा दिवसांवर येऊन ठेपल्या. प्रचाराला जास्त वेळ मिळावा म्हणून राजाभाऊ व सुरेखा वहिनींनी रजा टाकलेली होती. संतोषभाऊंनी घेतलेल्या एका बैठकीत उद्यापासूनच आसपासच्या खेड्यांवरच्या प्रचारावर भर देण्यात येणार असल्याचे घोषित केले. संतोषभाऊ, देसाई साहेब, राजाभाऊ अशी निवडणुका न लढवणारी एक फौज भाजमोच्या कार्यकर्त्यांच्या सोबत त्यांच्या उमेदवारांच्या जाहीर सभांना व प्रचाराच्या कार्याला जुंपली गेली तर जनजागृतीचे खंदे कार्यकर्ते व निवडणुका लढवत असलेले उमेदवार एकत्र प्रचाराला निघत.कधी त्यांची गाठ 'विकास आघाडी' च्या कार्यकर्त्यांशी समोरासमोर होई. ओळखीचा गट असल्यास हस्तालोंदनापासून ते गळाभेटी पर्यंत सर्व उपचार हसत हसत पार पडत. कधी हळूच एकमेकांना शाब्दिक चिमटे काढत वातावरण खेळीमेळीचे ठेवले जाई..... तर कधी अनोळखी कार्यकर्ते समोर दिसल्यास जोरदार घोषणा युद्ध होई. एकमेकांच्या नेत्यांचा जाहीर उद्धार केला जाई, 'अमक्याच्या बैलाला ढोल... वगैरे शाब्दिक चकमकीही झडत. हे सगळे वातावरण सुरेखाताईंना नवखे होते. पण त्या आता ह्या वातावरणात चांगल्याच रुळल्या होत्या.ओरडून ओरडून व सतत बोलून घसा दुखे, मग दिवसांतून आठ दहा वेळा गरम पाण्याने गुळण्या करून घसा शेकावा लागे.
खेड्यातल्या प्रचार सभांसाठी दोन जीपड्या व १४/१५ कार्यकर्त्यांसोबत त्यांना जावे लागे. खडक्यातल्या प्रचारसभेसोबत माहेजी, वरणगांव, मुक्ताईनगर वगैरे गावांतला प्रचार एक दिवस ठरला. नेहमीप्रमाणे जीपमध्ये पुढे त्या व अजून दोन महिला कार्यकर्त्या तर मागे तरुणांचा तांडा व दुसऱ्या गाडीत इतर काही पोरांबरोबर आज प्रियांकही आलेला दिसला. त्याला ओळखीचे एक स्मितहास्य देत त्या गाडीत बसल्या. ह्या मतदारसंघांत वासूभाऊंनी बरेच कार्य केले होते. त्यांना प्रचारसभेला न नेता त्यांच्या वयाचा मान ठेवण्याची गळ मतदारांना घालायची ठरले. प्रथमच सुरेखाताईंनी भाषणांचा सर्व भार स्वत:वर उचललेला होता. दोन चारशे जणांच्या धनगरवस्त्यांपासून वरणगांवातल्या बसस्टॅंड समोरच्या जंगी सभांतून त्यांनी दणदणीत भाषणे केली.महिलांच्या समस्या, शेतकरी महिलांचे प्रश्न, त्यांच्यावर होणारे अत्याचार, दारूबंदी इत्यादी प्रत्येक घरगुती समस्यांवर सुरेखाताई आवर्जून बोलत. "ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत येथले स्थानिक प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत तेव्हा त्यावरच जास्त भर दे, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय महिला समस्यांवर बोलू नकोस कारण त्यात येथल्या बायकांना काहीही रस नाही" हा राजाभाऊंचा इशारा त्यांनी बरोबर अमलांत आणलेला होता. त्यामुळे जेव्हा भाषण संपल्यावर त्या बायकांशी थेट भेटून संवाद साधत तेव्हा त्यांच्या भाषणाची पावती त्यांना लगेच मिळे.खेड्याखेड्यांतून सुरेखाताईंना चांगला प्रतिसाद मिळत होता. पुरूष वर्गही त्यांच्या भाषणाची खिल्ली न उडवता, मास्तरीण बाईचे भाषण मन लावून ऐकत. भराडे बाईंइतक्या टाळ्या मिळत नसल्या तरी मोहिनी सारख्या शिट्ट्याही पडत नव्हत्या. एक शोभेची किंवा बोलभांड बाई कशी असते ते बघण्याऐवजी मास्तरीण बाई काय बोलणार हे ऐकायला गाव~खेड्यातली लोकं गर्दी करीत होती.
मुक्ताईनगरची त्या दिवसातली शेवटची प्रचारसभा संपली तेव्हा रात्रीचे आठ वाजत आलेले होते. स्थानिक महिलांसोबत फिरत त्यांनी घराघरांतून थोडा प्रचारही करून घेतला. सोबत आलेला भाजमोच्या तरुणांच्या तांड्याने बसवलेले वगनाट्य व्यासपीठावर सुरू होते. नानासाहेब पाटलांचे व त्यांच्या दिवट्या चिरंजीवाचे अत्याचार हा वगनाट्यातला छुपा विषय होता. वगनाट्याला पडत असलेल्या लोकांच्या टाळ्या व शिट्ट्यांची आता चांगलीच सवय झालेली होती. दोन चार तरुण पोरांबरोबर प्रियांकही घरोघरी प्रचार करण्यासाठी सोबत घुटमळत होता. वगनाट्य संपले तेव्हा रात्रीचे साडे नऊ वाजलेले होते. तिथल्याच एका कार्यकर्त्याच्या घरी झुणका भाकरीच्या साध्या जेवणाचा कार्यक्रम आटोपला व तांडा घरी परतण्यासाठी निघाला.मध्येच ऍक्सल का काय तुटला म्हणून सुरेखा ताईंचं जीपडं बंद पडले. मनातल्या मनात त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. शेवटी दुसऱ्या जीपड्यांत बायका व मावतील तितकी मंडळी कोंबून बसवून न्यायच ठरलं. पाच सहा जण मागेच राहिली. परतीच्या प्रवासांत थकलेल्या सुरेखाताईंना झोपेची ग्लानी चढत होती. रस्त्यातल्या खड्ड्यांतून बसणारे आचके डोकं वर आपटवत होते. आधारासाठी जेमतेम समोरचा दांडा धरून त्या बसल्या होत्या. उजवीकडे शेजारी बसलेल्या दोघी बायका प्रत्येक खड्ड्यागणिक अंगावर आदळत होत्या. डावीकडे बसलेला प्रियांक जवळपास जीपच्या बाहेरच लोंबकळत होता. आधारासाठी त्याने मागच्या सीटवर ठेवलेला हात सारखा सुरेखाताईंच्या खांद्यावर घसरत होता म्हणून त्या थोड्या पुढे सरकल्या, इतक्याश्या जागेतही थोडी जागा बनवून प्रियांक मध्ये सरकल्याचे त्यांना जाणवले.त्यानंतर जे घडतं गेले तो प्रकारच त्यांच्यासाठी भयावह होता. प्रियांकने आधारासाठी ठेवलेला मागचा हात सरळ उजव्या खाकेत सरकवून त्यांना स्वत:कडे ओढायला सुरुवात केली. एक दोन वेळा तोंडाने 'चक्क' असा आवाज करीत त्या थोड्या मध्ये सरकल्या पण त्यामुळे प्रियांकसाठी सरकायला अजूनच जागा तयार झाली. शेवटी 'प्रियांक, नीट बस' अस सांगूनही तो बधेना. त्याच्या मनातले घाणेरडे विचार त्याच्या अंगलटीला येणाऱ्या कृतीतून स्पष्ट कळत होते. नशिबाने घर आले व सुरेखाताईंनी सुटकेचा निःश्वास सोडला. मागे वळूनही न पाहता तरतर त्या घराकडे चालू लागल्या.त्यांच्या अंगातल्या घामाच्या धारा व डोळ्यांतला संताप बघून राजाभाऊही क्षणभर अवाक झाले."काय झाले गं ?" ह्या त्यांच्या प्रश्नाला "अंघोळ करून येते, मग सांगते." इतकेच उत्तर देत त्या सरळ न्हाणीघरांत शिरल्या.
उजवी खाक खसखसून घासली तरी प्रियांकने तेथे केलेला तो घाणेरडा स्पर्श त्यांना अजूनही जाणवत होता.*****************************सुहास पाटलांच्या मनाजोगती एकुलती एक रावेरची जागा त्यांच्या साडूला मिळाली. त्या जागेवरून नानासाहेबांच्या समोरच दोघा भावांत चांगलीच जुंपली. रावेरला विरोधी पक्षातर्फे भाजमो चा नवीन उमेदवार होता. ह्या रणधुमाळीतली विकास आघाडीची तीच जागा 'सेफ सीट' मानली जात होती. जनजागृती व भाजमो ची युती झाल्यानंतर भाजमो च्या वाट्याला आलेल्या रावेरच्या ह्या जागेवरून सुहास पाटलांचा साडू राजू यावलकर उभा होता त्याला सरळ लढत होती ती भाजमोच्या कॉलेज कुमार नवख्या अजय फालकची.तालुक्यातल्या बाकी सर्व जागांवर सुनीलच्या माणसांना अपार कष्ट घ्यावे लागणार होते. नानासाहेब पाटील जातीने स्वत: प्रचारात उतरले होते. तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीतल्या समर्थकांना पूर्ण प्रदेश पिंजून काढण्याची सक्त ताकीद देण्यात येत होती. कुठेही विरोधकांनी डोके वर काढू नये म्हणून सर्व प्रकारची यंत्रणा नानासाहेबांनी कामाला जुंपलेली होती. राजेंद्र गाजरेनेही स्वत:ची कुमक सुनीलसाठी कामाला लावलेली होती. मतदारसंघातल्या ३ व तालुक्याशी जोडलेल्या पंचायतीच्या ८ अशा ११ जागांसाठी विकास आघाडीने स्वत:ची असलेली नसलेली सर्व प्रतिष्ठा पणाला लावून लढत देण्याच्या तयारी केली होती.विचारेसाहेबां समोर सुनीलची सरळ लढत होती. फेगडेंची लढत वासूभाऊंशी होती तर मोहिनी इंगळे समोर पाटलांची मावसं सून सुरेखा जाधव उभी होती. अट्रावलची जागा नानासाहेबांच्या हातून गेल्यातच जमा होती. तर निंभोरा, सावदा येथे मिळालेल्या उमेदवार विरोधी पक्षांच्या महिला उमेदवारांच्या समोर मिळमिळीतच होत्या. उरलेल्या ५ जागांवर संमिश्र यश जमेस धरले तरी ह्यावेळी तालुक्यात पक्षाला व पर्यायाने नानासाहेबांना जोरदार फटका पडणार असल्याचे जवळ जवळ निश्चित होते. सुनील पाटलाच्या रागाचे कारणही तेच होते. जवळच्या साथीदारांना सहजसाध्य मतदारसंघ रावेरचा होता व तोच सुहासच्या साडूला द्यावा लागलेला होता.प्रचाराचा शेवट जवळ येत होता. शेवटची रणधुमाळी सुरू होत होती. सभा गाजू लागलेल्या होत्या. गांवात शेवटच्या सभा नानासाहेब, राजेंद्र, सुनील व सुहासने ठरवल्या होत्या. पूर्ण ताकद शेवटच्या घावासाठी राखून ठेवण्यात येणार होती.***************************राजाभाऊंना झोपलेले पाहून घडलेला प्रकार उद्या सांगावा ह्या विचारांत सुरेखाताई बिछान्यावर पडल्या पण त्यांना झोप काही येईना. सारखा तो प्रसंग त्यांना आठवून दु:खाचे कढ येऊ लागले. महिलांच्या प्रश्नांवर तळमळीने बोलताना आपल्याशीही असा अतिप्रसंग होऊ शकेल ह्याची अस्पष्टशीही कल्पना त्यांनी केली नव्हती. राजाभाऊंना हे कळले तर संताप तर येईलच पण वाईटही वाटेल हे त्या चांगलेच जाणून होत्या. दोघांचेही चित्त विचलित होणार होते पण ह्याबद्दल गप्प बसणे त्यांना रुचत नव्हते. ह्या असह्य प्रकाराबद्दल काय करावे, कोणास सांगावे हे त्यांना सुचत नव्हते. राजाभाऊंना उठवून झाला प्रकार सांगावा असे त्यांच्या मनात आले पण त्यांना शांतपणे झोपलेले पाहून त्यांनी विचार बदलला.अचानक त्यांना एक अनोखी कल्पना सुचली. संतोषभाऊंच्या मुलीला प्रियाला हा प्रकार सांगितल्यास ती समजूनही घेईल व भावाची कान उघडणीही करील ह्या विचारात असतानाच थकलेल्या सुरेखाताईंना झोपेने घेरले.
वैशुला सांभाळण्यासाठी व वरच्या घरकामासाठी मध्यमवयीन बाई मिळाल्याने सासूबाईंचा बराचसा व्याप कमी झालेला होता. सकाळीच घरांतली आवराआवर व स्वयंपाक करून त्या प्रचारासाठी निघणार होत्या. राजाभाऊ भुसावळच्या प्रचारावर निघत ते दिवसाचे जेवण तेथेच करीत. राजाभाऊ गेल्यावर त्यांनी संतोषभाऊंकडे फोन लावला. वहिनींना फोनवर प्रियाशी काम असल्याचे सांगितले; प्रियाला आपल्या घरी येण्याचा आर्जव करीत त्यांनी फोन ठेवला तेव्हा त्यांना जरा बरे वाटले.प्रियाला अडखळत त्यांनी आदल्या रात्री घडलेला प्रकार सांगितला. तिलाही भावाचा संताप आलेला होता पण दोघींनी सध्या संतोषभाऊंना किंवा वहिनींना झालेला प्रकार न सांगता प्रियाने फक्त भावाची हजेरी घ्यावी असे ठरले.**************************शेवटच्या सभांना वासूभाऊ, विचारे साहेब, राजाभाऊ, भराडे बाई, संतोषभाऊ ह्या सगळ्यांची हजेरी असणार होती. शेवटच्या तीन दिवसांत तालुक्यातल्या वेगवेगळ्या सोळा ठिकाणी सभांचे आयोजन केलेले होते. त्यानंतर मात्र प्रचार संपणार होता व मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन मतांची भीक मागितली जाणार होती.ह्या शेवटच्या सभांपैकी एक सभा नानासाहेब पाटलांच्या वाड्यासमोर भरवण्यात आलेली होती. नानासाहेबांनी आपल्या सरपंचपदीच्या काळात मुलीच्या लग्नासाठी कडुनिंबांच्या दोन झाडांमध्ये हे पक्के व्यासपीठ बांधून घेतले होते ते अगदी वाड्याच्या समोर.व्यासपीठावरून बोलणारा माणूस पाटलांच्या पडवीतून स्पष्ट दिसे.... ह्याच स्टेजवर त्यांच्या दोघा पोरांनी अनेक वेळा तमाशातल्या बायकाही नाचवल्या होत्या.... नानासाहेबांच्या अनेक विजयी भाषणे येथूनच झालेली होती.... येथूनच अनेकांना शिक्षा सुनावण्यात आलेल्या होत्या..... अनेकांची घरेदारे उघड्यावर नेणारे निर्णय येथूनच घेण्यात आलेले होते.....
महिलांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना आज येथूनच तोंड फुटणार होते....नानासाहेब पाटलांची मावसं सून आज ह्याच व्यासपीठावरून खणखणीत बोलणार होती....तालुक्यातल्या एकाधिकारशाही व सरंजामशाही बद्दल आज एका 'तेजस्विनी'चा आवाज सर्वत्र घुमणार होता....
व्यासपीठासमोरच्या भल्यामोठ्या पटांगणावर यावलकरांची तोबा गर्दी जमलेली होती. भाजमो च्या शिस्तबद्ध कार्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे वगनाट्याचा प्रयोग सुरुवातीला सादर केला त्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जनजागृतीच्या व सुरेखाताईंच्या सभा चांगल्याच गाजलेल्या होत्या. आजच्या सभेसाठी प्रचंड जनसमुदाय जमलेला होता. वासुभाऊंपासून ते भराडे बाईंपर्यंत नेहमीची भाषणे झाली. सुरेखाताईंचे नांव पुकारण्यात आले व त्या तडफेने उभ्या राहिल्या.एक वेगळीच शांतता वातावरणात पसरली.आत्मविश्वासाने दमदार पावले टाकत सुरेखाताई माइक कडे चालू लागल्या.आपल्याच हाताने माइकची उंची स्वत:स साजेसी करीत व किंचित फुंकर मारून माइक चालू असल्याची खात्री करून त्या बोलू लागल्या......
"व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरहो, माझ्या प्रचारात राबणारे पक्ष कार्यकर्तेहो व माझ्या मतदार बंधुभगिनींनो, आपणांस आदरपूर्वक अभिवादन. ह्या व्यासपीठावरून हे भाषण सुरू करताना माझ्या भावना मी तुम्हांस कशा सांगू ?आपल्या गांवातली एक सून आज आपल्याजवळ स्वत:चे मनोगत मांडत आहे.खरंतर सुनेला उंबऱ्याच्या आंत ठेवण्यात प्रतिष्ठा समजली जाते....पण बंधुभगिनींनो, आपल्याच माणसांवर अत्याचार होत असतील तर कुठलीही सून गप्प बसून राहणारी नाही.घरातल्या गोष्टी ओट्यावर आणण्याची वेळ ह्या अत्याचारांमुळे आज आलेली आहे.....कितीही सासुरवास झाला तरी मुकाट्याने बसून सहन करण्याचे ते दिवस संपलेले आहेत......सुनाबाळींना गुलाम म्हणून वागवणाऱ्यांना जाब विचारण्याची वेळ आज आलेली आहे.....
ह्या पंचक्रोशीतल्या थोरामोठांच्या कथा मी सून म्हणून येथे येण्यापूर्वीपासून मला तोंडपाठ आहेत.स्वातंत्र्याच्या मुक्तिसंग्रामात गेलेले बळी, यावलच्या कोर्टावर तिरंगा फडकवणारे कलम केलेले हात आज आठवा.....इथल्या सुनाबाळींचे पांढरे कपाळ व अनाथ झालेल्या पोरांचे आक्रोश आज आठवा.....येथल्या उसळ्या घेणाऱ्या रक्तांना थांबवण्यासाठी जखमांमध्ये गादीतला कापूस काढून कोंबल्याच्या त्या कथा आठवा.....भारत पाक युद्धात शहीद झालेले ते यावलचे वीर जवान आठवा.....व आजच्या युगातला त्या अट्रावलला घडलेला तो घृणास्पद प्रकार आठवा......मला कधी वाटलेही नव्हते की, भारत स्वातंत्र्य होऊनही एका नव्या क्रांतीचा लढा मला येथून सुरू करावा लागेल !
माझ्या बंधुभगिनींनो मी शिक्षिका म्हणून माझा संसार सुखात करीत होते.....पण माझ्या सासरच्या माणसांवर होत असलेले हे अत्याचार मला उघड्या डोळ्यांनी पाहवेनात.माझ्या शिक्षणाचा फक्त शिक्षिका म्हणून फायदा झाला, तर उपयोग काय ?......शिक्षणाने सुसंस्कृतपणा नाही आला, तर त्या शिक्षणाचा उपयोग तो काय ?......ह्या गांवासाठी मला काही करता नाही आले, तर माझा ह्या गांवाला उपयोग काय ?......मी ह्या वणव्यात उडी घेतेय ती माझ्या सासरच्या माणसांवर होणाऱ्या अत्याचारांना तोंड फोडण्यासाठीच.....माझ्या भगिनींच्या प्रश्नांना तोंड फोडण्यासाठी.....येथली एकाधिकारशाही कायमची नष्ट करण्यासाठी.....
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण मिळाल्याने एक नवी संधी आपल्या सर्वांसमोर चालत आलेली आहे.हा हक्क आता फक्त मतदानापुरता नाही तर निवडणुका लढवून आपल्या समस्यांवर उत्तरे शोधण्याचा आहे....हा हक्क फक्त शेतात राबण्याचा नसून आपल्यावर अत्याचार करणाऱ्यांच्या पाठीवर आसूड ओढण्याचा आहे.....हा हक्क आपल्या अंगलटीला येणाऱ्या प्रत्येक मवाल्याच्या थोबाडीत देण्याचाही आहे.....
शेतात राबायचे, घरात राबायचे.धुणी-भांडी करायची, उष्टी-खरकटी काढायची.जेवायला समोर येईल ते उरले सुरलेले खायचे व नेसूला जे मिळेल त्याने आपली लाज झाकायची !हेच आजवर आपल्या गोरगरीब भगिनींना ठाऊक होते......पण आता मुलींच्या शिक्षणाचा सर्व भार सरकार उचलणार आहे.... त्यांना शाळा, महाविद्यालयांतून फी माफ करण्यात आलेली आहे,तेव्हा आता आपल्या मुलीला सुशिक्षित करणे हे प्रत्येक महिलेने आपले परम कर्तव्य समजावे.तिला भावंडे सांभाळत बसवण्यापेक्षा शाळेत पाठवून शिक्षण व चांगले संस्कार तिच्या बालमनावर घडवावे.
माझ्या भगिनींनो, महिलांना स्वयंरोजगारासाठी सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यांचा योग्य फायदा उचला.टंकलेखन मशीन, शिलाई मशीन, कांडप-गिरणी, पिको फॉल मशीन, एम्ब्रॉयडरी मशीन सारख्या मशीन सरकारतर्फे सबसीडी सह वाटल्या जातात. त्यावर प्रशिक्षण घेऊन स्वत:चा व कुटुंबाचा उदर निर्वाह सन्मानाने करता येतो त्याचा महिलांनी फायदा घ्यावा.गरीब व विधवा स्त्रियांच्या मुलींच्या लग्नासाठी अनुदान मिळते, मुलींना शिक्षणासाठी दूरवर जायचे असल्यास सायकल घेण्यासाठी अनुदान मिळते. सुर्यचुली, निर्धार चुली, खानावळ चालवण्यासाठी अनुदान, महिलांना मोफत चष्मे व विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन सरकार तर्फे करण्यात येते.
ह्या पूर्वीच्या सरपंचांनी व पंचायतीच्या अध्यक्षांनी अनुदाने स्वत:च्या खिशांत घातली त्याचा जाब आता मी त्यांना विचारणार आहे.....महिलांच्या नावाने पैशांची उचल करून तमाशाचे फड नाचवले त्याचे हिशेब आता त्यांना द्यावे लागणार आहेत......महिलांच्या अश्रूंचे मोल त्यांना येथेच द्यावे लागणार आहे.....
माझ्या भगिनींनो आता घाबरण्याचे कारण नाही..... आता आपल्या ह्या सख्या, आपल्या भगिनी आपल्यासाठी लढा देतील.आपल्या अन्यायाचा जाब विचारणारा पक्ष आज निर्माण झालेला आहे,तो आपले अश्रू वाया जाऊ देणार नाही त्याचे मोल आपल्याला मिळेलच.....'जनजागृती' पक्ष आपल्या सहकारी 'भाजमो' पक्षासोबत महिलांच्या प्रश्नांवर योग्य तोडगा काढील....ही मी माझ्या पक्षातर्फे आपल्याला ग्वाही देते.
ह्याच व्यासपीठावरून नानासाहेब पाटलांनी अनेक अन्याय केले.....येथल्या गरीब जनतेच्या जमिनी घशांत घालणारे निर्णय दिले.......निर्मल पाटलांना मारून रेल्वेखाली फेकण्याचे कट कारस्थान ह्याच ठिकाणी झाले.....येथेच तमाशातल्या बायका नाचवल्या तर गांवातल्या बायका नागवल्या गेल्या......गोरगरीबांना वाड्यावर बोलवून चाबकाने फोडण्यात आले, मुस्लिमांच्या घरादारांवरून नांगर फिरवले....ह्या गोरगरीबांवरच्या अत्याचारांचा व अश्रूंचा जाब आज मला हवाय.......अनेक शासकीय योजनांचे पैसे घशात घातले त्यांचा हिशेब मला हवाय......गोरगरीबांच्या जमिनी बळकावल्या, त्यांना देशोधडीला लावले त्याचा जाब मला हवाय.....
ह्या नानासाहेब पाटलांचे अत्याचारी राज्य संपवण्याचा आज निर्धार करा....ह्या तुळशीच्या बागेत उगवलेल्या गांज्याच्या रोपटाला उखडून फेकण्याचा निर्धार आज करा....जिल्हा परिषदांच्या निवडणूकीत 'जनजागृती' पक्षाच्या 'टांगा' ह्या निशाणीवर शिक्का मारून,विकास आघाडीला जोरदार 'धक्का' द्यायचा निर्धार आज करा....... ही माझी कळकळीची विनंती आहे.एवढे बोलून मी माझे भाषण संपवते.... जयहिंद ! जय महाराष्ट्र ! "
अखंड टाळ्यांच्या गजरासोबत 'सुरेखाताई झिंदाबाद, जनजागृती पक्षाचा विजय असो' अशा जोरदार घोषणा सुरू झाल्या.....
..........लांब कुठेतरी, एका दगडावर एकटे बसलेल्या वैद्य बुवांच्या डोळ्यांत आलेले आंनदाश्रू कुणी पाहिलेही नव्हते !

No comments: