Saturday, March 10, 2007

तेजस्विनी~१

खूप वर्षांपूर्वी एक कथा वाचण्यात आली होते. कथेचे नांव, लेखकाचे नांव आता साफ विसरून गेलोय पण गावात वाढल्याने त्या कथेचा विषय चांगलाच लक्षात राहिला. ग्रामीण भागातल्या राजकारणाचा विषय पुस्तकात होता. मनोगतावर आल्यावर ह्या विषयावर काहीतरी लिहावेसे सतत वाटत होते, महाराष्ट्रात स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. ह्या पार्श्वभूमीवरील लेखन आजवर मनोगतावर झालेले नसल्याने आज ही कथा येथे देत आहे. कथा खूप मोठी आहे कारण विषयही तितकाच मोठा आहे.
जिल्हा पंचायत व ग्राम पंचायत ह्या दोन वेगवेगळ्या स्वायत्त संस्था आहेत. ज्या गावांची लोकसंख्या मर्यादित असते तेथे ग्रामपंचायती मार्फत कामे केली जातात. पण जनसंख्येची मर्यादा ओलांडल्यावर तिला जिल्हा पंचायतीचा दर्जा प्राप्त होतो. एका जिल्ह्यात बरेच तालुके असतात. प्रत्येक तालुक्यात गांवे समाविष्ट केलेली असतात. प्रत्येक गांवातून वस्त्या, पाडे इत्यादी उपविभाग पाडले जातात. छोट्या गावांत सरपंच व/वा पोलिस पाटील कारभार बघतो तर थोड्या मोठ्या गांवात ग्रामपंचायती मार्फत कारभार केला जातो. येथे टर्मिनॉलॉजीची (व्याख्येची) सरमिसळ होऊ नये म्हणून हा खुलासा करणे भाग पडत आहे. कथा वाचताना कुठेही व्याख्येची सरमिसळ माझ्या चुकीने झाली असल्यास किंवा वाचक स्वतः: गोंधळल्यास ही टीप जरूर वाचावी...... सर्व खुलासे प्रतिसाद देण्यापूर्वी होतील.
सरकारने स्थापीत केलेल्या सर्व स्वायत्त संस्थांचा शक्य तितका अभ्यास करून ही कथा लिहिली आहे..... कुठे त्रुटी आढळल्यास माझे ज्ञान वृद्धिंगत करणारे प्रतिसाद अवश्य द्यावेत. ह्या संदर्भात इतर मनोगतींचा काही अभ्यास असल्यास जरूर नमूद करावा जेणे करून वाचकांसाठी नेमक्या माहितीचा प्रसार होईल.
ह्या कथेची कल्पना नक्कीच त्या पुस्तकावरून मिळाली. गेले काही महिने ह्यावर लिखाण सुरू होते. कथा ज्या पुस्तकातल्या विषयावर आधारित आहे, त्याचे नांव - लेखकाचे नांव हे आठवत नसल्याने त्याचा उल्लेख करता येत नाही त्याबद्दल खेद आहे परंतु विषयाची कल्पना सोडल्यास बाकी सर्व मेहनत माझी आहे ह्याची खात्री बाळगा.
कथा आवडली तर त्याचे श्रेय त्या अनामिक लेखकाला नक्की द्या....... न आवडल्यास मी कुठेतरी कमी पडलोय असे समजा.
~धन्यवाद~

***************************************
मृगाचा पाऊस आर्द्रात प्रवेश करण्याच्या बेतात असतानाच पेरण्यांना सुरुवात होणार होती.ह्या वर्षी ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार होत्या. आषाढातल्या एकादशीची जसा वारकरी आतुरतेने वाट पाहत असतो, अगदी तश्याच ह्या निवडणुकांची गावात वाट पाहिली जायची.राजाभाऊ जाधवांना ह्या निवडणुकांशी काही देणे घेणे नव्हतेच असे नाही, पण अगदी टोळक्यांत बसून त्यावर चर्चा करण्या इतपत रसही नव्हता. नाही म्हणायला त्यांच्या मावसं काकांच्या, नानासाहेब पाटलांच्या गळ्यात दरवेळे सारखीच अध्यक्ष पदाची माळ पडणार की नाही ह्या बाबत मात्र त्यांना शंका होती.
नानासाहेबांच्या रक्तातच राजकारण होते. येनकेन प्रकारेण गेल्या २५ वर्षांपासून नानांनी अध्यक्षपदाच्या खुर्चीवरची मांड सैल पडू दिलेली नव्हती. नानांचा दरारा व वचक गांवात भल्याभल्यांना ठाऊक होता.त्यांच्या वरताण त्यांची दोन्ही मुले होती. 'बाप सें बेटा सवाई' ह्या म्हणीचे उदाहरण देण्यासाठी त्यांचा उपयोग केला जावा इतकी त्यांची ख्याती होती. गांवात भावकीची भांडणे सोडवायला त्यांना बोलावणे गेल्यास दोन्ही पक्ष पस्तावलेच समजायचे ! जमिनीच्या तुकड्यावर कोणा शेतकऱ्याने सावकाराकडून कर्ज घेतल्यास त्याने निमूटपणे व्याज व मुद्दल दिलेलेच बरे... कारण सावकार तर दूरच राहायचा; पाटीलच तो शेतीचा तुकडा सावकाराकडून पडेल किंमतींत उचलून घशांत घालायचे. तक्रार करायची सोयच नव्हती ! जो कोणी पाटील वाड्याकडे वाकड्या नजरेने बघेल त्याची कंबक्तीच भरली समजायची ! नानांची दोन्ही पोरे त्याच्या घरावरून गाढवाचा नांगर फिरवायला कमी करणार नव्हती... वरून घरच्या आया बायांची इज्जत वाड्याच्या वेशीवर टांगली गेली असती ते वेगळेच.
नानासाहेब पाटलांचा मोठा सुहास लांडग्याच्या जातीचा होता.... स्वतःची मुले मोठी असूनही चांगलाच रगेल होता.त्याच्या समोर घरातल्या मोलकरणीही वावरायला टाळततर धाकटा सुनील कोल्ह्याच्या जातीचा होता. बायको बरोबर मेहुणीलाही त्याने घरात आणलेली होती. लग्नच त्या अटीवर केले असे गांवातले लोकं कुजबुजतं !हे सर्व कमी की काय तर त्यात भर होती ती त्यांच्या चमच्यांची.... गांवातली काही तरणी पोरे सुनील व सुहासला पाठिंबा देण्याच्या नांवाखाली चांगलीच वाह्यातपणा करीत. सुहासच्या बायकोच्या भावाची, रमेशची त्याला जोड होतीच. अर्थात गांव तेथे उकिरडा असणारच म्हणत जाणती मंडळी ह्या प्रकारांकडे काणाडोळा करीत.यंदा नानासाहेब पाटील स्वतः: निवडणूक लढवण्याच्या मन:स्थितीत नव्हते. विधानसभेच्या तिकिटासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मोठ्या मुलाला, सुहासला परिषदेचा अध्यक्ष बनवायचा त्यांचा मनसुबा होता.
राजाभाऊ जाधवांना ह्या सर्व प्रकारांशी वैयक्तिक देणे घेणे काहीच नसले तरी लॉ कॉलेजला प्रोफेसर असलेल्या राजाभाऊंना नानांच्या व त्यांच्या मुलांच्या प्रत्येक वर्तणुकीची किळस येई.स्वतः सुशिक्षित, त्यात पत्नी सुविद्य शिक्षिका असल्याने त्यांच्या संस्कारक्षम मनाला कित्येक गोष्टी पटत नसत. सुरुवातीला त्यांनी नानांना समजवण्याचा व्यर्थ प्रयत्न केला मग विरोध करण्याचा पण त्यामुळे स्वतःचेच नुकसान होते हे कळल्याने त्यांनी गप्पच बसणे पसंत केले होते.राजाभाऊंच्या पत्नी सुरेखालाही नानासाहेबांच्या घराशी नाते जोडून ठेवणेही वैचारिकपणे विसंगत वाटे. एका शिक्षिकेत असणारे सारे गुण सुरेखाताईंमध्ये होते. मुलांच्या मानसिकतेची त्यांना जाण तर होतीच, पण त्यांना तळमळीने शिकवण्याची वृत्तीही त्यांनी अंगिकारलेली होती. लहानग्या वैशाली बरोबर तिघांचा संसार सुखात होता. जोड देण्यास राजाभाऊंची आई सोबतीला होतीच.****************************'जिल्हा सहकारी दूध फेडरेशन संघा'चे संचालक संतोषभाऊ चौधरी नानासाहेब पाटलांचे कट्टर विरोधक. नानांच्या "विकास आघाडी" ह्या पक्षाच्या विरोधातला त्यांचा "जनजागृती" पक्ष चांगलाच संघर्ष देत असे. समितीच्या अध्यक्षाच्या पदास आपण कसे पात्र आहोत हे ते आपल्या समर्थकांकरवी गावकऱ्यां पर्यंत व्यवस्थित पोहचवत होते. ह्यावेळी नानासाहेब पटलांना धूळ चारण्याचा ठाम निर्धार संतोषभाऊंनी केलेला होता.संतोषभाऊंनी वाणिज्य पदवी घेतल्यावर पुढे व्यवस्थापनात पदवी घेण्यानिमित्ताने परदेशवारी केली होती. वडिलांचे आधिपत्य असलेल्या दूध फेडरेशन संघावर स्वतः:चा ठसा निर्माण करून बिनविरोध वर्चस्व प्रस्थापित केले होते. शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांचे ब्रीद वाक्य असे. गावात फक्त राजकारण न करता समाजकारणही रुजवण्यात त्यांचा मोठा हिस्सा होता. राजाभाऊ जाधव प्रोफेसर असलेल्या महाविद्यालयाचे संस्थापक संतोष भाऊच होते. राजकीय सत्तेत प्रवेश मिळाल्याखेरीज मनाजोगता विकास साध्य करता येणार नाही हे त्यांना चांगलेच ठाऊक होते व म्हणूनच नानासाहेब पाटलांची राजकीय सद्दी संपवावीच लागणार हे ते जाणून होते.राजकारण किंवा समाजकारणात सार्वजनिक चारित्र्य स्वच्छ ठेवावेच लागणार अन्यथा त्याचा परिणाम वैयक्तिक, तसेच पुढे जाऊन सामाजिक जीवनावर होईल ह्याची कल्पना त्यांना होतीच. छोट्या गांवात कुठलीही कुलंगडी लपून राहणार नाहीत तेव्हा त्या वाटेला जायचेच नाही अशी पक्की खूणगाठ त्यांनी बांधून ठेवलेली होती.स्वतःच्या आसपास महिला कार्यकर्त्यांचा घोळका असला तरी त्याबरोबर तितकेच पुरूष कार्यकर्ते असायलाच हवेत हा दंडक त्यांनी पाळलेला होता.बऱ्यापैकी शिकलेली खानदानी घरातली बायको, लॉ कॉलेजला शेवटच्या वर्षात शिकत असलेली कन्या व चौदावीत शिकणारा व 'बिझीनेस मॅनेजमेंटला' प्रवेश मिळण्याची स्वप्ने बघणारा मुलगा हा त्यांचा संसारिक पसारा होता. आजोबा, आजी, आई, वडील, दूरची विधवा आत्या, नोकर गडी तसेच आला-गेला, पै- पाहुणा अशा बयाच मंडळींचा राबता असलेले त्यांचे घर होते. घरची श्रीमंती व शेती वाडी घरात कसलीही कमतरता भासू देत नव्हती. लक्ष्मी बरोबर सरस्वतीनेही वरदहस्त ठेवलेला असल्याने संतोष भाऊंचे नांव सार्थकी लागलेले होते.मिठ्ठास वाणी, समोरच्या व्यक्तीचे संभाषण पूर्ण झाल्याशिवाय न बोलण्याची सवय, आग्रही व मनमिळाऊ स्वभाव असे कित्येक गुण संतोषभाऊंनी प्रयत्नपूर्वक आत्मसात केले होते. व्यवस्थापनात घेतलेली पदवी आचरणात आणण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगे होते. राजाभाऊ जाधवांवर त्यांचा खास लोभ होता. प्रियाचे लाडके शिक्षक, चांगला शिकलेला गुणी माणूस व गरीब परंतू स्वकष्टावर वर आलेल्या ह्या प्राध्यापकाबद्दल त्यांना नितांत आदर होता. राजाभाऊंचाही संतोषभाऊंवर खास लोभ होता. इतर सर्व गावकरी त्यांचा संतोषभाऊ नावाने उल्लेख करीत, एकटे राजाभाऊ त्यांना "सर" म्हणत.जमीन अस्मानाचा फरक असलेले हे गांवातले दोन मोठे राजकारणी एकमेकांना पुरते जोखून होते. व म्हणूनच की काय त्यांचे समर्थकही कधी आपापसांत लढत नसत. दोघांच्याही मनांत एकमेकांबद्दल सुप्त अढी होती, तरीही वरकरणी त्यांची समोरासमोर कधी जुंपली नाही. गांवातले वातावरण तणावमुक्त ह्या मुळेच राहिलेले होते.यंदाच्या निवडणुकांमध्ये चित्र वेगळे असेल व नानासाहेब पाटील व संतोषभाऊ चौधरी एकमेकांसमोर उभे ठाकणार असे लोकं कुजबुजायला लागले होते.

तेजस्विनी-२

स्वर्गीय राजीव गांधींनी राजकारणात सुरू केलेल्या स्थानीय स्वराज्य संस्थांत महिला आरक्षण पद्धतीचा फायदा ह्या वेळी ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत स्त्रियांना देण्यात येणार असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा जी.आर. परिषदेच्या सचिव साहेबांच्या टेबलावर पडला आणि परिषदेच्या समितीवर जणू काही वीजच पडली !
"च्यामारी आता बाया समितीच्या अध्यक्षा व्हनार की काय रं गड्या ?" पाटलांच्या पोराच्या, सुहासच्या तोंडातून हे वाक्य पडताच सचिवांच्या कार्यालयातल्या कारकुनाने फक्त मान हालवली.सुहासच्या बथ्थड डोक्यात तो हो बोलतोय की नाही ते शिरलेच नाही."**ला तुझ्या, तोंडानं सांग की रं व्हय म्हनतोय की न्हाय त्ये""साहेबांना विचारून उद्या कळवतो" कारकून मोकाशीने उत्तर दिले."**च्या, मग मुंडी कश्यापायी हालवतूस ?" सुहासचा जळफळाट होत होता.न जाणो हे दिवटं उद्या परिषदेचा अध्यक्ष झालं तर डोक्यावर मिऱ्या वाटेल म्हणून मोकाशी गप्प बसला."नानासाहेबांनीबी ह्यो कसलं लचांड तुमच्या मागे लावलंय, अध्यक्ष बनवायचं ?" सुहासचा मेहुणा, रमेश सावली सारखा त्याच्या बरोबर राही. अगदी तमाशाच्या फडातल्या नायकिणीशी ओळख करायच्या वेळीही तो मागे राहत नसे."त्यांस्नी विधानसभेवर जायच हाय आता, गांवात आपलं राज्य आलं पाहिजे रमेश""जाऊ द्या हो सुहास राव, कश्यापायी नाराज व्हताय, असा रूल आला तरीबी बायकोला पुढं करून आपणच राज्य चालवायचं की त्या लालू प्रसाद सारखं " खुसखुशीत हसत फेगडे म्हणाले. यावल तालुक्यातले फेगडे कुटुंबीय वर्षांपासून नानांना अध्यक्षपदाच्या निवडणुकांत तालुक्यातल्या समितीची मते मिळवून देत."आपल्या समाजातल्या बायका डोईवरचा पदर खाली पडू द्येत न्हाईत तर अध्यक्षीण कश्या बनतील" सुहासला काळजी आपल्या खुर्चीची लागलेली होती. बोलता बोलता तो खुर्चीवरून उठला त्याच्या पाठोपाठ त्याचे दोघे चमचे लगबगीने उठले.मोकाशी ऐकल्या न ऐकल्या सारखे करीत डोकं एका रजिस्टरांत खुपसून बसला होता."मोकाश्या, ते मोरीच्या बांधकामाचे टेंडर कधी पास करतुयस ?""आता आचार संहिता लागू झाली सुहासराव, टेंडर बारगळलं !""**ला ह्या संहितेच्या, ह्या ***च्याला कधीचा बोंबलतोय, टेंडर पास कर म्हणून" सुहासचा चेहरा लालबुंद झालेला होता. "**व्या टेंडर हातातलं गेलं तर तुला दावतो पाटलाचा हिसका" "भ"ची बाराखडी उगाळत सुहास खोलीच्या बाहेर पडायला वळला तोच त्याची नजर दारांत उभ्या असलेल्या संतोषभाऊंवर पडली. एक क्षण काय बोलावे ते त्याला सुचेना. कसंबसं 'कसे आहात' असा प्रश्न टाकत तो चमच्यांसह तेथून सटकला. संतोषभाऊंच्या चेहऱ्यावर स्मित हास्य का उमटले त्याचाच त्याला प्रश्न पडला होता.
"राजपुत्राचा आज श्लोक पठणाचा वार होता का मोकाशी ?" सुहास गेल्या दिशेला बघत त्यांनी हसत हसत मोकाशींना विचारले."जाऊ द्या हो संतोषभाऊ आम्हाला हे रोजचेच आहे. कार्यालयात बाई माणूस कर्मचारी असूनही ह्यांची ही असली भाषा ऐकून घ्यावी लागते. आता तुम्हीच काय करता येईल तर पाहा ""अहो, असे नाराज नका होऊ मोकाशी, हे कुत्रं जास्त भुंकू नाही शकणार आता."" काय सांगू संतोष भाऊ.... आता तेहतीस टक्के जागांवर महिलांना आरक्षण द्यायचा निर्णय सरकारचा, मिरची लागली ह्यांना..... त्यात भरडले आम्ही जातोय" मोकाशींच्या तोंडून खरे कारण बाहेर पडले."मरू द्या, मोकाशी आमच्या वसतिगृहाच्या परवानगीचे पत्र पोहचले. त्याबद्दल व्यक्तिशः: धन्यवाद देण्यासाठी आलोय मी खासं" लॉ कॉलेजला शिक्षण घेण्यासाठी गाव-तालुक्यातून मुली येत. त्यांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून संतोषभाऊंनी वसतिगृहाच्या कच्च्या आराखड्यासह परवानगी मागणारे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले होते. त्यात मोकाशींनी त्यांना खूप मदत केली होती."काय हे संतोषभाऊ, अहो साधा फोन केला असतात तरी चाललं असते, आपण उगीच तसदी घेतलीत" मोकाशीच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याचे भाव तरळले."असं कसं चालेल, मग आमच्या पुढच्या कामाच्या वेळी तुम्हाला वाटेल 'बघा, संतोषभाऊ मोठी माणसं झालीत, आता भेटायलाही येत न्हाईत." हसत हसत खुर्चीवरून उठत ते म्हणाले."भाऊ, बसा नं, चहा मागवतो" मोकाशी लगबगीने उठले."नको, त्यापेक्षा तुम्हीच कधी बंगल्यावर या सकाळच्याला, चहा नाश्ता जोडीनच घेऊ....." म्हणत ते दाराकडे वळले. "महिला आरक्षणाच काय म्हणालात तुम्ही मोकाशी ?" सहज खडा टाकावा तसे संतोषभाऊ बोलले."ह्या वेळेचे नक्की माहीत नाही" मोकाशी खाजगीत बोलल्यासारखे बोलले. "पण तेहतीस टक्के जागांवर महिला उमेदवार येणार हे नक्कीच, तसा जी आर काढलाय जिल्हाधिकायांनी. अध्यक्षांच्या पदासाठी काय करायचे त्याबद्दल मीटिंग आहे जळगांवला, तेथेच गेलेत आमचे साहेब""बरंय, स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटेल आता, व पाटलांची वाचा त्यांच्या ताब्यात राहील." हसत हसत ते बाहेर पडले तेव्हा 'किती साधा माणूस आहे' हा विचार मोकाशींच्या डोक्यात आला.******************सुरेखाताईंना दारांत उभे असलेले बघून राजाभाऊ जाधवांना आश्चर्य वाटले. स्कूटर स्टॅंडवर लावत त्यांनी विचारले, "काय हो, काय झालं ?""आल्या आल्या बंगल्यावर पाठवा, चहा व रात्रीचे जेवण आम्ही बंगल्यावरच घेऊ असा निरोप धाडलाय संतोषभाऊंनी" "बरं, हात पाय धुऊन जरा फ्रेश होऊन मग जातो... तोवर तुम्ही चहा पाजा घोटभर आम्हाला" राजाभाऊ घरांत शिरत बोलले."अहो, उशीर होईल नं" "आता अंमळ दहा मीनीट उशीरानंच आलो असतो तर?" ह्या राजाभाऊंच्या प्रश्नाला त्यांच्या कडे उत्तर नव्हते.बंगल्यावर वासूभाऊ, इंदूताई भराडे, शेळके गुरुजी, देसाई साहेब, प्रा. फिरके वगैरे मंडळी बघून राजाभाऊ बुचकळ्यांत पडले. वेगळेच काही तरी प्रकरण दिसतेय हा विचार मनांत आणत व सर्वांना यथायोग्य अभिवादन करीत ते एका खुर्चीत बसले.सर्वांच्या नजरा आपल्यावर खिळल्यात हे बघून जरा ओशाळल्यागत होत ते म्हणाले "उशीर झाल्याबद्दल माफी मागतो, सर" "त्यात काय माफी मागता राजाभाऊ, सगळे आत्ताच आलेत." ह्या संतोषभाऊंच्या वाक्याने त्यांचा जीव भांड्यात पडला. घसा खाकरतं त्यांनी राजाभाऊंकडे बघत बैठकीला सुरुवात केली.....
"आज झेड पी च्या कार्यालयातल्या मोकाशीची भेट घेण्यास गेलो होतो......" त्यांनी महिला आरक्षण विधेयकाचा विषय सर्वांसमोर मांडला. राजाभाऊंना महिला आरक्षण विधेयकाबद्दल बरेच काही माहीत होते. लॉ कॉलेजचे प्राध्यापक असल्याने तो त्यांचा शिकवण्याचा विषयही होता. संतोषभाऊंचा आपल्यावर लोभ आहे ह्याची जाण त्यांना होती पण ह्या राजकीय निवडणुकांच्या बैठकीत आपले नेमके स्थान कोणते ह्याबद्दल त्यांना अंदाज येत नव्हता.
"कसला विचार करताय राजाभाऊ ?" सरांच्या बोलण्याने एकदम ते भानावर आले."मला ह्या विधेयका बद्दल पूर्णं माहिती आहे. सध्या सरकारने फक्त सदस्यांसाठी हे विधायक लागू केले आहे परंतू येत्या पाचं वर्षांत समितीच्या कार्यकारणीवरही ते लागू होईल असा आम्हा विश्लेषकांचा अंदाज आहे." राजाभाऊ शांतपणे बोलत होते, संतोषभाऊंची कौतुकाने भरलेली नजर आता त्यांना सवयीची झालेली होती."हो, मोकाशीही तेच बोलत होते. ह्यावेळी तेहतीस टक्के जागा महिलांसाठी राखीव म्हणून ठेवण्यात येणार आहेत. मात्र त्यांना कार्यकारणी सदस्य किंवा अध्यक्षपदाबद्दल काहीही कल्पना नाही.""साहजिक आहे... कारण, सरकारने तसे स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. ह्या वर्षी हे विधेयक कदाचित प्रयोगाखातीर आणण्यात येईल असा आमचा होरा आहे." राजाभाऊंनी नेमकी परिस्थिती सांगितली. "ह्या विधेयकाला मिळणारा प्रतिसाद व त्याचे येणारे रिझर्ल्ट्स ह्यावरच बाकी सर्व अवलंबून आहे. अत्यंत घाईघाईत हे विधेयक सरकारने सभागृहासमोर मांडून गेल्या अधिवेशनात पास करून घेतले आहे." राजाभाऊंना आपल्याला ह्या बैठकीत का बोलावण्यात आले असावे ह्याचा हळूहळू अंदाज येत होता.
"संतोषभाऊ असे घडले तर आपणांस समितीच्या अध्यक्षपदासाठी उभे राहावे की नाही हे ठरवावे लागणार आहे." देसाई साहेब म्हणाले. देसाई हे जिल्ह्यातले प्रथम आय ए एस अधिकारी होते. मराठी आय ए एस बरेच होऊन गेले पण जळगावांतले आय ए एस म्हणून देसाईंचे नांव सर्वप्रथम होते. संतोषभाऊ चौधरींच्या कारकीर्तीद त्यांनी मिळवलेल्या माणसांपैकी देसाईंचा नंबर बराच वरचा होता. स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून जळगाव जिल्हा दूध फेडरेशन संघाचे सुकाणू त्यांनी सांभाळले होते."असे कसे म्हणता देसायी साहेब ? आता भाऊंना कोण विरोध करतूय त्येच पाह्याचय मलाबी " इंदूताई भराडे आक्रमकतेबद्दल व शीघ्रकोपी पणाबद्दल तालुक्यात प्रसिद्ध होत्या. पण हाडाची कार्यकर्ती, मेहनती व झोपडपट्टी वासीयांची कैवारी म्हणूनही त्या प्रसिद्ध होत्या. इंदूताई मूळच्या "विकास आघाडी" पक्षातल्या पण सुहासची मर्जी फिरल्याने त्यांना पक्ष बदलावा लागला होता. इंदूताई म्हणत, 'त्या मेल्याची नजर वाईट आहे' तर सुहासचे चमचे म्हणत, 'सुहासचे मन भरले होते' त्यांनी पक्ष सोडल्यानंतर दोघेही एकमेकांसमोर कधीही आले नव्हते म्हणून सत्य गुलदस्त्यातच होते.
"इंदूताई, प्रश्न विरोधाचा न्हाई, सरकारच्या निर्णयाचा हाय" शेळके मास्तर भीत भीत बोलले. "बरोबर आहे मास्तर, सरकारचा निर्णय बंधनकारक तर आहेच पण तो आपण सर्वांनी योग्य वेळी स्वीकारल्यास विरोधकांवर व्यवस्थित बाजी मारता येईल." संतोषभाऊंनी मध्यस्थी केली. "आजचे मरण उद्यावर ढकलण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीचा डोळसपणे स्वीकार करावा म्हणून ही खास समर्थकांची बैठक मी बोलावली आहे. मंडळी, आपण जो विचार कराल तो येथे उस्फुर्तपणे मांडा त्यातून काही उपाय निश्चित निघेल असे मला वाटते." संतोषभाऊंनी त्यांचे मनोगत मांडले.बऱ्याचं चर्चाचर्वणानंतर व जर तर च्या कहाण्यांना अनेक फाटे फोडत जेवणाची वेळ जवळ आल्यावर चर्चा संपुष्टात आली.
मालती वहिनींच्या हातच्या सामिष भोजनाचा व प्रियाशी सध्याच्या कायदेविषयक चर्चेचा आनंद घेत राजाभाऊंनी जेवण उरकले. वहिनींचा व इतर सर्वांचा निरोप घेऊन ते दरवाज्यापर्यंत पोहचलेच होते इतक्यात "राजाभाऊ उद्या कार्यालयात भेटा" असा आग्रहवजा आदेश संतोषभाऊंनी त्यांना दिला. "हो सर नक्की" इतकेच बोलत व जिभेवरची बडीशोपेची चव चाखत त्यांनी सरांचा निरोप घेतला.

तेजस्विनी-३

"त्यात ठरवायचं काय ? संतोषभाऊंनीच अध्यक्षपदासाठी प्रयत्न करावा. देसाई दरवेळी उगीचच पिल्लू सोडतात" सुरेखाताईंचे मत कपडे बदलता बदलता राजाभाऊ शांतपणे ऐकत होते."नाही, ते जर परिषदांच्या निवडणुकांना उभे राहिले तर नक्कीच निवडून येतील पण सरकारच्या अधिनियमामुळे त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले किंवा मिळाले नाही तर तो त्यांचा अपमान होईल." राजाभाऊ उत्तरले." तुमचे उगीच काहीही, त्यात काय इतका मोठा अपमान होणार ? असले तर पद स्वीकारावे, नाही तर दुसऱ्या पदाकडे वळावे माणसाने....." सुरेखाताई व राजाभाऊंचा संवाद सुरू होता.राजाभाऊ कधीही पत्नीला 'तुला काय कळतंय' ह्या अर्थाने हिणवत नसत. स्वतः:ची मते तिने मांडावीत ह्यासाठी ते आग्रही असत."मग त्यापेक्षा दुसऱ्या पदाकडेच सुरुवातीपासून का लक्ष देऊ नये ?' राजाभाऊंच्या प्रश्नाचे उत्तर सुरेखाताईंकडे नव्हते." जाऊ द्या, मला झोप येतेय...." असं बोलत, त्या वैशालीला कुशीत घेऊन झोपण्याची तयारी करू लागल्या."मग त्यापेक्षा दुसऱ्या पदाकडेच सुरुवातीपासून का लक्ष देऊ नये ?' ह्या आपल्याच वाक्यावर राजाभाऊ विचार करू लागले. विधानसभेच्या निवडणुकांत नानासाहेब पाटलांच्या विरोधात संतोषभाऊ उभे राहिल्यास काय होऊ शकेल ह्याचा विचार करता करता त्यांना झोपेने घेरले.***********************"काय मास्तरीण बाई, आमचं पोरगं धडं शिकत हाय की न्हाय शाळेत ?" सुनील पाटलाचा आवाज सुरेखा ताईंनी ओळखला व 'दैनिक लोकशाही' मधून डोकं वर काढून त्यांनी सुनील पाटलाकडे रोखून पाहिले."काकी कशा आहेत ?" त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी प्रतिप्रश्न केला."आता तुमी घराला यावा काकीची चौकशी करायला. पोराची चौकशी करण्यासाठी आलू आमी इथं" पाटलाच डोकं ठिकाणावर येत नव्हत. समोरची मास्तरीण आपली भावजय आहे हेही तो विसरला होता."शिक्षणाचा व पाटलांचा संबंध असतो का कधी ? ह्या इयत्तेत पास झाला तर तुमच्या ऐवजी, मी पेढे वाटीन.. बरं भाऊजी !" सुरेखा ताईंना ह्या प्रकारांची चांगली सवय झालेली होती. इतक्या सहजा सहजी त्या पाटलाशी बोलण्यात हरल्या नसत्या."पाटलांना शिकून कुठल्या शाळेत नोकरी करायची हाय का ? जमीन अन शेती बघायला फुरसत न्हाय आमच्या कड तिथं खर्डेघाशी कोन करील?" पाटील फुकाचा रुबाब दाखवत बोलला."मग पोराला शाळेतून घरी न्यायला आलात, असं सांगा की भाऊजी; विलास..... साहेबांना मुख्याध्यापकांकडे घेऊन जा, म्हणावं पिंटूचे वडील आले आहेत त्याचे नांव कमी करायला..... भाऊजी, तुम्ही ह्याच्या बरोबर जा" सुनील पाटलाचं तोंड जोडा मारल्यागत झालेले पाहून टीचर्स रूम मध्ये बसलेल्या सगळ्या शिक्षकांना आतून आनंदच झाला."तसं काय बी न्हाय वैनीबाय, आमी आपलं चौकशी करायला आलो व्हतो पोराची; तुमास्नी उगीचच राग आला" सारवासारव करायच्या मूड मध्ये पाटील बोलले."आता हो भाऊजी, वैनी कधी रागावेल का लहान दिरावर ? चौकशी झाली असली तर जाऊ म्हणते, गणिताचा तास घ्यायचा आहे वर्गात." सुरेखा ताईंनी सुनील पाटलाला स्वतः:च्या जागेची ओळख करून दिली."आयला, वैनीताई लई गरम माथ्याच्या हैत की तुमच्या" एक चमचा सुनीलला टीचर्स रूमच्या बाहेर आल्या आल्या बोलला."लई माज चढलाय ह्यांना, त्यो संतोषभाऊ जवळचा वाटतो आमच्या पेक्षा, ईलच कधी काम सांगायले घरी तवा बघीन सालीला""काय मास्तुरे, बरं हाय ना?", मुख्याध्यापकांच्या खोलीत सरळ शिरत सुनील बोलला."या, पाटील, आज कशी आम्हा गरीबाची आठवण आली ?" हेडमास्तर दीनवाणे पणाने बोलले."आमच्या वळखीच्या एक बाई हाईत पाडळस्याच्या प्राथमिक शाळेत, त्यांन्सी इथं ट्रान्स्फर करून घ्या मास्तर""आस्स व्हयं, काय नांव म्हणलात बाईंचं ?" हेडमास्तरांनी विचारले."मोहिनी इंगळे नांव हाय, इथल्याच हैत, यायला जायला अक्षी तरास होतो बाई माणसाला म्हणून आलो होतो खास ""बरयं, जरा तहसीलदार कचेरीत ही सांगा, म्हणजे ट्रान्स्फर चं काम लौकर हुईल" मास्तरांनी सुचवले. मास्तरांना माहीत होते, ह्या मोहिनी इंगळेंची बऱ्याच जणांनी शिफारस केली होती. नानासाहेब पाटलांच दिवटंही तीच्या मागे लागलंय म्हणजे काही तरी वेगळंच प्रकरण असणार. मास्तरांनी लगेच पाडळस्याची फाइल मागवली.***************************राजाभाऊ कॉलेजातली लेक्चर्स सुरू असतानाच, मोकळ्या वेळेत संतोष चौधरींना भेटायला गेले. त्यांचे कार्यालय कॉलेज पासून जवळच असल्याने फारसा प्रयास पडणार नव्हता. दोनच क्षणांत संतोषभाऊंनी त्यांना स्वतः:च्या दालनात बोलावले."काय घेणार ? चहा की काही थंड ?" बसत नाही तोच त्यांनी प्रश्न विचारला."चहा चालेल" राजाभाऊंनी बऱ्याच वेळा येथे येण्याचे केले असल्याने त्यांना सरांच्या पद्धती चांगल्याच ठाऊक होत्या." कालच्या बैठकीत तसा निर्णय काहीच घेता आलेला नाही, प्रत्येकाचे मत स्वतंत्र्यपणे ऐकणे चांगले म्हणून मी सर्वांनाच एक एकटे भेटायला बोलावले आहे." संतोषभाऊंनी प्रस्तावना केली."बरोबर आहे सर..... माझ्या मते आपण सरळ विधानसभेच्या जागेसाठी स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे राहावे." राजाभाऊंनी मुद्द्यालाच हात घातला.मेजावर पडलेल्या पेपर वेट फिरवत संतोषभाऊ विचार करून म्हणाले, "मग झेड पीच्या अध्यक्ष पदासाठी उमेदवार तयार करावा लागेल.""देसाईंना विचारले तर ?" "नको नको; त्यांच्यावर दूध महासंघाची बरीच जबाबदारी आहे. त्यावर आधिपत्य ठेवणे भाग असल्याने त्यांना मी हालवू शकत नाही. मला तुमच्याबद्दलही विचार करायचा नाही; कारण राजकारण हे तुमचे क्षेत्र नाही राजाभाऊ, वाईट वाटू देऊ नका""नाही सर..... तो विचार तर मी स्वप्नातही करणार नाही" राजाभाऊ गडबडून म्हणाले."राजाभाऊ तुम्ही व देसाई माझे कायदे विषयक सल्लागार म्हणून जवळ आहात त्यातच मला समाधान जास्त आहे." संतोष भाऊ स्वगत बोलल्यागत बोलले."आपल्या जवळच्या वर्तुळात बरीच मंडळी आहेत सर; वासूभाऊ, फिरके, शेळके मास्तर, विचारे साहेब, भराडे बाई....." राजाभाऊ पटापट नांव घेत होते."भराडे बाई म्हणजे तोफखाना आहे.... काही वेळा राजकारणात इतके उतावीळ होऊन चालत नाही, पण त्यांना समजावण्याच्या भानगडीत मी पडणार नाही. ह्या वेळीच जर महिला उमेदवार दिला तर आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीसाठी तो प्लस पॉंईंट ठरेल""प्रियाला विचारून बघा नं सर" राजाभाऊ सहज बोलले. "प्रिया पेक्षा वहिनींचा विचार मी करत होतो" पटकन संतोषभाऊंच्या तोंडातून वाक्य पडलं."बापरे, सुरेखाला कसे जमेल ? नाही नाही, नको सर....." राजाभाऊ घाईघाईत बोलले."राजाभाऊ, निवडणुकीला उभे राहिले म्हणजे निवडून आलेच असे नाही..... व निवडून आले म्हणजे पोस्ट मिळाली असे नाही.... विधानसभांच्या निवडणुकांच्या आधी झेड पी च्या निवडणुका आहेत. आपल्याला स्वबळावर कितपत निवडणुका लढवता येतील हे झेड पीच्या निवडणुकांतून कळेल."राजाभाऊंना सरांनी सांगितलेला शब्द न शब्द पटत होता पण सुरेखाचे नांव झेड पी च्या निवडणुकांसाठी येऊ शकेल ह्याचा स्वप्नातही त्यांनी विचार केलेला नव्हता."राजाभाऊ, शांत पणे विचार करा. मला पूर्णं कल्पना आहे की राजकारण घाणेरडे असते. पण चिखलात सगळी बेडकीच नसतात तर कमळेही उगवतातच ना !""......!" राजाभाऊ निःशब्द होते."वहिनी शिकलेल्या आहेत, शिक्षिका आहेत, स्त्रियांच्या समस्यांची जाण त्यांना आहे. तालुक्यातले प्रश्न त्यांना ठाऊक आहेत व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यात राजकारणी व्यक्तीला लागणारा तडफदारपणा आहे......" संतोषभाऊंनी नेमक्या शब्दांत केलेले तंतोतंत वर्णन ऐकून राजाभाऊ निरुत्तर होत होते."राजाभाऊ, आपण सुशिक्षितांनी काठावर उभे राहून गंमत किती काळ पाहायची ? वर आपणच सिस्टिमला दोष देतो पण जोवर सुशिक्षित मंडळी सक्रिय राजकारणांत उतरणार नाहीत तोवर पाटलांसारख्या व्यक्तींचे घाणेरडे चाळे आपल्याला सहन करावे लागतील.""सर, मी तिला सांगितले तरी ती ह्या बाबतीत माझे ऐकणार नाही" राजाभाऊंनी शेवटचा प्रयास करून पाहिला."मान्य !...मी सांगून पाहतो, मग त्या नक्कीच तयार होतील. आज आपल्याकडेच सायंकाळचा चहा घेऊया, म्हणजे निवांत गप्पाही मारता येतील. वहिनींना सांगा, चहाबरोबर माझी आवडती भजीही तयार ठेवा !"

तेजस्विनी-४

"संतोषभाऊ, मोकाशी म्हणून कोणा गृहस्थांचा फोन आहे""द्या त्यांना लाइन " मोघम संतोषभाऊंनी त्यांच्या स्वीय सहाय्यकाला सांगितले."नमस्कार भाऊ.... मी मोकाशी बोलतोय""बोला मोकाशी, काय सेवा करू आपली ?""काय भाऊ, लाजवता पामराला, मीच आपली सेवा करण्यास फोन केला..... जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आलेला आहे, ह्यावेळी परिषदेच्या ३३% जागा महिलांसाठी राखीव आहेत पण अध्यक्षपद दोन निवडणुकांनंतर महिलांना मिळावे अशी शिफारस केलेली आहे" मोकाशीने एका दमांत बातमी सांगितली."मोकाशी, ३३% म्हणजे किती जागा होतील नक्की ?" उगीचच काहीतरी विचारायचे म्हणून संतोषभाऊ म्हणाले."१६ जागा होतात साहेब- एकूण ४७ जागा आहेत पण.....""कळलं, ह्या निवडणूकीपासूनच सुरुवात होणार मग अध्यक्षपद महिलेला की पुरुषाला देणार मोकाशी ?"" भाऊ, यंदा निवडणुका झाल्यावर झेड पी मेंबर जे नक्की करतील त्यानुसार अध्यक्षपद दिले जाईल. आता सर्व काही मेंबर्सवर अवलंबून असेल." मोकाशींनी रिपोर्ट दिला."बरयं, मी कचेरीत येऊन भेटतो तुम्हाला उद्याच" भाऊंनी निरोपाचे वाक्य उच्चारले.बरं एव्हढेच म्हणत मोकाशीनेही संभाषण तोडले.******************"सुहासराव जरा डोस्क ठिकाणावर आना अन आमी काय सांगतूय ते ऐकून घ्या" नानांच्या समोर बसलेल्या सुहास पाटलाला फर्मान सुटले तसा तो गोंधळला."व्हयं दाजी" अस तोंडातल्या तोंडात पुटपुटत तो समंजसपणाचा आव आणून नानासाहेबांसमोर उभा राहिला."ह्या निवडणुकांमधी १६ जागा बायकांसाठी रिजर्व ठेवल्यात सरकारानं, आता जरा बाई माणसाशी वागताना, बोलताना तोंडातली लाळ आवरत चला. न्हायतर आमी तिथं विधानसभेची तयारी करीत राहू अन इथं तुमी बायकांच्या मागे लागून हातची सत्ता गमावाल" नानांचा आवाज करडा होत चालला होता.सुहास मान खाली घालून उभा होता. त्याला आपल्या बापाचा स्वभाव चांगलाच माहीत होता. वयाने मोठी झाली असली तरी दोन्ही दिवटी नानांसमोर नजर उचलायची हिंमत करीत नसत."त्या मोकाश्याला शिव्या घालताना मागे तो चौधरी उभा आहे ह्याचे भान होते का तुम्हाला?" नानांचा आवाज चढत होता. "अशा रितीने सार्वजनिक ठिकाणी डोस्कं फिरवून घेतलं तर ऐन निवडणूकीच्या काळात जनतेची दुश्मनी ओढवून घ्याल. आता विधानसभेच्या निवडणुका होई पर्यंत थोबाडावर लगाम लावायला शिका" नानांनी हजेरी घ्यायला सुरुवात केली अन त्याच वेळेला सुनीलने प्रवेश केला."या... इंगळे बाईंच्या कामासाठी गेला होतात वाटत ?""........." आपल्या बापाला घरबसल्या गावातल्या गोष्टी कश्या कळतात ह्याचेच दोघांना आश्चर्य वाटायला लागले."दोघांनाही जतावून सांगतोय, निवडणुकांच्या काळात काही भानगडी गावांत कराल तर गावकऱ्यांसमोर तंगड तोडीन मी..... तुमच्या बरोबर फिरणाऱ्या लोकांनाही सांगून ठेवा, ह्या काळातल्या कुठल्याही भानगडीत मी तुम्हा लोकांना मदत करणार न्हाई.""व्हयं दाजी !" हजेरी द्यावी तसे दोघे एक सुरात बोलले." सुनीलराव, उद्यापास्न दादा बरोबर फिरायचं. ह्याच टाळकं जिकडे सरकेल तिकडेच त्याला आमची आठवण करून द्यायचे काम तुमचे. त्या चौधरीच्या बरोबर कोण कोण फिरतो, त्याचे रिपोर्ट हवेत मला रोज च्या रोज" नानासाहेब राजकारणातले बारकावे जाणून होते, दोघा पोरांनी आपल्या कडून काहीतरी शिकावे अशीच त्यांची सतत इच्छा होती."दाजी, जाधवांकडची मंडळी त्याच्या माग पुढं फिरत असत्यात" सुनीलने चुगली केली"व्हयं, राजाभाऊला शिक्षणाचा अभिमान चढलाय, त्याला तो चौधरी फूस देतोय. त्यात बायको शिकलेली असली म्हंजी घराची शाळा व्हनारच" नानांचा राजाभाऊंबद्दलचा राग उफाळून आला."चुलत्याने घरभेदी पणा न्हाय करायचा तर कुणी करायचा ?" नानासाहेब पाटलाच्या तोंडावरून तो आतल्या आत जळत असल्याचे कळत होतं. "मला लई शानपना शिकवत होता येता जाता, आता चौधरीला शानपना शिकव म्हणावं""नाना, एक गुन्हा माफ करा... त्याला जिंदगीभरचा धडा शिकवतू" सुहासचे टाळके कधीच त्याच्या ताब्यात राहत नसे."गाढवीच्या तुला कोणत्या भाषेत सांगू आता ? विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत काही लफडी न्हाई पायजेत.... जावा आता" दोघांनी पडत्या फळाची आज्ञा झेलली.*************"भज्यांची तयारी झाली आहे" सुरेखा ताई पदराला हात पुसत बाहेर येत म्हणाल्या तेव्हा राजाभाऊ कसलेसे पुस्तक वाचत होते."छान, आता अवतार ठीक कराल ?" हळूच त्यांनी विचारले तश्या सुरेखाताई खळखळून हसल्या."हो, मला माहीत आहे, पण करणार काय राजपुत्राशी लग्न थोडी केलेय.... नोकरांकडून सर्व करवून घ्यायला ? आपलं आपल्यालाच करणे भाग आहे" त्या गमतीने म्हणाल्या."कळतात बरं आम्हालाही असली बोलणी, आता स्वयंपाकीण बाईच आणतो आपल्या दिमतीला" राजाभाऊ खोट्या रागाने बोलले."आईंना हल्ली झेपवत नाही वैशालीला सांभाळायला.... ती रोज अंगणातून थेट रस्त्यावर धावते...." सुरेखाताईंचे वाक्य संपण्याच्या आतच दूध फेडरेशनची पांढरी ऍम्बेसेडर दारात उभी राहिली तश्या त्या लगबगीने कपडे बदलायला आत गेल्या.राजाभाऊ उठून दाराकडे जात असतानाच संतोषभाऊ व वहिनी आत आल्या. मालती वहिनींना पाहून राजाभाऊंनी आनंद मिश्रीत आश्चर्याने त्यांचे स्वागत केले, "वहिनी आज अगदी आश्चर्याचा धक्काच दिलात की....." दोघांनाही घेऊन ते बैठकीच्या खोलीत आले- बसा म्हणेस्तोवर वहिनी चक्क आतल्या खोलीकडे वळल्याचे पाहून त्यांना अजूनच अचंबा वाटला."तुम्ही कल्पना दिली असेलच सुरेखावहिनींना ?" संतोषभाऊ लाकडी खुर्चीवर बसता बसता बोलले"नाही, मी म्हटलं आपणच सांगावं तिला सगळं काही" थोड्याच वेळांत दोघी बाहेर आल्या. मालती वहिनी वैशालीला मांडीवर घेऊन तिचे कोडकौतुक करीत होत्या. हसत हसत इकडच्या तिकडच्या गप्पा, शाळेतले विविध प्रसंगावरून हास्य विनोद सुरू झाले."सुरेखा वहिनी, शाळेच्या मुख्याध्यापिका होण्यासाठी काय पात्रता असावी लागते बरे?" हळूच संतोषभाऊंनी विचारले."नको बाई ती कटकट कोण मागे लावून घेईल ?" पटकन त्या बोलल्या."अहो, तुमच्या साठी नाही म्हणत ते....नुसती चौकशी करताहेत" राजाभाऊंनी सिक्सर ठोकली तसा हास्याचा धबधबा उसळला....तर सुरेखाताई चक्क लाजल्या."नाही पण राजाभाऊ, मी चौकशी त्यांच्यासाठीच करतोय. !" हसत हसत संतोषभाऊ बोलले. गप्पांच्या ओघात सुनील पाटील शाळेत आल्याचा किस्सा सुरेखा ताईंनी सर्वांना ऐकवला."सुरेखा वहिनी आता तुम्हीच पाटलांची तोंड बंद करू शकाल. झेड.पीच्या निवडणुका जवळ येताहेत. आम्हाला निवडणूकीच्या प्रचाराला मदत कराल ना ?" संतोषभाऊ राजाभाऊंना डोळे मिचकावत बोलले ते सुरेखाताईंच्या लक्षातच आलेले नव्हते."मी कसली कपाळ मदत करणार तुम्हाला, तुमच्या राजाभाऊं इतकी शिकलेली थोडीच आहे !" सुरेखाताईंनी वचपा काढला तसे सगळे परत हास्यात बुडले."मी मात्र गंमत करीत नाही आहे, निवडणूक प्रचारातच नव्हे तर प्रत्यक्ष परिषदेच्या सभासद म्हणून आपण निवडणूकीला उभे राहण्यास काहीच हरकत नाही.""इश्श, वैशु व शाळेची नोकरी सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात, तीथं परिषद काय सांभाळणार डोंबल ?" ठेवणीतली प्रतिक्रिया देत त्या म्हणाल्या."त्यात कठीण ते काय आहे ? इतर स्त्रियाही स्वतः:चे संसार सांभाळून करतातच ना सर्व काही !" संतोषभाऊ हळूहळू विषयावर येत होते हे राजाभाऊंना कळून चुकले."आम्ही सर्वसामान्यांच्या पोरी भाऊ, आम्हाला हे कुठे झेपणार ?""राजाभाऊंसारखा जीवनसाथी असूनही तू असं म्हणावं म्हणजे कमालच आहे सुरेखा....,आमच्याकडे उठत्याबसत्यांचा राबता असतो सतत, प्रियाचा व प्रियांकचा अभ्यास, त्यांच्या खाण्यापिण्याचे नवनवीन चोचले, त्यातच सतत खणखणारे फोन, आत्यांचे आजारपण सर्व काही करायला लागते!.... अगं तुझ्या छोट्या घरकुलात मावशी तर मदत करतातच ना ? घर व नोकरी सांभाळल्यामुळे तुला जाण आहे स्त्रियांच्या प्रश्नांची; मग तूच आपल्या प्रश्नांना वाचा नाही फोडली; तर कोण फोडणार ? " मालती वहिनींनी नवऱ्याची री ओढली.विषय हळूहळू नेमक्या मुद्द्यावर आणण्यात संतोषभाऊंचे कसब वाखाणण्याजोगे होते. "वहिनी, आपणांस नाही वाटत, जे आपल्या आजूबाजूला घडत आहे त्यासाठी अजाणता आपण स्वतः:ही कारणीभूत आहोत? असल्या व्यक्ती ज्यांची चपराशी बनण्याची लायकी नाही ते परिषदेचाच नव्हे तर एखाद्या राज्याचाही कारभार हाकताहेत " संतोषभाऊंनी सरळ सरळ आव्हानात्मक भाषण ठोकायला सुरुवात केली..."आपण काय करू शकणार त्यासाठी ?" राजाभाऊंनी गाडी पुढे जावी म्हणून हळूच पिन मारली."राजाभाऊ आपण शिकली सवरलेली मंडळी राजकारण म्हणजे जणुकाही गजकरण किंवा महारोग असावा त्याप्रमाणे त्यापासून लांब राहतो. निवडणुका लढवणे तर सोडा; काही अहंमन्य पांढरपेशे मतदानाचा दिवस आळसात झोपा काढून घालवतात. मग नंतर 'सरकार काय झोपा काढते की काय' असल्या प्रतिक्रिया वर्तमानपत्रांतून किंवा एखाद्या संकेतस्थळावरून देतात !"सगळेच गंभीरतेने ऐकत होते."आपल्या पैकी प्रत्येकाला वाटतेच की, कुठेतरी काहीतरी चुकते आहे. बऱ्याच जणांना नेमके काय चुकते आहे त्याची जाण आहे. काही जण ते इतरांना समजावण्याचा प्रयत्न करतात. फार थोडे त्या विरुद्ध लढा द्यायचा प्रयत्न करतात पण अगदी बोटावर मोजण्याइतकेच अण्णा हजारेंसारखे सतत आंदोलन छेडून ह्या विरुद्ध जनमत तयार करतात..... आपण फक्त थोर व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो व त्यांची नावे सकाळ सायंकाळ आळवतो पण आपल्यातले किती जण त्यांच्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करतात ?" संतोषभाऊ आळीपाळीने तिघांकडे बघत बोलत होते. हाडाच्या शिक्षक असलेल्या राजाभाऊंना व सुरेखाताईंना त्यांचे वाक्य न वाक्य पटत होते."वहिनी, राजाभाऊंच्यात मनमिळाऊपणा आहे पण ते फार सरळ आहेत स्वभावाने.... त्यांच्यात हजरजवाबी पणा किंवा ती तडफ नाही जी एका राजकारणी माणसाला आवश्यक आहे..... ते माझे अत्यंत जवळचे व उत्कृष्ट सल्लागार म्हणूनच मी त्यांच्याकडे पाहतो. पण तुम्हाला स्त्रियांच्या प्रश्नांची जाण आहेच.....तुम्ही सरकारी नोकरी केली आहे तिथल्या प्रश्नांची जाण आहे.....शिक्षण हे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे क्षेत्र तुम्ही अगदी खालच्या तळाला अनुभवलेले आहे. सडेतोड उत्तर देण्याची क्षमता आपल्यात आहे पण वाचाळपणा नाही हा राजकारणी माणसातला सर्वात मोठा गुण तुमच्या जवळ आहे..... आपल्या पूर्ण तालुक्यातल्या कुठल्याही राजकारणी स्त्रीला आपला हेवा वाटेल असे व्यक्तिमत्त्व आपल्याकडे आहे म्हणून तुमच्याकडून माझ्या पक्षाची सेवा करवून घ्यायला मी आलो आहे. माझा तसा आग्रह समजा व माझ्या आग्रहाचा मान ठेवा.......""बापरे, भाऊजी तुम्ही तर मला पार हवेत तरंगायला लावलं, इश्श त्यात इतकी काय गळ घालता, तुम्ही हुकूम द्या, मी निवडणूक लढवायला तयार आहे......" सुरेखाताई भारावलेल्या शब्दांत बोलल्या.संतोषभाऊंनी राजाभाऊंकडे विजयी मुद्रेने डोळे मिचकावत बघितले.

तेजस्विनी-५

"देसाई, आपल्या मतदार संघात जिल्हा परिषदेसाठी ३ जागा आहेत. त्यातली एक सिट महिलांसाठी राखीव करण्यात आलेली आहे. इतर दोन जागा मोकळ्या आहेत, राखीव जागेचे काय करायचं ?" संतोषभाऊंनी देसाईंना खुर्चीत टेकत नाहीत तोच सरळ प्रश्न केला."भराडे बाईंखेरीज आपण आणखी कोणाला उभे करू शकणार भाऊ ?" देसाईंनी प्रतिप्रश्न केला."का ? भराडे बाईच का ?" संतोषभाऊंनी सुरेखाताईंबरोबर झालेले संभाषण अजून पर्यंत कोणालाच सांगितलेले नव्हते. त्यांना फक्त आपल्या जवळच्या सल्लागार मंडळींचा अंदाज घ्यायचा होता."आजच्या परिस्थितीत विरोधकांसाठी त्याच योग्य उमेदवार आहेत, राजकारणाचा अनुभवपण आहे व पाटलांच्या गोटातून आलेल्या असल्याने त्यांची सगळी अंडी पिल्ली जाणतात." देसाईंनी एका दमात भराडे बाईंची राजकीय वाटचाल सांगितली."पण बाई तोंडाच्या फाटक्या आहेत."......"भाऊ, थोडे फार दुर्गुण प्रत्येकात असतातच. त्यांच्या दुर्गुणांचा झाला तर फायदाच होणार आहे आपल्याला.""त्यांच्या ऐवजी दुसऱ्या नांवाचा विचार करायचा झाल्यास ?" भाऊंनी खडा टाकला."एकतर सद्य परिस्थितीत आपल्याकडे म्हणावा तसा ताकदवान उमेदवार नाही; दुसरे म्हणजे बाईंऐवजी दुसरा उमेदवार दिल्यास बाईंचा उपद्रव ऐन निवडणूकीत होईल" देसाई पटकन बोलले."बघूया काय करायचे ते, इतर दोन उमेदवारांवर पण विचार करावाच लागणार आहे तेव्हाचं ह्या जागेबद्दलही विचार करू" संतोषभाऊ बोलले.*************************************सुनील पाटलाने हेडमास्तरांवर सोपवलेले काम करण्याची तशी इच्छा मास्तरांची नव्हती, पण नानासाहेब पाटलांच्या कृपेने मास्तरांना लायकी नसताना हे पद मिळाल्याचे ते स्वत: जाणून होते. मोहिनी इंगळे त्यांची कोणी लागत नव्हती; तीच्या भवितव्याचा विचार करण्याऐवजी स्वत:च्या भविष्याची मास्तरांना जास्त काळजी होती. म्हाताऱ्या आईला तालुक्यातल्या दवाखान्यातली चांगली उपचार पद्धती ते तालुक्याच्या शाळेचे हेडमास्तर होते म्हणूनच मिळतेय हेही त्यांना व्यवस्थित कळत होते. असेही दोन शिक्षक शाळा सोडून गेल्याने जागा रिकाम्या होत्या त्या भरून काढायच्याच होत्या. ह्या निमित्ताने शाळेवर, पोरांवर व सुनील पाटलावर उपकार करण्याची संधी त्यांना आयती मिळाली होती ती हातची घालवण्याइतके ते मूर्ख नव्हते. पाडळस्याची प्राथमिक शाळा तालुक्याच्याच शाळेशी जोडलेली होती. उत्तरपत्रिका तपासण्यापासून ते पगार भत्त्यांपर्यंतची सगळीच कामे तालुक्यावरून संमती आल्याखेरीज पुढे सरकत नसत. मोहिनी इंगळेने डिएड ची पदविका घेतलेली होती. फक्त प्रार्थमीक वर्गांवर शिकवण्याचा तिला अनुभव होता. पुढील शिक्षण व प्रशिक्षण घेण्यास तिने लेखी नकार दिला होता व फक्त प्रार्थमीक शाळेची शिक्षिका म्हणून काम करण्याची इच्छा तिने स्पष्ट केलेली होती. ज्या दोन जागा रिकाम्या होत्या त्या माध्यमिक शिक्षकांच्या होत्या. हेडमास्तर हा ताप कसा दूर करायचा ह्या विवंचनेत आता पडले ! आपल्या स्टाफचे व्यवस्थित सहकार्य मिळाल्या खेरीज ह्या झंझटीतून सुटका नसल्याचे त्यांना कळून चुकले.
"स्टाफ मीटिंग ठेवलीय मास्तरांनी " विलासने कागद पुढे करताच विषय काय आहे ते न बघताच सुरेखा ताईंनी सही केली."कसली मीटिंग आहे ?" पिटी चे महाजन सर, जे भूगोलही शिकवत, पण ज्यांचा दोन्ही विषयांशी दूरान्वयेही संबंध नव्हता त्यांनी विचारले. महाजन सरांना सट्ट्याचे आकडे खुणावत असल्याचे त्यांच्या तोंडावरून स्पष्ट दिसत होते."मला तर लवकर जायचे आहे." त्यांनी आधीच घोषणा केली...."रोजच्या सारखेच ना ?" वैद्य बुवा पचकले."बुवा, तुम्ही सत्यनारायणाच्या पुजा सांगत बसा, मी आकडे लावत राहीन. पैसा आपल्या सगळ्यांचा वीक पॉंईंट आहे" महाजनांनी त्यांना सुनावले."महाजन, मला सट्ट्याचे आकडे लावता येतील... पण तुम्हाला पुजा सांगता येईल का ?""वा वैद्य बुवा.... वाकील व्हायचे ते चुकून शिक्षक झालात" अंतुर्लीकर बाई बोलल्या. सुरेखा ताई फक्त गंमत बघत होत्या. महाजन व वैद्य बुवांची जुगलबंदी रोजचीच असे. शिक्षक असूनही दोघे अडाण्यासारखे भांडत.हेडमास्तरांनी शाळेत मोकळ्या असलेल्या जागांवरून भले मोठे भाषण ठोकले त्यात सरकारचा पाणउतारा करत असल्याचेही त्यांनी दाखवून दिले. हळूच "एक बदलीचा अर्ज आलेला आहे तेव्हा आपला सर्वांचा विचार काय आहे ते कळावे म्हणून आपल्याला थांबवून घ्यावे लागले" अशी मखलाशी केली."मास्तर, जी काय कागदपत्रे सह्या करायचीत ती उद्या केली तर चालतील का ?" महाजन सरांनी मनगटावरील घडाळ्यात बघत विचारले. हेडमास्तरांनी संमतिदर्शक मान हालवून पूर्ण होण्याच्या आतच महाजन सर खुर्ची मागे सरकवून उभे राहिले."मोहिनी इंगळेंचे स्वागत आम्ही करूच मास्तर; पण त्यासाठी इतका मोठा फार्स करायची आवश्यकत: नाही" महाजन उद्गारले. मास्तरांनी वासलेला आ मिटायच्या आतच सरळ दाराकडे जात असलेल्या महाजनांना इतर सगळेच गोंधळात पडल्यासारखे बघत होते.
"आपल्या गांवात कोण किती वेळा पादतो हेही लपून राहणार नाही." मास्तर तोंडाचा आ मिटता मिटता बोलले."श्शी.... काय तर्रीच काय" वैद्य बुवांनी सोवळेपणाचा आव आणत नाकासमोर हात हालवला.शाळेच्या शिक्षकांची मीटिंग म्हणजे थिल्लरपणा असल्याचे स्पष्ट मत सुरेखा ताईंचे होते."विलास, अजून चहा आहे का ?" समोरच्या ताटलीतली उरलेली दोन मारी बिस्कटे तोंडात खुपसत गाजरे बाईंनी विचारले."तर मंडळी, आपले काय मत आहे ?" हेडमास्तरांनी सगळे काही इतरांना नीट समजले असावेच ह्या आवेशात विचारले."जागा भरल्या गेल्या पाहिजेत पण शिक्षक कुठून आणायचे ?" सुरेखा ताईंनी विचारले."पाडळस्याहून एक बदलीचा अर्ज आलेला आहे" मास्तरांनी उगीचच हातातल्या कागदांवर नजर फिरवत म्हटले."पण पाडळस्याची शाळा प्रार्थमीक आहे मास्तर; आपल्याकडे माध्यमिक शिक्षकांच्या जागा मोकळ्या आहेत." सुरेखा ताई पटकन बोलल्या."त्यात काय मोठे; आपल्यातल्या एखाद्या प्रार्थमीक शिक्षकाला माध्यमिक वर्गावर बदलून घ्यायचे व मोकळ्या जागेवर प्रार्थमिक शिक्षकाची नेमणूक करायची." मास्तर बोलले."कोणाला बढती द्यायची ?" सुरेखा ताईंनी सरळ विचारले."आपल्यापैकी जो ज्येष्ठ असेल त्याला" वैद्यबुवांनी वादाला तोंड फोडले.पुढे झालेल्या रणधुमाळीत सुरेखा ताईंना जराही स्वारस्य नव्हते. विलासने परत आणलेल्या चहाचे घोट घेत त्या पदासाठी सुरू झालेला तमाशा बघत राहिल्या. अखेरीस वैद्य बुवांनी सरशी मारली. २५५ रुपयांच्या मासिक बढतीच्या बदली त्यांनी स्टाफला महिन्यातून एकवेळा दुपारचा नाश्ता घासाघीस करून, कबूल करीत बढती विकत घेतली. १२५ रुपयांचा नाश्ता मासिक भीसीच्या दिवशी द्यायचे नक्की होताच बैठक संपल्याचे जाहीर करण्यात आले व सुरेखा ताईंनी सुस्कारा सोडला. वैशु वाट बघत पायरीवर बसली असेल ह्या विचारांनी त्यांचा जीव कासावीस झालेला होता.हेडमास्तरांनी मात्र एका दगडांत पाच पक्षी मारले होते......शाळेचे व पोरांचे भले होणार असल्याचा आव आणत, सुनील पाटलाचे काम केले होते, वैद्य बुवांना खूश करण्याचे साधले तर होतेच वर मोहिनी इंगळेवर इंप्रेशन मारता येणार होते. सुनील पाटलाकडून भाजीपाला व दुधाचा रतीब वाढवून मिळाला असता तो वेगळाच.********************************"बाईंचे मत विचारात घ्यावे लागणार भाऊ " शेळके मास्तरांनी दिलेल्या शेऱ्यावर विचारे साहेबांनीही संमतिदर्शक 'हो' जोडला."भराडे बाईंना विचारण्यापूर्वी तुम्हा सर्वांचे मत अजमावावे म्हणून बोलावले मास्तर; एकदा त्यांच्या नावाचा विचार होतोय हे त्यांना कळले की विषय संपल्यातच जमा होईल." संतोषभाऊ बोलले. "त्यांच्या ऐवजी दुसरा उमेदवार दिल्यास ?" त्यांनी दोघांकडे बघत विचारले."तर भराडे बाई आपल्या सगळ्यांना भरडून काढतील" स्वत:च्या पांचट विनोदावर खुदखूदत विचारे बोलले.संतोषभाऊंसमोरचा पेच वाढत होता. त्यांच्या मनातून भराडे बाईंना उमेदवारी द्यायची नव्हती पण राजाभाऊ सोडल्यास इतरांची सुरेखाताईंच्या नावावर संमती मिळण्याचे लक्षण दिसत नव्हते.वासुभाऊ व फिरकेंनीही त्यांना भराडे बाईंचेच नांव सुचवलेले होते. राजाभाऊंशी सुरेखाताईंबद्दल बोलण्याच्या पूर्वीचं आपण ही मते मागवायला हवी होती असे त्यांना राहून राहून वाटायला लागले. ह्या परिस्थितीत आपण घोडचूक केली तर नाही ह्या विचारांत ते गढून गेले.इंटरकॉम वर 'राजाभाऊंच्या कॉलेजला फोन लावून त्यांना सायंकाळी घरी बोलावणे पाठवा'असा निरोप द्यायला त्यांनी स्वत:च्या स्वीय सहाय्यकाला सांगितले. राजाभाऊंना निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती देऊन काय मार्ग काढता येईल हेच आता त्यांना बघावे लागणार होते.********************************"सुनील औंदाच्या झेडपीच्या निवडणुकांसाठी सुहासरावांना अध्यक्षपदाचा उमेदवार करायचं म्हंतोय मी" नानांनी सुनील पाटलाला सांगितले. सुनीलची चुळबूळ सुरू होती."पन बाई माणसाला अध्यक्षीण बन्वायच हाय न्हवं यंदा ?" उगीचच फाटा फोडत त्याने विचारले."न्हाय, प्रत्येक दोन वेळा पुरूष माणूस अध्यक्ष झाला की मागून बाई माणूस व्हनार दाजी" रमेशने मेहुण्याची बाजू राखली."माजी काय बी हरकत न्हाई दाजी" सुनील लगेच बोलला. "पण माज्या मित्रांपैकी हाईत उमेदवारीसाठी एक दोग...... तवा एखादी सिट त्यांनाबी द्या की दाजी...." सुनीलने लकडा लावला.नानांनी ही अपेक्षा केली होतीच. "तुज्या मेव्हणीला म्हनावं उबी र्हा की निवडणूकीला" रमेश मध्ये तोंड खुपसत बोलला."रमेश, घरच्या बाई माणसाला घरातच राहू दे" सुनीलने ताडकन सुनावले."आक्शी म्या म्हटल; त्या घरच्या कुठं हाईत ? पाटील खानदानच्या बाहेरच्याच हाईत की !" रमेशने स्वत:च्या मेहुण्या कडे तिरपा कटाक्ष सोडत म्हटले.सुहासची नजर सुनीलच्या मेहुणीवर असल्याचे त्याला चांगलेच ठाऊक होते. सुहास अध्यक्ष व सुनीलची मेहुणी सभासद झाल्यास हे सुत जुळू शकेल हाच विचार त्याच्या डोक्यांत होता."काय करायचं त्ये आमी पाहून घेऊ, सुहासला अध्यक्षपदासाठी उभं करायचं इतकंच सांगतूय आता." नानासाहेबांच्या फर्मानासमोर कुणाचे काही चालत नसे.नानासाहेब पाटील घराबाहेर पडताच सुनीलने रमेशचा आई बहिणीवरून उद्धार करीत त्याची गळचंडीच पकडली. "हरामखोरा, बहिणीच्या घरी राहतोस वर इकडेच हागुरडी करतोस मा****........"दोघांच्यात चांगलीच जुंपली. सुहासने दोघांना सावरण्याचा प्रयत्न करण्याच्या आधीच रमेशने चांगल्या दोन चार कानफडात खाऊन घेतल्या होत्या."वैनी, तुमच्या ह्या भ**ला सांगून ठेवा, माह्या रस्त्यात हागुरडी केली तर गांवात ठेवणार न्हाय" सुनील सरळ मोठ्या भावजयेवर भडकून बोलला.सुहासला निमित्त मिळाले व त्याने फाडकन सुनीलच्या मुस्काडात मारली.....पाटील वाड्यावर मग चांगलीच जुंपली. दोघांच्या बायका, मेहुणे, मेहुण्या सगळेच रणकंदनात उतरले. एकमेकांच्या घराण्यांचा उद्धार होत होता. एकमेकांच्या लफड्यांचा भांडेफोड होत होता.......अखेरीस नेहमीसारखा तासभर गावगोंधळ घातल्यावर हळूहळू पाटील बंधू शांत झाले.बघ्यांची व घरातल्या नोकरवर्गाची करमणूक संपुष्टात आली. नानासाहेब पाटलांना ह्यातला एक शब्द कळवण्याची हिंमत कोणाच्यातच नव्हती.भांडण चालू असताना सुनीलने मोठ्या भावाला धमकी दिलेली होती. "मोहिनी इंगळेला सिट न्हाय मिळाली तर बगून घीन"मोहिनी इंगळे "विकास आघाडी" पक्षाच्या अधिकृत महिला उमेदवार म्हणून उभे राहणार असल्याचा गौप्यस्फोट थोड्याच वेळांत गावभर झाला.....चर्चेला उधाण आले........

तेजस्विनी-६

दुपारची निवांत वेळ होती. अट्रावल नावाच्या त्या छोट्याश्या गांवातल्या लोकांची जेवणे आटोपून ते आपापल्या उद्योगांत मग्न होते.काही रिकामटेकडी मंडळी लिंबाच्या पारावर बसून एकमेकांच्या निंदा नालस्त्या करण्यात मग्न होती.बायका मंडळी आवरा आवरी करून वामकुक्षी घेण्याच्या तयारीला लागलेल्या होत्या.दूरवरच्या शाळेतून मुलांनी म्हटलेल्या पाढ्यांचा आवाजही जड वाटत होता.
एक बेवडा भर दुपारी हातातली रिकामी बाटली दाही दिशांना गदे सारखी फिरवत स्वत:चा तोल सावरत जात होता. विज्या बेवड्याला अख्खे गांव ओळखे.... चोवीस तास, तीनशे पासस्ठ दिवस तो ह्याच अवस्थेत होता. जो कोणी दारू पाजेल त्याला आपला जन्मदाता म्हणायचीही त्याची तयारी होती. आपल्या बेवडे पणावर त्याला गर्व होता. जेव्हा जेव्हा फुकटाची दारू ढोसायला मिळाली की ती पिऊन "चावडी" वर स्वत:च्या पिण्याचा ढिंढोरा पिटत बसे.
पारावरच्या मंडळींत फुसफूस सुरू झाली. सगळे जण आपापले संभाषण सोडून विज्याची फुकटची करमणूक बघत राहिले."काय रं रांडेच्या, हांसतूस व्हय मले ?" विज्याने पारासमोरच्या मातीत बसकण मारत व मानं घडाळ्याच्या काट्यासारखी फिरवत विचारले. तो नेमका कुणाला बोलला हे न कळल्याने अजूनच खसखस पिकली."भ*व्या मालकाच्या माणसाला हासतो व्हय ? मालकाले समजलं तर धिंड काढलं नागडं करून तूही " बोलताना चंद्या लोखंडे कडे हात करून तो बोलला."मायला तुह्या विज्या, शेण खायांचं सोडून, टाकतोस कोनापायी ?" चंद्याने कावतं विचारले."मालक बोलले, चंद्या भ*वा आहे चौधरीचा, त्याच्यावर नजर ठीव म्हनून " विज्याने दिवसा तारे तोडले."मग मालक कुणाचा भ*वा आहे? तुज्या मायचा का ?" चंद्या तापत चालला होता."जावं देरे चंद्या, हा फुकाची ढोसून लफडं वाढवायला आलाय " गण्या भोळे मातीत पचकन थुंकत बोलला."गण्या तुह्या भैनीला तर मालकानं उभ्या ****** " पुढची वाक्ये ऐकणाऱ्यांचे कानही तापत होते.
गण्या व चंद्याने विज्याची धू धू धुलाई केली. अख्खे अट्रावल जमा झाले होते. शेवटी सरपंच स्वत: मध्ये पडले तेव्हा कुठे विज्याला श्वास घेता आला.दुपारी चहा पिण्याच्या सुमाराला अट्रावलात चार जिपड्या एकापाठोपाठ येऊन थांबल्या. कोंबलेली माणसे हातात लाठ्या काठ्या घेऊन बाहेर पडली ती सरळ लिंबाच्या पाराकडेच गेली. हातात रिव्हॉल्व्हर नाचवत सर्वात पुढे होता सुहास पाटील - तर पाठोपाठ त्याचा मेहुणा रमेश. हाताशी येईल त्याला काठ्यांनी बदडत त्यांनी पार धुऊन काढला व मोर्चा गावकऱ्यांच्या घराकडे वळवला. घराघरातून नासधूस करीत, बाया बापड्यांना व लहान मुलांना पायाने कुथाडीत तर म्हाताऱ्या कोताऱ्यांना ढकलत पाटलांची माणसं गावभर नासधूस करू लागली. समोर येईल त्याला लाठीचा किंवा लाथेचा प्रसाद, मिळतं होता. सुनील पाटलावरचा सकाळचा सगळा राग अट्रावलकरांवर निघत होता.भारताला स्वातंत्र्य मिळून उणीपुरी ५० वर्षे होऊन गेलेली होती पण सरंजामशाही इथून जायचं नांव घेत नव्हती.कण्हतं पडलेलं अट्रावल गांव सुहास पाटलाच्या खिजगणतीतही नव्हतं.*********************संतोषभाऊ चौधरींच्या कानावर ही बातमी आली तेव्हा ते घरीच राजाभाऊंची वाट पाहतं होते. फोन वरच त्यांनी पटापट फर्मान सोडायला सुरुवात केली. आपल्या सगळ्या समर्थकांना त्यांना बोलावून घेतले. शेळके मास्तरांना अन्नपूर्णा खानावळीत परस्पर जायला सांगून २५०/३०० जणांसाठी जेवण तयार करून अट्रावलला पोहचवण्याची व्यवस्था करायला सांगितली.दोन दुचाकी स्वारांना पार्वती मेडिकल स्टोअर्स मधून आवश्यक ती प्रथमोपचाराची सामुग्री व काही वेदनाशामक औषधे आणण्यास पिटाळले. राजाभाऊ आत आल्या आल्या, हा काय गोंधळ चालू आहे ते त्यांना न कळल्याने त्यांनी मालती वहिनींकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघितले तेव्हा वहिनींनी त्यांना अट्रावलवर गुंडांचा हल्ला झाल्याचे सांगितले.इतक्यात देसाई दूध महासंघाची एस्टीम व डॉ. काळेंना घेऊन आले. प्रियांकला राजाभाऊंनी घरी पाठवले, सुरेखाताई नुकत्याच शाळेतून येऊन टेकल्या होत्या त्या तश्याच प्रियांक बरोबर बंगल्यावर पोहचल्या. लगबगीने भाऊंनी सगळ्यांना बरोबर चलण्याचा इशारा केला. संतोषभाऊ एस्टीम स्वत: चालवायला बसले सोबत मालती वहिनी, देसाई, डॉ.काळे व वयोवृद्ध विसूभाऊंना घेऊन इतरांची सोय त्यांनी तीन जीप गाड्यांत केली.फौजदार बोरसेंची जीप अर्ध्या वाटेवर भेटताच सर्व लवाजमा अट्रावलकडे रवाना झाला. अट्रावल २० की.मी.चा दगड मागे पडला तेव्हा झुंजूमुंजू झालेले होते.****************************************************नानासाहेब पाटलांनी कपाळावर हात मारून घेतला. नको त्या वेळेस सुहास पाटलाने लचांड उभे केले होते. पक्षश्रेष्ठी कुठल्याही परिस्थितीत झाला प्रकार खपवून घेणार नाहीत ही गोष्ट ते जाणून होते. त्यांनी तातडीने जळगांवला फोन लावला. रावसाहेबच त्यांना ह्या प्रकारणातून तारतील ही त्यांची खात्री होती.रावसाहेब गाजरे त्यांचे सख्खे मामा. बहिणीच्या मुलांवर, नाना, दिघू, प्रदीप त्यांचे अतोनात प्रेम होते. दिघू म्हणजे नानांच्या खालचा भाऊ संन्यास घेऊन परागंदा झाला. प्रदीप दुबईला गेला तो परतून आलाच नाही. तेथेच त्याने कसलातरी व्यवसाय सुरू केला. एका केरळी ख्रिस्ती मुलीशी लग्न केल्याचे निमित्त करून नानांनी त्याच्याशी संबंध तोडले व त्याला वाळीत टाकले.आपोआपच वडिलोपार्जित सगळी मिळकत नानांची झाली.राजाभाऊ जाधवांच्या वडिलांची आई रावसाहेबांची दुसरी बहीण. राजाभाऊंच्या आजोबांशी तिचे लग्न झाल्यावर जाधव कुटुंबीयाचे जमिनींच्या वादावरून गाजरेंशी वाजले तेव्हा पासून गाजरे कुटुंबीयांनी जाधव कुटुंबाशी उभे वैर धरले. नानासाहेबांचे वडील सज्जन म्हणून त्यांनी वैर जरी नाही धरले तरी फक्त लग्न किंवा मर्तिक प्रसंगीच जाण्या इतके संबंध ठेवले.
रावसाहेब गाजरे "विकास आघाडी" चे मोठे प्रस्थ होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून पक्षाचा जिल्ह्यातला आधारस्थंभ रावसाहेबांच्या वाड-वडिलांपासून चालत होता. सध्या वयोमानामुळे सक्रिय नसले तरी जिल्ह्यात पक्षाचे सर्वेसर्वा तेच होते. त्यांचा मुलगा, राजेंद्र्कडे पक्षाचे जिल्हाध्यक्षपद होते.सुहासने अट्रावल वर केलेल्या हल्ल्याची तक्रार करण्यास सुरुवातीला अट्रावलकर तयार नव्हते. सरपंचांनी अजिजीने अट्रावलकरांना भानगडींपासून दूर राहण्याचे आवाहन केले परंतू ते ठरले नानासाहेब पाटलांच्या गोटातले.....चंद्या किंवा गण्या सारख्या तरुण रक्तात दादागिरी व अन्याया विरुद्ध दाद मागण्याची वृत्ती असल्यानेच फौजदार बोरसेंनी सुहास पटलाविरुद्ध प्रथमच लेखी तक्रार नोंदवली.तक्रारीत गुंडांच्या साहाय्याने गावावर सशस्त्र हल्ला केल्याचे नमूद करण्यात आल्याने तक्रार गंभीर स्वरूपाची होती.प्रथमच नानासाहेब पाटलांच्या अन्याया विरुद्ध पोलिसात तक्रार करायला कोणी धजावले होते.पाटलांच्या दैवचक्राच्या उतरंडीची सुरुवात झालेली होती.**************************************महत्त्वाच्या विषयावरील चर्चेस, दूध महासंघाच्या कार्यालयातील चौथ्या मजल्यावरील बैठक कक्षांत, मंडळींना पाचारण करण्यात आलेले होते. वासूभाऊ, विचारे, शेळके मास्तर, फिरके, देसाई, भराडे बाई, सुरेखा ताई, राजाभाऊ तसेच "जन जागृती" पक्षाच्या शाखांचे १९ पदाधिकारी, स्वत: संतोषभाऊ व त्यांचे स्वीय सहाय्यक, दूध महासंघाचा एक मराठी लघुलेखक व कारकून मिळून ३२ सदस्य बैठकीला उपस्थित होते.सर्वप्रथम अट्रावल वर झालेल्या हल्ल्यानंतर पक्षातर्फे करण्यात आलेल्या मदती बद्दल देसाई साहेबांनी थोडक्यात म्हणजे चांगली अर्धा तास माहिती दिली. माहिती देत असताना त्यांनी योग्य वाक्यांवर जोर देत तर कुठे हळवे पणाने बोलत घडलेली घटना विस्तृतपणे सांगितल्याने जी मंडळी अट्रावलच्या मदत कार्यांत हजर नव्हती, त्यांच्यासाठी तो 'आखो देखा हाल' च होता.
अट्रावलच्या मदत कार्याचा पूर्णं खर्च दूध महासंघाने उचलल्याचे त्याच दिवशीच्या वर्तमानपत्रांत जाहिरातींद्वारे आम जनतेला कळवण्यात आलेले होते. संतोषभाऊ चौधरींनी सुहास पाटलाची कुठेही नांव न घेता केलेली जिल्हाभर निंदा ह्याचेच ते द्योतक होते. पंचक्रोशीतल्या जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींमध्ये शिरकाव करण्यासाठी 'जन जागृती' पक्षासाठी 'अट्रावलचे मदतकार्य' हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरलेला होता.ह्यानंतर मतदारसंघातल्या ३ व तालुक्याशी जोडल्या गेलेल्या जिल्हा पंचायतींच्या ८ जागांसंदर्भात तसेच ग्रामपंचायतीच्या जागांसंदर्भात निर्णय घ्यायचा असल्याने आजची बैठक बोलावली असल्याचे सांगत देसाईंनी वयोवृद्ध वासूभाऊंना मार्गदर्शनापार चार शब्द सांगण्याची विनंती केली.
वासूभाऊंचे भाषण म्हणजे कार्यकर्त्यांशी थेट संवादच असे. आलेल्या शाखा पदाधिकाऱ्यांची नांवे घेत, त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याचा उल्लेख करीत, ते शब्दांनी त्यांना शाबासकी देत होते. कुठे हळूच केलेल्या चुकांबद्दल हलकेच कानपिळणी होत होती. अत्यंत खेळीमेळीचे वातावरण निर्माण करीत त्यांनी देसाईंच्या भाषणांतला होता नव्हता तो रटाळपणा काढून टाकला. भाषणाच्या शेवटी वासूभाऊंनी भराडे बाईंवर खास स्तुतिसुमने उधळली. अट्रावलला केल्या गेलेल्या मदत कार्यांत भराडे बाईंनी अक्षरश: घराघरातून स्त्रियांना वेचून काढत बोलते केले होते. महिलांच्या दु:खांचा कढ कमी करण्यास त्यांच्या शब्दांनी बरीच मदत केलेली होती. वासूभाऊ भाषण संपवून खाली बसले ते टाळ्यांच्या गजरातच.....सुरेखाताईंच्या डोळ्यांचे कोपरे कुठेतरी पाणावल्याचे त्यांना जाणवलेही नव्हते.अचानक काहीतरी आठवल्याने ते तसेच ताडकन उभे राहिले.भाषणाला सुरुवात करीत असलेल्या संतोषभाऊंना हाताच्या इशाऱ्याने थांबवत, "ह्या सर्व धावपळीत आपल्या पक्षांत एका मुलीचे स्वागत करायचे राहून गेले..... " सुरेखा ताईंकडे निर्देश करीत ते म्हणाले."अट्रावलच्या घटनेत तन्मयतेने ती काम करीत असल्याचे पाहून, आपल्या पक्षाला एक चांगली कार्यकर्ती मिळाल्याचे समाधान वाटले. लवकरच पक्षाची आघाडी सांभाळ हा आशीर्वाद मी तिला देऊ इच्छितो. हल्ली वयोमानामुळे विसरायला होते म्हणून तिचा उल्लेख करणे अनवधानाने राहून गेले".वासूभाऊ परत खाली बसेपर्यंत सुरेखा ताईंचे डोळे चांगलेच पाणावले होते व सगळ्यांच्याच ते लक्षांत आले. बसल्या जागेवरून उठत त्या वासूभाऊ बसलेल्या खुर्चीकडे गेल्या व वाकून त्यांना नमस्कार करीत त्यांच्या आशीर्वादाचा शालीनतेने स्वीकार केला. परत झालेला टाळ्यांचा कडकडाट त्या स्वत:च्या खुर्चीवर बसेपर्यंत होत होता.
अचानक घेतलेल्या ह्या वळणाने संतोषभाऊंना एक नवीनच उभारी मिळाली. "मित्रहो, यंदाच्या निवडणुकांमध्ये महिला उमेदवार म्हणून आपल्या पक्षातर्फे कोणाला उभे करावे हा मला पडलेला पेच आपल्या ह्या दोन महिला कार्यकर्त्यांनी चुटकी सरशी सोडवल्याबद्दल मी त्यांना व्यक्तिश: धन्यवाद देतो." संतोषभाऊंच्या भाषणावर नेहमीच वासूभाऊंची पडलेली छाप दिसून येई. वासूभाऊंना आपले राजकीय गुरू मानणारे संतोषभाऊ त्यांच्याच लकबीने भाषण करीत.एक क्षण सगळे एकदम स्तब्ध झाले.....मग आपापसांत कुजबूज सुरू झाली...संतोषभाऊ पुढे काही बोलण्याच्या पूर्वीच जवळपास गोंधळाला सुरुवात झाली. प्रत्येक जण डाव्या उजव्या हाताशी बसलेल्या कार्यकर्त्याशी बोलण्यात गुंतला......"शांतता राखा, कृपया शांतता राखा....." देसाईंच्या खणखणीत आवाजाने सगळे शांत झाले. खुद्द देसाई गोंधळात पडलेले होते पण बैठकीवरचे नियंत्रण ताब्यात ठेवणे त्यांना व्यवस्थित जमत असे."भाऊ काय सांगत आहेत ते नीटं समजावून घेतल्याशिवाय कृपया आपापसांत चर्चा करू नये अशी मी कार्यकर्त्यांना विनंती करतो." देसाईंनी जणू काही भाऊंना पुढे बोलण्याचा इशाराच केला.
"माझ्या हाती असलेल्या माहितीनुसार 'अट्रावल' चे मतदार क्षेत्र महिलांसाठी राखीव म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. अट्रावलची आजची परिस्थिती व दूध महासंघाने व भराडे बाईंनी अट्रावलात केलेले कार्य पाहता अट्रावलची जिल्हा पंचायतीची जागा विनासायास भराडे बाई आपल्या पक्षासाठी खेचून आणू शकतील." संतोषभाऊंनी उपस्थितांवर नजर फिरवीत केलेले भाष्य जवळ जवळ सगळ्यांनाच मान्य झाले.समोरच्या मेजावर हात थोपटत बहुतेकांनी त्याला मान्यता दिली."पण भाऊ, मी तर तालुक्याची मग अट्रावलांतून मला निवडणूक लढवता येईल ?" भराडे बाईंनी शंका काढली."का ? जर दिल्लीत राहणारी महिला कर्नाटकातून लोकसभेला उभी राहू शकते तर पंचायतींना वेगळा नियम का असावा ?"...."........" सगळेच निःशब्द होते."तरीही मी तहसील कार्यालयातल्या सचिवांना किंवा त्यांच्या स्वीय सहाय्यक मोकाशींना विचारून नियमांची खातरजमा करून घेईन." ह्या वाक्याने उरल्या सुरल्या शंका नष्ट झाल्या.....पुढची कार्यवाही सुरू होण्याच्या आतच कार्यकर्त्यांनी भराडे बाईंचे अभिनंदन करावयास सुरुवात केली.

तेजस्विनी-७

या सुनील राव, या" तहसीलदार तुते तोंडभरून हसत म्हणाले."काय तुते, समदं काही ठीकं आहे ना ?" सुनील पाटलाने सलगीने विचारले. सुनील पाटलाची भाषा, काम निघालं की, कधी मग्रुरीची नसे. स्वत:ची कामे तो धुर्तपणे करून घेई."अक्शी गोंधळ झालाय छोटे मालक, पण नाना सांभाळून घेतीलच" तहसीलदारावर नानासाहेबांचे बरेच उपकार होते. ढापलेल्या शेत जमिनींचे उतारे तलाठ्या मार्फत आपल्या नांवावर करताना नानासाहेब सगळ्यांना त्यांचा हिस्सा नियमीतपणे देत."सुहास रावां बद्दल बोलताय व्हय ?" सुनीलने सहज विचारावे तसे विचारले, "त्यान्सी लई घाई होते कामं उरकायची.... तिच्यात तो रमेश भरीला पाडतो, आता हुईल त्ये बगायचं इत्कच हातात हाय न्हवं""विरोधकान्सी आयतं कोलीतच दिलय हातांत, न्हव का ?" तुते शब्द झेलत म्हणाला."दादांची जमानत झाली त्येच नसिब म्हणायच " त्याच्या ह्या वाक्यावर सुनील पाटलाने फक्त मान हालवली.
"आज इकडे कुणीकडे छोटे मालक ?" तुतेने त्याला गप्प बसलेला पाहून विचारले."हेडमास्तर काही बोलले का ?" पाटलाने अंदाज काढायच्या सुरांत विचारले."कस्ल व्हो ?" तुते डांबरट माणूस होता, त्याला सुनील पाटलाच्या तोंडून मोहिनी इंगळेच्या कामाबद्दल ऐकायचे होते."इंगळे बाईंच्या बदलीच काई बोलले न्हाई का हेडमास्तर तुमास्नी ?" सुनील पाटलाने आवाजात करडेपणा आणत विचारले."छोटे मालक, माफी मागतो पण डोस्क्याचा पार भुगा झालाय. मी इसरूनच गेल्तो बगा"तुतेने मखलाशी केली."आता बदाम पाठवतो घरला, म्हंजी चांगलं ध्यानांत राहतील आमची कामं तुमास्नी" पाटील बोलला."तसं काय बी न्हाई मालक, जी आर आलाय जिल्हाधिकारी हापीसातन, सगळ्या बदल्या थांबीवल्यात साहेबांनी" तुतेने वाईट बातमी सांगितली.
"मग कस करायचं ? " सुनील पाटलाला मोहिनीला तालुक्याच्या गांवी आणायचेच होते."झेड पी हापीसातला सचिव हाय, रातच्याला बोलवू का त्याला हायवेवरल्या हाटेलात?" तुतेच्या तोंडातून लाळ टपकायला लागली."तो काय उजेड पाडणार हाय ?" पाटलाला कामाच्या माणसालाच खाऊ/ पिऊ घालायचे होते."बदली अर्ज मागच्या महिन्यात संमत झाला असं दाखवावं लागल मालक " तुतेने खाजगी आवाजात सांगितले."मग घोडं कुठ अडलय ?""आता बाई मानसा कडून त्यो सचिव खाईल काय आन पिईल काय मालक ?" तुतेने खरी अडचण सांगितली."कळलं, रातच्याला बोलवा त्याला पण आदूगरच सांगून ठेवतोय, काम झालं म्हंजी झालंच पाहिजे अन बातमी बाहेर जायला न्हाई पायजेल""बस का मालक ? आजवर कदी केलाय का म्या असला गुना ?" तुतेचा रात्रीचा बकरा कापला गेला होता.
हायवेवरच्या ढाब्याची जमीन नानासाहेबांचीच होती. फक्त दारू बाहेरून न्यावी लागणार होती. मोहिनी साठी काहीही करायला पाटील तयार होता व डांबरट तुतेला सर्व प्रकारांची व्यवस्थित कल्पना होती.
रातच्याला वस्तीला बाहेर असल्याचा निरोप बायकोला सुनील पाटलाने कळवला तेव्हा सायंकाळ उलटत आलेली होती. रात्री झेडपी ऑफिसातला सचिव व तहसीलदार तुते बरोबर ढाब्यावर त्याने अख्खी कोंबडी व बाटली रिचवली.सचिवाने २ हजाराच्या बदल्यात तसा अर्ज दाखल करून घ्यायला मंजुरी दिली. पाटलाने शंभराच्या दहा कोऱ्या नोटा त्याच्या हातावर टिकवल्या."बाकी काम झाल्यावर " सुनील पाटील गुरगुरला."मालक माज काय ?" तुतेने हावरटासारखे विचारले."त्या जयपालच्या केस मंदी मागच्या मैन्यात रतीब वाढिवला न्हाय कारे तुह्या ?" पाटील कावत बोलला."असं काय करता मालक, तुमी फेकलेल्या तुकड्यावर जगतो आमी गरीब मानसं, थोडं अधिक द्यावं की मालकांनी" तुते आधाशीपणाने बोलला."काम जाल्यावर भेट" म्हणतं पाटलाने रजा घेतली.
स्वत:च्या ड्रायव्हरला त्या दोघांबरोबर रिक्शाने पाठवून सुनील पाटील एकटा सुमो घेऊन पाडळस्याला निघाला. आज पाडळस्यालाच वस्तीला राहा असा निरोप त्याने मोहिनी इंगळेला पाठवलेला होताच. मोहिनीच्या आठवणीनेच तो मोहरून गेला.*******************************रावसाहेब गाजरेंसमोर जिल्ह्याचे डीसीपी हेगडे साहेब सोफ्यात आरामात बसले होते. एका पायावर दुसरा पाय टाकून मागे रेलून बसलेल्या हेगडेंनी जिल्ह्यातली पोस्टिंग गेली ४ वर्षे व्यवस्थित मॅनेज केलेली होती. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींकडेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा राबता असतो म्हणून त्यांना नाराज न करणे हेच हेगडे साहेबांचे ईप्सित होते.दुसरीकडे नानासाहेब पाटील व राजेंद्र गाजरे तर एका खुर्चीवर जामिनावर सुटलेला सुहास पाटील होता. विषय अर्थातच अट्रावल प्रकरणाचा होता. आतापर्यंत चर्चा जवळपास संपतच आलेली होती.
"फौजदार बोरसेंना सांगून फाइल आजच मागवतो रावसाहेब" हेगडे बोलले."नुस्ती फाइल नको हेगडे, साक्षीदारांची नांवेबी पायजेल" राजेंद्र बोलला."ती फाइल मध्येच मिळतील" हेगडे आश्वस्त पणे म्हणाले."तो चौधरी गेला होता बोरसेंला घीऊन, त्याने बोरसेला पढवून ठेवलेला असेल" नानासाहेब बोलले."असू द्यात की, बोरसे माझ्या हुकुमाबाहेर नाही..... जास्त काही करायला गेला तर जिल्ह्याच्या ठिकाणी घेतो त्याला"हेगडे उठत उठत बोलले. "आता सांभाळावं पाटील साहेब, हा जामीन सुरू असेपर्यंत कुठली एन.सी ही यायला नको तुमच्या बद्दल" निघता निघता त्यांनी सुहासला सुनावले.
हेगडेचे लहानपण महाराष्ट्रातच गेले होते. तरुण पणी कॉलेजात धिंगाणा घालणारा युवक म्हणून तो प्रसिद्ध होता. अकोल्याहून जेमतेम बीएची पदवी घेऊन एमपीएससीची परीक्षा देऊन त्याने पोलिस दलांत प्रवेश केला तेव्हा 'वाया गेलेलं हे कार्टं त्याच लायकीच होतं' असच त्याला ओळखणाऱ्यांचे मत झाले. सर्व्हिस मध्ये कामाऐवजी मध्यस्थी करवून देणारा अधिकारी म्हणून त्याने नांव कमावले. सोबत बरीच निनावी मिळकत कमावली. स्वत:वर कठिण प्रसंग आल्यास वरिष्ठांकडे सहपत्नी जाण्यास हा गृहस्थ कचरत नसे.
रावसाहेबांनी व राजेंद्राने सुहास पाटलावर आलेला प्रसंग लीलया परतवून लावला. पक्षाच्या बैठकीत हा प्रश्न उभा राहताच त्यांनी इतर पक्षश्रेष्ठींच्या पोरांच्या कुलंगड्यांची यादीच सादर केली व पक्षातल्या विरोधकांची तोंडे आपोआपच बंद झाली. सुहास पाटलाची ग्राम पंचायतीच्या निवडणूकीला उभे राहण्याची शक्यता मात्र मावळली. कारण पक्षश्रेष्ठीच नव्हे, तर स्वत: राजेंद्रही 'यावल' तालुक्यातल्या पंचायतीची मते सुहास पाटलाला मिळणार का ह्या बद्दल साशंक होता. त्याऐवजी सुनीलला निवडणुकींचा उमेदवार म्हणून पुढे ढकलायचे नक्की करण्यात आले तेव्हा सुनील झेडपी सचिव व तहसीलदाराबरोबर सौदा करण्यासाठी ढाब्यावर बसला असल्याचे त्यांना माहीत नव्हते.नानासाहेब पाटलांनी घरी परतेपर्यंत गाडीत सुहास वर चांगलेच तोंडसुख घेऊन त्याला साफ अर्धमेला करून टाकलेला होता. रमेश तर हल्ली नानासाहेबांच्या आजूबाजूनेही फिरकत नसे.**********************"हेगडेंनी स्वत:चे वजन वापरून केस दाबली भाऊ " देसाईंनी संतोषभाऊंना आल्या आल्याच रिपोर्ट दिला."मला माहीत होते हे घडणार, पण सुहासला आता कमीत कमी निवडणुका होईपर्यंत शांत बसणे भाग आहे. " संतोषभाऊ बोलले."सुहास पाटलाच्या ऐवजी सुनीलला उभे करणार असल्याचे ऐकले भाऊ," देसाई बोलले."मग तर प्रॉब्लेम वाढलाय, कारण सुहास पाटलाबद्दल लोकांचे मत खराब आहे पण सुनील पाटलाने कमीत कमी नांव खराब करवून घेतलेले नाही" संतोषभाऊ जरा काळजीने बोलले."मोहिनी इंगळे प्रकरण बाहेर काढलं तर ?""त्याने फारसा फरक पडणार नाही देसाई, आजकाल टीव्ही वरच्या मालिका बघून लोकांची मन:स्थितीही तसलीच होत चालली आहे. उलट काहींना त्यात मोठेपणा वाटतो.""तिची इथल्या शांळेत बदली करवून, तिलाच महिला उमेदवार म्हणून उभी करणार असल्याचे ऐकून आहे." देसाई बोलले."सुनील पाटलांची भानगडीची बाई दिसायला कशी दिसते, ते बघायला गर्दी जमेल पण लोकं तिला मत मात्र देतील की नाही ह्यात शंका आहे. सुरेखा वहिनींना मात्र आपल्या सहकारणी बरोबर लढत द्यावी लागेल.""एकूण १६ जागांवर आरक्षण आहे. त्यापैकी आपल्या तालुक्यात ४ जागा आहेत भाऊ, इतर दोन जागांचे काय करायचे ?""किरण चौधरींची जागा त्यांच्या पत्नीला द्यावी कारण त्यांचे निंभोरा व आसपासच्या भागातले काम उत्कृष्टंच आहे. सावद्याला माळी वहिनींना बरीच मंडळी ओळखतात. आपल्या विभागातल्या राखीव जागांची काळजी नाही असे सध्या तरी वाटतेय"
इतक्यात वासुभाऊ आल्याचा निरोप स्वीय सहाय्यकाने दिला, "त्यांना आंत पाठवा...." म्हणेपर्यंत वासुभाऊ दरवाज्यात उभे असलेले त्यांनी पाहिले."मी कच्ची यादी आणली आहे भाऊ, जरा नजरे खालून घालावी." ते आल्या आल्या म्हणाले."बरं झालं; मी तुम्हाला आजच कच्ची यादी तयार करायला मदत करा म्हणून सांगणार होतो." भाऊ हसतं हसतं बोलले.पहिली चार नावे तालुक्यांतल्या महिला राखीव उमेदवारांची होती.चारही जागांवर संतोषभाऊंच्या मनांतलेच उमेदवार होते...सुरेखाताईंचे नांव पक्षाने पक्के केले होते.......

तेजस्विनी-८

"अहो झेडपी मेंबर, अर्धा कप चहा मिळेल का ?" राजाभाऊंनी सुरेखाताईंना म्हटले.राजाभाऊंची रविवारच्या सकाळी आळसांत सुरू असलेली सगळी कामे व मध्येच सोडलेले चहाचे फर्मान त्यांना नवीन नव्हते.नवीन होते ते त्यांनी दिलेले संबोधन....लटक्या रागाने वर्तमान पत्रातून डोके काढून त्यांनी मानेला झटका दिला व म्हणाल्या,"झेडपी मेंबरची स्वयंपाकीण बाई आज रजेवर आहे, चहाचा भत्ता रोखीत घेऊन बाहेरूनच चहा प्यावा आज राजेसाहेबांनी."वैशाली अजून झोपलेलीच होती. आजींची अंघोळ आटपून देवपूजेची तयारी सुरू होती. त्यांची देवपूजा आटोपताच भिजत ठेवलेले पोहे फोडणीला टाकायचे होते. तोवर पटकन आपण अंघोळ करून घ्यायच्या विचारांत असतानाच राजाभाऊंचे फर्मान सुटले होते. आता अजून पंधरा मिनिटांची खोटं ह्या विचारांत असतानाच राजाभाऊ उठून उभे होत म्हणाले,"मग असंच करावं म्हणतो.... " "हो, तेव्हढीच एखादी सिगारेट फुंकायला मिळेल ते सांगा की" त्या परत लटक्या रागाने म्हणाल्या.अधून मधून लहर आली की राजाभाऊ धूम्रपान करीत ते आता सुरेखाताईंच्या चांगले सवयीचे झालेले होते. त्यांच्याकडे मिश्कीलपणे तिरपा कटाक्ष टाकत राजाभाऊंनी पायांत चपला सरकवल्या व घातलेल्या बुशकोटाची बटणे लावत लावत बाहेर पडायची तयारी केली. सुरेखा ताई वळून स्वयंपाक घरापर्यंत पोहचल्या नसतील एव्हढ्यात राजाभाऊंचा " अरे... तू इकडे कुठे ?" असा आवाज आला म्हणून त्या मागे वळल्या. बघतात तर अंगणात प्रियांक मोटरसायकल स्टॅंडवर लावण्याच्या तयारीत होता."बाबांनी आज मीटिंग लावलीय दुपारी, तुम्हा दोघांना बोलवलंय ३ वाजता" लावलेली बाइक स्टॅंडवरून काढत तो बोलला.एक क्षण काय उत्तर द्यावे हे न सुचल्याने त्या तश्याच उभ्या होत्या. "हो, नक्की येऊ म्हणून सांग...." पाठमोऱ्या राजाभाऊंचे शब्द त्यांनी ऐकले.'चला, रविवार सार्थकी लागला' असा मनातल्या मनात विचार करत त्या पटकन न्हाणीघरात शिरल्या.
"मी राहतो घरी, तू जाऊन ये मीटिंगला" राजाभाऊ पोहे खात म्हणाले."अहो, काहीतरीच काय ? मी एकटी कशी जाऊ?" सुरेखाताईंची खरंतर रविवारी घराबाहेर पडायची इच्छा नव्हती."मला जरा आराम करायचा आहे, मी वैशाली बरोबर राहीन तू जाऊन ये " परत राजाभाऊ बोलले.सकाळी सकाळी वाद नको म्हणून त्या तात्पुरत्या गप्प बसल्या. दुपारी जेवण झाल्यावर बोलू असा त्यांनी विचार केला.
जेवणे आटोपल्यावर आळसावल्या शरीराने दोघेही पडले होते. हळूच सुरेखाताईंनी मीटिंगला जाण्याचा विषय काढला...."सुरेखा, अगं तुझे जाणे महत्त्वाचे आहे. मी कॉलेजची कामे आहेत म्हणून येऊ शकत नसल्याचे तू कळव" राजाभाऊ बोलले."पण मी एकटी काय करू जाऊन ?" "आता प्रचारासाठी, बैठकांसाठी व इतर कामांसाठी तुला एकटीलाच फिरावे लागणार" ते म्हणाले."बापरे; कसं जमेल मला हे ? वैशुला सोडून कसं जाता येईल ? आईंना काय वाटेल ?" त्यांनी भरभर सगळे प्रश्न एकदम विचारले."आईची काळजीच नको करूस, मी तिला आज नीट समजावून सांगीन, जोवर जमतंय तोवर वैशुचं आपण तिघं मिळून करू नाहीतर एखादी बाई बघू कामाला" ते विचार पूर्वक बोलत होते."मीही बऱ्याच दिवसांपासून विचार करतेय एखादी बाई वैशुला सांभाळायला ठेवावी, आईंकडून धावपळ होत नाही आताशा" त्या बोलल्या.शेवटी सुरेखाताईंनी एकटे जायचे असे नक्की होईस्तोवर राजाभाऊंचा स्वर जडावला होता. कोपऱ्यांत भातुकलीचा खेळ मांडून आदळ-आपट करणाऱ्या वैशुचाही त्यांना त्रास जाणवत नव्हता. थोड्याच वेळांत ते चक्क घोरायला लागले.....
साडी बदलत असताना वैशुची भुणभूण चालू होती. "आई मी पन येते मीतींगला" असं लाड लाड म्हणत ती साडी खेचत होती. एकुलत्या एका सुटीच्या दिवशी तिला सोडून जायचं त्यांच्या जीवावर येत होत. अखेरीस 'मी पटकन येते' असं तिला कसंबस समजावून त्या बाहेर पडल्या तेव्हा वैशु आजीच्या मांडीवर बसून पुस्तकातली चित्रे बघत होती.शक्य झाल्यास ही निवडणूक लढवायचीच नाही ह्या विचारांसोबत त्यांनी घर सोडले.*********************आजची तेव्हढी एकच गोष्ट सुरेखाताईंच्या मनासारखी होणार नव्हती.....वासुभाऊ व संतोषभाऊंनी तालुक्यातून जिल्हा पंचायतीची निवडणूक लढवण्यासाठी त्यांची जागा निश्चित झाल्याचे सांगितले तेव्हा नाही म्हणायचे त्यांना सुचलेच नाही. कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होत होता तेव्हा मोहरून जाताना कुठेतरी एक काळजी त्यांच्या मनाच्या कोपऱ्यांत दडलेली होती.वासुभाऊ व विचारे साहेबांबरोबर सुरेखा ताईंचे 'तिकीट' पक्के झाले होते. अट्रावलातून अर्थातच भराडे बाई, तर निर्मला चौधरी व माळी वहिनी ह्या दोघी तालुक्यातल्या इतर राखीव जागांवर निश्चित करण्यात आल्या. शेळके मास्तर व फिरके ह्यांच्यावर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची जबाबदारी टाकण्यात आलेली होती. त्यांच्या सह अजून ४ जणांना तिकीट वाटप केली गेली. दोघा अपक्षांना पाठिंबा द्यायचे ठरले तर ५ जागांवरील निर्णय नंतर घेण्यात येणार होता. कोणालाच कुठल्याही जागेबद्दल तक्रार नव्हती. नव नवीन सहकारी, त्यांच्या गावांची नावे, त्यांची नावे त्या पटापट आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत होत्या. शाळेत शिक्षिकेला मुलांची नावे लक्षांत ठेवण्याचा अनुभव येथे कामी आला. निवडणुकांना दीड महिना बाकी होता.
संतोषभाऊ, देसाई, विचारे साहेब व वासूभाऊ आजच रात्रीच्या गाडीने मुंबईला जाणार होते. भारतीय जनमोर्च्याशी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत युती झाल्यास बघावी असा पक्षाचा विचार होता. 'जनजागृती' व 'भा.ज.मो' ह्या दोन्ही पक्षांची विचारसरणी साधारण मिळती जुळती होती. राष्ट्रीय व राज्य पातळीवर भा.ज.मो. चे कार्य गेल्या २५ वर्षांपासून सुरू होते. मुख्य म्हणजे त्यांचाही सामना 'विकास आघाडी' शी होता. भा.ज.मो.च्या पक्षश्रेष्ठींकडून संतोषभाऊंना आजच आमंत्रण आलेले होते. ही संधी दवडायची नाही असे ठरवत पक्षाचे धुरंधर उद्याच तेथे जाऊन थडकणार होते. तालुका व राज्य पातळीवर यावलच्या जागा जनजागृतीने लढवायच्या व राष्ट्रीय पातळीवर भा.ज.मो. ला समर्थन द्यायचे असा संतोषभाऊंचा विचार होता. कदाचित काही जागा मित्रपक्षाला द्याव्या लागणार होत्या. झेड.पी. च्या जागा न देता ग्रामपंचायतीच्या जागा वेळ पडल्यास द्याव्या ह्यावर सर्वांचे एकमत झाले. म्हणूनच ५ ग्रामपंचायतीच्या जागा रिकाम्या ठेवल्या गेल्या. संतोषभाऊंच्या मनासारखे घडल्यास तालुक्यातल्या विधानसभेच्या जागेवर निवडून येण्यास नानासाहेब पाटलांना बरेच परिश्रम घ्यावे लागले असते.
'आता प्रचाराला लागा' असा आदेश घेत व पुढचे मनसुबे आखत एक एक कार्यकर्ता दुधमहासंघाचे कार्यालय सोडत होता तेव्हा जीच्याबरोबर आपली लढत आहे ती मोहिनी इंगळे कशी असावी ह्याचाच सुरेखाताई अंदाज बांधत होत्या.*******************मोहिनी इंगळे ची बदली करवून घेण्यात अखेर सुनील पाटलाला यश आलेच. नानासाहेब पाटलांचे तालुक्यातल्या तहसीलदार कचेरी सह जिल्ह्याच्या प्रत्येक सरकारी कचेरीत जबरदस्त वर्चस्व असल्याचे हे एक द्योतक होते. त्यांनीच नव्हे तर त्यांच्या दिवट्या चिरंजीवांनीही मनांत आणलेली सर्व कामे चुटकीसरशी पार पडत होती.ह्या एका महासत्तेविरुद्ध लढा द्यायचा होता तो संतोषभाऊंना आपल्या नवख्या शिपुरड्यांसह.फक्त माणसाशी असलेले माणसाचे नाते हेच काय ते त्यांचे ह्या निवडणुकीतले भांडवल होते.मोहिनी इंगळेचे जोरदार स्वागत शाळेत केले गेले त्या दिवशी वैशुला ताप आलेला असल्याकारणाने सुरेखाताई शाळेत गैरहजर होत्या.अनवधानाने एक वेगळाच संदेह त्यांच्या सहकार्यांना वाटू लागला.
"नमस्कार सुरेखा ताई" अनोळखी स्त्रीच्या आवाजाने पुस्तकातून डोकं वर काढून सुरेखाताईंनी बघितले तर एक नीटनेटकी बाई त्यांच्या समोर सुहास्यवदनाने उभी होती.'कोणाची बरं आई असावी ही' असा ठेवणीतला शिक्षकी विचार करत असतानाच "मी मोहिनी, मोहिनी इंगळे" हे वाक्य तीच्या मंजूळ स्वरांतून उमटले."नमस्कार.... नमस्कार...." असं तोंडातल्या तोंडात पुटपुटताना स्वत:चा स्वर इतका कोरडा कसा ह्याचेच त्यांना आश्चर्य वाटू लागले.स्टाफ रूम मधले सगळे जण हातातली कामे सोडून दोघींकडे बघू लागली...."बसू का तुमच्या सोबत दोन मिनिटे ?" तिने पुढे विचारले तश्या त्या वरमून बोलल्या "अरे सॉरी हं, मीच तुला बस म्हणून सांगायला हवे"ती बसत असतानाच त्या परत अपराधीपणाने बोलल्या, "माफ करा, मी तुम्हाला अग तूग केलं"."त्यात काय मोठं ? आहेच मी तुमच्याहून वयाने लहान, तुमचा हक्कच आहे तो" ती पटकन बोलली.".......""मी तुम्हाला एक खास विनंती करायला आलेय ताई" सुरेखा ताईंकडे ती रोखून बघत बोलली."हम्म बोल ना" आता त्यांच्या स्वरांतला तो कोरडेपणा कमी झालेला होता."आपण दोघी येथे शिक्षिका व बाहेर प्रतिस्पर्धी म्हणून वावरूया का ? म्हणजे मला म्हणायचे होते.... आपल्या निवडणुकांचा विषय बाहेरच ठेवून आपले इथले संबंध आपण सांभाळायचे का ?" ती जरा चाचरत बोलली."हो...आनंदाने, खरं तर मला आशाच नव्हती तुझ्याकडून ह्या प्रस्तावाची, म्हणून माझा प्रतिसाद सुरुवातीला अगदी थंड होता." सुरेखा ताई उत्साहाने म्हणाल्या."मी पण जरा घाबरतच होते, मला वाटलं होतं, सुरेखाताई म्हणजे........""एखादी जाडजूड, पोक्त, चष्मा लावणारी, दोन वेण्या घालणारी खडूस बाई असेल !" हसत हसत सुरेखाताईंनी तिचे वाक्य पूर्ण केले तेव्हा सगळे जण हास्यात बुडले.
दोघींच्यातला तणाव त्या हास्यकल्लोळाने दूर झाला.... एक चांगली सहकारीण मिळाल्याचा आनंद स्टाफ मधल्या प्रत्येकाच्या तोंडावरून दिसत होता.
***************************

तेजस्विनी-९

"दाजी औंदाच्या झेडपी मेंबरच्या इलेक्शनची ह्यो यादी तयार हाय" सुहास पाटलाने नानासाहेबांना सांगितले."सुनिलरावांना दावली का?" नानासाहेब न बघताच बोलले. "त्यांन्सी काय दावायची ?" सुहास चाचरत बोलला.मग मोठ्या पाटलांना वर्तमान पत्रातून डोकं वर काढावंच लागलं. "का दावायची म्हंजी ? निवडणूकीला सुनिलराव उभं राहणार, आन उमेदवारांची यादी त्यांनी न्हाय बगायची तर कुणी बगायची""तसं न्हाय दाजी, नेमीचेच तर उमेदवार हाईत त्यात बगायच काय असं म्या म्हनत हुतो" सुहास सारवासारव करायला लागला."तुमची यादी माज्या जवळ दिऊन ठेवा. मी पाहतो काय करायच त्ये." अखेरीस ते बोलले. सुहासला तिकडून निघून जाण्याचा तो संदेश होता."आता जे झालं त्यावर गपगुमान इचार करा सुहासराव, घिसडघाई करून कामं नका करत जाऊ, अखेरच निक्सून सांगतोय" मोठ्या पाटलांनी त्याला बजावले. "मोठ्या दिलानं सुनिलरावांची साथ संगत करा, ही निवडणूक जिंकून दावा मग मी समदं ठीक करतो" नानासाहेब बोलले.सुहासने मान हालवत जेमतेम होकार दिला तेव्हा त्याच्या डोळ्यांत अपराधीपणाची भावना नानासाहेबांना जाणवली."सुहासराव असे कमजोर नका पडू, मी सांगतो तुमच्या भल्यासाठी; त्यावर वाईट वाटून घेण्याऐवजी अंमल केलात तर जग जिंकाल...." नानासाहेबांनी त्याला धीर दिला. " ....तुमच्या माणसांपैकी कुनाला सदस्य बनवायच कबूल केलं हाय का तुमी?""व्हय दाजी, रावेरचे माझे साडू यंदा मागे लागलेत" त्याने हळूच सांगितले."इतकंच असेल तर त्ये काम माज्यावर सोपवा, बाकी यादी सुनिलरावांना बनवू द्या" नानासाहेब घरातही राजकारणाचे डाव व्यवस्थित खेळत. 'धाकटा सुनील मला एक दिवस बाजारात विकून येईल. मोठा सुहास फाड आहे पण मनाचा सरळ आहे' हे त्यांचे लाडके मत होते.सुनीलला बोलावले असल्याचा निरोप सांगून ते परत वाचनांत गढले. सुनील आल्यावर त्याला फक्त 'उमेदवारांची यादी तयार करून मला दुपारच्याला आणून द्या' असा हुकूम देऊन ते बैठकीवरून उठत दिवसभराच्या इतर कामांना लागले.******
संतोषभाऊ सहकार्यांबरोबर मुंबईहून परतले ते आंबट गोड बातम्या घेऊनच. तालुक्यातल्या काही जागा भा.ज.मो. ला द्याव्या लागणार होत्या तर संतोषभाऊंना विधानसभेसाठी भा.ज.मो.चे समर्थन व शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचे साहाय्य मिळणार होते. ज्या जागांवर 'जनजागृती'चे उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी तेथल्या जागा संतोषभाऊंनी भा.ज.मो. ला देऊ केल्या होत्या. पण फिरकेंची, शेळके मास्तरांची व रावेरची प्रतिष्ठेच्या लढतीची जागा हातातून गेली होती. शेळके मास्तरांची समजूत काढता काढता वासुभाऊंना नाकी नऊ आले होते.
आज पंचायतीच्या निवडणुकांच्या अर्जांवर सह्या व अनुमोदनाचा कार्यक्रम पार पडणार होता. सगळे जण दूध महासंघाच्या कार्यालयांत पोहचले तेव्हा साडे दहा वाजत आलेले होते. सुरेखा ताईंना आज रजा टाकावी लागलेलीच होती. संतोषभाऊ, वासूभाऊंसह शेकडो कार्यकर्ते वाजत गाजत मिरवणुकीने तहसीलदार कार्यालयांत पोहचले. देसाई साहेबांनी त्यापूर्वीच तेथे जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांकडून वेळ ठरवून घेतलेली होती.मिरवणूक तहसीलदार कार्यालयांत पोहचताच सुरेखाताईंना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. राजाभाऊ जातीने तेथे हजर होते. सकाळी घाईघाईत 'बेस्ट लक' इतकंच म्हणून बाहेर पडलेले राजाभाऊ आपण अर्ज भरताना आपल्या सोबत असावेत असे सुरेखा ताईंना मनापासून वाटत होते. पण कॉलेजातली लेक्चर्स सोडून ते इतर कुठलेही कामे त्यावेळेत करणार नाहीत ह्याची खात्री असल्याने उगीच अपशकून नको म्हणून त्या बोलल्या नाहीत.महिलांचे अर्ज सर्व प्रथम देण्यात आले. तालुक्यातली महिला उमेदवार म्हणून सुरेखाताईंचा अर्ज सर्वप्रथम पुढे करण्यात आला तेव्हा "मनुदेवी मात की जय" हा तालुक्यातल्या ग्रामदैवतेच गजर कार्यकर्त्यांनी केला.मनातल्या मनांत विघ्नहर्त्या गणेशाचे नांव घेत व अर्जावर सही करीत सुरेखा ताईंनी आपल्या राजकीय जीवनाचा शुभारंभ केला.सगळ्यांचे अर्ज भरून झाल्यावर मनुदेवीच्या डोंगरावरील मंदिरात वासुभाऊंच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. मनुदेवीचा आशीर्वाद घेऊन आजपासूनच प्रचाराची सुरुवात व जंगी सभेचे आयोजन करण्यात आलेले होते.
सायंकाळची प्रचाराची जंगी सभा बाजार वार्डातल्या मोठ्या चौकात भरणार होती. कधी प्रजासक्ताक दिनाच्या भाषणालाही हजेरी न लावलेली सुरेखा नावाची शालीन सुशिक्षित तरुणी, एका कन्येची माता, सुविद्य प्राध्यापकाची सुविद्य पत्नी, घरातल्या वरिष्ठांची आज्ञाधारक स्नुषा... मुलगी आज राजकीय व्यासपीठावर पक्षाच्या व स्वत:च्या प्रचारासाठी एका खुर्चीत अंग चोरून बसली होती.देसाई साहेबांच्या प्रस्तावने नंतर लगेच संतोषभाऊंनी भाषणाला सुरुवात केली. यावल तालुक्यातल्या आजवरच्या समस्या व विरोधकांनी केलेली जनतेची फसवणूक ह्यावर त्यांनी जोरदार भाषण केले. टाळ्यांच्या गजरात ते खाली बसले तोवर ते नेमके काय काय बोलले हे आठवण्याच्या मन:स्थितीतही सुरेखाताई नव्हत्या.मान्यवर व वयोवृद्ध वासुभाऊंचे भाषण नेहमीच श्रोत्यांना भावे. तालुक्यातच लहानाचे मोठे झालेले वासुभाऊ अविवाहित होते. अनाथालयातून वाढलेल्या वासुभाऊंना 'खडकू' भाऊ म्हणूनही ओळखत. एक एक पैशाचे, ज्याला गावात खडकू म्हणतं, दान घेत त्यांनी गावाच्या विकासासाठी व खास करून शाळेसाठी निधी उभारला होता. दिवसांतून फक्त एक वेळा जेवण्याचा आजन्म संकल्प त्यांनी अनाथालयात असतानाच घेतला होता. त्यांच्या भाषणांतून गरीब व पिचलेल्या लोकांसाठीची त्यांची तळमळ दिसून आली. त्यांनी वर्णन केलेल्या प्रसंगांनी सुरेखाताईच नव्हे तर बऱ्याच उपस्थितांच्या डोळ्यांच्या पापण्या ओलावल्या.भराडे बाईंचे भाषण आवेशपूर्ण होते परंतू त्याचा सर्व भर नानासाहेब पाटील व त्यांची मुले ह्यावर दिलेला होता. स्वत:च्या भाषणातून पाटलांचा करता येईल तितका पाणउतारा त्यांनी करून घेतला. झोपडपट्टी वासीयांची ही कैवारीण त्यांचे प्रश्न मांडत असताना स्वत:ला मिळणारा प्रतिसाद बघून अजून चेतावत होती. मोठ्या आवेशात तिचे भाषण संपले.हळूहळू ज्येष्ठ कार्यकर्त्यांची भाषणे संपताच, नांव पुकारले गेले सुरेखाताईंचे.गांवातली भोळी जनता समोर बसलेली होती.... कोणी दगडावर, कोणी वाड्याच्या भिंतीवर तर कोणी गच्चीच्या कठड्यावर.... महिला वर्ग कुणाच्या ओट्यावर बसला होता तर कोणाच्या दरवाज्यातल्या उंबरठ्यावर..... कुठल्या तरी दरवाज्याआडून एखादा शालीन पदर डोकावून बघत होता तर कुठे कोणी आई आपल्या रडणाऱ्या पोराला गप्प बसण्यास सांगत होती. सगळेच जण कुतूहलाने आज ही मास्तरीण बाई काय बोलणार हे ऐकायला जीवाचे कान करून बसले होते.सुरेखाताईंना दरदरून घाम फुटला. शाळेत मुलांना शिकवणे व व्यासपीठावरून भाषण देणे ह्यातला फरक आज त्यांना कळला. पदराने कपाळावरचे घर्मबींदू टिपत व उसने आणलेले धैर्य दाखवत त्या माइक समोर जाऊन उभ्या राहिल्या. उंचाड्या विचारे साहेबांचे भाषण नेमके त्यांच्या आधीच झालेले होते म्हणून माइकची उंची व सुरेखाताईंची उंची मेळ खात नव्हती. हे लक्षात येताच माइक वाल्या पोऱ्याने विविध आवाज काढत माइक त्यांना साजेसा केला. तोवर निःशब्द शांतता सर्वदूर पसरलेली होती.
"व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर........" पाच ते सात मिनिटांत त्यांनी आपले भाषण संपवले तेव्हा आपली कानशिले गरम झाल्याचा भास त्यांना होत होता. मर्यादित टाळ्या वाजल्या पण बऱ्याच कौतुकांच्या नजरा त्यांच्यावर रोखल्या गेल्या असल्याचे त्यांना जाणवले.
"आज माझं भाषण कसं झालं हो ?" रात्री बिछान्यावर पडल्या पडल्या त्यांनी राजाभाऊंना विचारले."छान झालं, काळजी करण्याचे कारणच नाही." आश्वस्तपणे राजाभाऊ बोलले."मी भाषणांत काय काय बोलली हो ?" सुरेखाताईंनी त्यांना पुढे विचारले.त्यांच्या ह्या वाक्यावर डोळ्यांतून पाणी येईपर्यंत राजाभाऊ खळखळून हसत होते....बाबा हसताहेत म्हणून वैशुही आनंदाने टाळ्या पिटत नाचून हसू लागली.....सुरेखाताईंना आपल्याच लोकांसमोर मेल्याहून मेल्यासारखे झाले !********************************************************भाषणाबाबत शाळेत सहकार्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत होत्या."छान भाषण केलंस हो पोरी..... आता ह्यापुढे थोडी तयारी करून व्यासपीठावर जात जा. राजाभाऊंकडून मुद्दे लिहून घ्यायचे - पण पूर्ण भाषण स्वत: तयार करायचे" थोडक्यातच वैद्यबुवांनी स्वत:ची प्रतिक्रिया दिली. तेव्हा मोहिनीची प्रतिक्रिया काय मिळेल ह्या विचारांतच सुरेखा ताई होत्या.मोहिनी हेडमास्तरांच्या खोलीतच डेरा घालून बसलेली असे. वर्गात फळ्यावर मुलांना "हे वहीत उतरवून घ्या' असं सांगून ती हेडमास्तरांच्या खोलीत जाऊन बसे. मधल्या सुटीत मोहिनीशी भेट झाली."मला तर बाई ह्या राजकीय भाषणांचा कंटाळाच येतो. माझ्या ऐवजी पक्षातले कोणीतरी भाषण ठोकेलच की व्यासपीठावर...." इतकीच प्रतिक्रिया तिची होती.शाळेत राजकारणावर बोलायचे नाही असा सगळ्यांचा पण पहिल्या दिवशीच तुटला. आपल्यातलीच दोघींपैकी एक सहकारीण झेडपी सदस्य होणार म्हटल्यावर असले संकल्प तडीस नेणे शाळेतल्या शिक्षकांनाही कठीण जाणार होते.*****************प्रचाराला हळूहळू जोर चढत चालला होता. भिंती रंगवणे, पोस्टर्स लावणे, पत्रके वाटणे ही कामे तरुण कार्यकर्ते जोमाने करीत होती. प्रियाला सोबत घेत सुरेखा ताईंच्या नाक्यानाक्यावर छोट्या बैठका होत होत्या. स्त्रियांना घरात आतवर जाऊन सुरेखा ताई भेटून येत होत्या. 'दादा, वहिनी, ताई, भाऊ, अक्का, माई, नाना, दाजी असली सगळी विशेषणे चपखलपणे वापरता येऊ लागलेली होती. बोलण्यातली सफाई वाढत होती. शब्दांना धार येत होती. राजाभाऊंनी लिहून दिलेले मुद्दे त्या विस्तृत करीत चांगले भाषण देऊ लागल्या होत्या. महिलांच्या प्रश्नांवर हिरीरीने बोलत होत्या.
यावलला लागून असलेल्या भुसावळ तालुक्यात भा.ज.मो.च्या जास्त जागा होत्या. जनजागृतीने फक्त एक दोघा अपक्ष उमेदवारांना समर्थन जाहीर केले होते पण त्यांचे स्वत:चे उमेदवार उभे केलेले नव्हते. भुसावळ तालुक्यातल्या भा.ज.मो.च्या उमेदवारांना उत्साह व समर्थन मिळावे म्हणून संतोषभाऊ तेथल्या सभांना नियमित जाऊ लागले.इथल्या सभा कधी वासूभाऊ, विचारे साहेब, तर कधी शेळके मास्तर, भराडे बाईंबरोबर गाजत होत्या. भराडे बाईंच्या अट्रावलातल्या दोन्ही सभांना जोरदार प्रतिसाद मिळालेला होता, ह्यापुढे अट्रावलात सभा घ्यायची आवश्यकत: त्यांना पडणारच नव्हती. त्यांची जागा ह्या निवडणूकीत नक्की झाल्यातच जमा होती. निर्मला ताई व माळी वहिनींनाही चांगलाच प्रतिसाद मिळत होता. ह्यापूर्वी असलेली राजकीय पार्श्वभुमी त्यांना मदतीची ठरत होती. गांवात प्रचार सभांच्या हजेरीवरून अटकळी बांधल्या जात होत्या. सुरेखा ताईंच्या जागेबद्दल मात्र कोणीच काही बोलायला तयार नव्हते.*****************************

तेजस्विनी-१०

मोहिनी इंगळेला बघायला खूप गर्दी जमायची. मोहिनीचे भाषण म्हणजे 'ह्याला मत द्या, त्याला मत द्या व बरोबरीने मलाही मत द्या' इतकेच असे. पण तरी खाली बसल्यावर तिला मिळणाऱ्या टाळ्या बरेच काही सांगून जात होत्या. निवडणुका दहा दिवसांवर येऊन ठेपल्या. प्रचाराला जास्त वेळ मिळावा म्हणून राजाभाऊ व सुरेखा वहिनींनी रजा टाकलेली होती. संतोषभाऊंनी घेतलेल्या एका बैठकीत उद्यापासूनच आसपासच्या खेड्यांवरच्या प्रचारावर भर देण्यात येणार असल्याचे घोषित केले. संतोषभाऊ, देसाई साहेब, राजाभाऊ अशी निवडणुका न लढवणारी एक फौज भाजमोच्या कार्यकर्त्यांच्या सोबत त्यांच्या उमेदवारांच्या जाहीर सभांना व प्रचाराच्या कार्याला जुंपली गेली तर जनजागृतीचे खंदे कार्यकर्ते व निवडणुका लढवत असलेले उमेदवार एकत्र प्रचाराला निघत.कधी त्यांची गाठ 'विकास आघाडी' च्या कार्यकर्त्यांशी समोरासमोर होई. ओळखीचा गट असल्यास हस्तालोंदनापासून ते गळाभेटी पर्यंत सर्व उपचार हसत हसत पार पडत. कधी हळूच एकमेकांना शाब्दिक चिमटे काढत वातावरण खेळीमेळीचे ठेवले जाई..... तर कधी अनोळखी कार्यकर्ते समोर दिसल्यास जोरदार घोषणा युद्ध होई. एकमेकांच्या नेत्यांचा जाहीर उद्धार केला जाई, 'अमक्याच्या बैलाला ढोल... वगैरे शाब्दिक चकमकीही झडत. हे सगळे वातावरण सुरेखाताईंना नवखे होते. पण त्या आता ह्या वातावरणात चांगल्याच रुळल्या होत्या.ओरडून ओरडून व सतत बोलून घसा दुखे, मग दिवसांतून आठ दहा वेळा गरम पाण्याने गुळण्या करून घसा शेकावा लागे.
खेड्यातल्या प्रचार सभांसाठी दोन जीपड्या व १४/१५ कार्यकर्त्यांसोबत त्यांना जावे लागे. खडक्यातल्या प्रचारसभेसोबत माहेजी, वरणगांव, मुक्ताईनगर वगैरे गावांतला प्रचार एक दिवस ठरला. नेहमीप्रमाणे जीपमध्ये पुढे त्या व अजून दोन महिला कार्यकर्त्या तर मागे तरुणांचा तांडा व दुसऱ्या गाडीत इतर काही पोरांबरोबर आज प्रियांकही आलेला दिसला. त्याला ओळखीचे एक स्मितहास्य देत त्या गाडीत बसल्या. ह्या मतदारसंघांत वासूभाऊंनी बरेच कार्य केले होते. त्यांना प्रचारसभेला न नेता त्यांच्या वयाचा मान ठेवण्याची गळ मतदारांना घालायची ठरले. प्रथमच सुरेखाताईंनी भाषणांचा सर्व भार स्वत:वर उचललेला होता. दोन चारशे जणांच्या धनगरवस्त्यांपासून वरणगांवातल्या बसस्टॅंड समोरच्या जंगी सभांतून त्यांनी दणदणीत भाषणे केली.महिलांच्या समस्या, शेतकरी महिलांचे प्रश्न, त्यांच्यावर होणारे अत्याचार, दारूबंदी इत्यादी प्रत्येक घरगुती समस्यांवर सुरेखाताई आवर्जून बोलत. "ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत येथले स्थानिक प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत तेव्हा त्यावरच जास्त भर दे, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय महिला समस्यांवर बोलू नकोस कारण त्यात येथल्या बायकांना काहीही रस नाही" हा राजाभाऊंचा इशारा त्यांनी बरोबर अमलांत आणलेला होता. त्यामुळे जेव्हा भाषण संपल्यावर त्या बायकांशी थेट भेटून संवाद साधत तेव्हा त्यांच्या भाषणाची पावती त्यांना लगेच मिळे.खेड्याखेड्यांतून सुरेखाताईंना चांगला प्रतिसाद मिळत होता. पुरूष वर्गही त्यांच्या भाषणाची खिल्ली न उडवता, मास्तरीण बाईचे भाषण मन लावून ऐकत. भराडे बाईंइतक्या टाळ्या मिळत नसल्या तरी मोहिनी सारख्या शिट्ट्याही पडत नव्हत्या. एक शोभेची किंवा बोलभांड बाई कशी असते ते बघण्याऐवजी मास्तरीण बाई काय बोलणार हे ऐकायला गाव~खेड्यातली लोकं गर्दी करीत होती.
मुक्ताईनगरची त्या दिवसातली शेवटची प्रचारसभा संपली तेव्हा रात्रीचे आठ वाजत आलेले होते. स्थानिक महिलांसोबत फिरत त्यांनी घराघरांतून थोडा प्रचारही करून घेतला. सोबत आलेला भाजमोच्या तरुणांच्या तांड्याने बसवलेले वगनाट्य व्यासपीठावर सुरू होते. नानासाहेब पाटलांचे व त्यांच्या दिवट्या चिरंजीवाचे अत्याचार हा वगनाट्यातला छुपा विषय होता. वगनाट्याला पडत असलेल्या लोकांच्या टाळ्या व शिट्ट्यांची आता चांगलीच सवय झालेली होती. दोन चार तरुण पोरांबरोबर प्रियांकही घरोघरी प्रचार करण्यासाठी सोबत घुटमळत होता. वगनाट्य संपले तेव्हा रात्रीचे साडे नऊ वाजलेले होते. तिथल्याच एका कार्यकर्त्याच्या घरी झुणका भाकरीच्या साध्या जेवणाचा कार्यक्रम आटोपला व तांडा घरी परतण्यासाठी निघाला.मध्येच ऍक्सल का काय तुटला म्हणून सुरेखा ताईंचं जीपडं बंद पडले. मनातल्या मनात त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. शेवटी दुसऱ्या जीपड्यांत बायका व मावतील तितकी मंडळी कोंबून बसवून न्यायच ठरलं. पाच सहा जण मागेच राहिली. परतीच्या प्रवासांत थकलेल्या सुरेखाताईंना झोपेची ग्लानी चढत होती. रस्त्यातल्या खड्ड्यांतून बसणारे आचके डोकं वर आपटवत होते. आधारासाठी जेमतेम समोरचा दांडा धरून त्या बसल्या होत्या. उजवीकडे शेजारी बसलेल्या दोघी बायका प्रत्येक खड्ड्यागणिक अंगावर आदळत होत्या. डावीकडे बसलेला प्रियांक जवळपास जीपच्या बाहेरच लोंबकळत होता. आधारासाठी त्याने मागच्या सीटवर ठेवलेला हात सारखा सुरेखाताईंच्या खांद्यावर घसरत होता म्हणून त्या थोड्या पुढे सरकल्या, इतक्याश्या जागेतही थोडी जागा बनवून प्रियांक मध्ये सरकल्याचे त्यांना जाणवले.त्यानंतर जे घडतं गेले तो प्रकारच त्यांच्यासाठी भयावह होता. प्रियांकने आधारासाठी ठेवलेला मागचा हात सरळ उजव्या खाकेत सरकवून त्यांना स्वत:कडे ओढायला सुरुवात केली. एक दोन वेळा तोंडाने 'चक्क' असा आवाज करीत त्या थोड्या मध्ये सरकल्या पण त्यामुळे प्रियांकसाठी सरकायला अजूनच जागा तयार झाली. शेवटी 'प्रियांक, नीट बस' अस सांगूनही तो बधेना. त्याच्या मनातले घाणेरडे विचार त्याच्या अंगलटीला येणाऱ्या कृतीतून स्पष्ट कळत होते. नशिबाने घर आले व सुरेखाताईंनी सुटकेचा निःश्वास सोडला. मागे वळूनही न पाहता तरतर त्या घराकडे चालू लागल्या.त्यांच्या अंगातल्या घामाच्या धारा व डोळ्यांतला संताप बघून राजाभाऊही क्षणभर अवाक झाले."काय झाले गं ?" ह्या त्यांच्या प्रश्नाला "अंघोळ करून येते, मग सांगते." इतकेच उत्तर देत त्या सरळ न्हाणीघरांत शिरल्या.
उजवी खाक खसखसून घासली तरी प्रियांकने तेथे केलेला तो घाणेरडा स्पर्श त्यांना अजूनही जाणवत होता.*****************************सुहास पाटलांच्या मनाजोगती एकुलती एक रावेरची जागा त्यांच्या साडूला मिळाली. त्या जागेवरून नानासाहेबांच्या समोरच दोघा भावांत चांगलीच जुंपली. रावेरला विरोधी पक्षातर्फे भाजमो चा नवीन उमेदवार होता. ह्या रणधुमाळीतली विकास आघाडीची तीच जागा 'सेफ सीट' मानली जात होती. जनजागृती व भाजमो ची युती झाल्यानंतर भाजमो च्या वाट्याला आलेल्या रावेरच्या ह्या जागेवरून सुहास पाटलांचा साडू राजू यावलकर उभा होता त्याला सरळ लढत होती ती भाजमोच्या कॉलेज कुमार नवख्या अजय फालकची.तालुक्यातल्या बाकी सर्व जागांवर सुनीलच्या माणसांना अपार कष्ट घ्यावे लागणार होते. नानासाहेब पाटील जातीने स्वत: प्रचारात उतरले होते. तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीतल्या समर्थकांना पूर्ण प्रदेश पिंजून काढण्याची सक्त ताकीद देण्यात येत होती. कुठेही विरोधकांनी डोके वर काढू नये म्हणून सर्व प्रकारची यंत्रणा नानासाहेबांनी कामाला जुंपलेली होती. राजेंद्र गाजरेनेही स्वत:ची कुमक सुनीलसाठी कामाला लावलेली होती. मतदारसंघातल्या ३ व तालुक्याशी जोडलेल्या पंचायतीच्या ८ अशा ११ जागांसाठी विकास आघाडीने स्वत:ची असलेली नसलेली सर्व प्रतिष्ठा पणाला लावून लढत देण्याच्या तयारी केली होती.विचारेसाहेबां समोर सुनीलची सरळ लढत होती. फेगडेंची लढत वासूभाऊंशी होती तर मोहिनी इंगळे समोर पाटलांची मावसं सून सुरेखा जाधव उभी होती. अट्रावलची जागा नानासाहेबांच्या हातून गेल्यातच जमा होती. तर निंभोरा, सावदा येथे मिळालेल्या उमेदवार विरोधी पक्षांच्या महिला उमेदवारांच्या समोर मिळमिळीतच होत्या. उरलेल्या ५ जागांवर संमिश्र यश जमेस धरले तरी ह्यावेळी तालुक्यात पक्षाला व पर्यायाने नानासाहेबांना जोरदार फटका पडणार असल्याचे जवळ जवळ निश्चित होते. सुनील पाटलाच्या रागाचे कारणही तेच होते. जवळच्या साथीदारांना सहजसाध्य मतदारसंघ रावेरचा होता व तोच सुहासच्या साडूला द्यावा लागलेला होता.प्रचाराचा शेवट जवळ येत होता. शेवटची रणधुमाळी सुरू होत होती. सभा गाजू लागलेल्या होत्या. गांवात शेवटच्या सभा नानासाहेब, राजेंद्र, सुनील व सुहासने ठरवल्या होत्या. पूर्ण ताकद शेवटच्या घावासाठी राखून ठेवण्यात येणार होती.***************************राजाभाऊंना झोपलेले पाहून घडलेला प्रकार उद्या सांगावा ह्या विचारांत सुरेखाताई बिछान्यावर पडल्या पण त्यांना झोप काही येईना. सारखा तो प्रसंग त्यांना आठवून दु:खाचे कढ येऊ लागले. महिलांच्या प्रश्नांवर तळमळीने बोलताना आपल्याशीही असा अतिप्रसंग होऊ शकेल ह्याची अस्पष्टशीही कल्पना त्यांनी केली नव्हती. राजाभाऊंना हे कळले तर संताप तर येईलच पण वाईटही वाटेल हे त्या चांगलेच जाणून होत्या. दोघांचेही चित्त विचलित होणार होते पण ह्याबद्दल गप्प बसणे त्यांना रुचत नव्हते. ह्या असह्य प्रकाराबद्दल काय करावे, कोणास सांगावे हे त्यांना सुचत नव्हते. राजाभाऊंना उठवून झाला प्रकार सांगावा असे त्यांच्या मनात आले पण त्यांना शांतपणे झोपलेले पाहून त्यांनी विचार बदलला.अचानक त्यांना एक अनोखी कल्पना सुचली. संतोषभाऊंच्या मुलीला प्रियाला हा प्रकार सांगितल्यास ती समजूनही घेईल व भावाची कान उघडणीही करील ह्या विचारात असतानाच थकलेल्या सुरेखाताईंना झोपेने घेरले.
वैशुला सांभाळण्यासाठी व वरच्या घरकामासाठी मध्यमवयीन बाई मिळाल्याने सासूबाईंचा बराचसा व्याप कमी झालेला होता. सकाळीच घरांतली आवराआवर व स्वयंपाक करून त्या प्रचारासाठी निघणार होत्या. राजाभाऊ भुसावळच्या प्रचारावर निघत ते दिवसाचे जेवण तेथेच करीत. राजाभाऊ गेल्यावर त्यांनी संतोषभाऊंकडे फोन लावला. वहिनींना फोनवर प्रियाशी काम असल्याचे सांगितले; प्रियाला आपल्या घरी येण्याचा आर्जव करीत त्यांनी फोन ठेवला तेव्हा त्यांना जरा बरे वाटले.प्रियाला अडखळत त्यांनी आदल्या रात्री घडलेला प्रकार सांगितला. तिलाही भावाचा संताप आलेला होता पण दोघींनी सध्या संतोषभाऊंना किंवा वहिनींना झालेला प्रकार न सांगता प्रियाने फक्त भावाची हजेरी घ्यावी असे ठरले.**************************शेवटच्या सभांना वासूभाऊ, विचारे साहेब, राजाभाऊ, भराडे बाई, संतोषभाऊ ह्या सगळ्यांची हजेरी असणार होती. शेवटच्या तीन दिवसांत तालुक्यातल्या वेगवेगळ्या सोळा ठिकाणी सभांचे आयोजन केलेले होते. त्यानंतर मात्र प्रचार संपणार होता व मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन मतांची भीक मागितली जाणार होती.ह्या शेवटच्या सभांपैकी एक सभा नानासाहेब पाटलांच्या वाड्यासमोर भरवण्यात आलेली होती. नानासाहेबांनी आपल्या सरपंचपदीच्या काळात मुलीच्या लग्नासाठी कडुनिंबांच्या दोन झाडांमध्ये हे पक्के व्यासपीठ बांधून घेतले होते ते अगदी वाड्याच्या समोर.व्यासपीठावरून बोलणारा माणूस पाटलांच्या पडवीतून स्पष्ट दिसे.... ह्याच स्टेजवर त्यांच्या दोघा पोरांनी अनेक वेळा तमाशातल्या बायकाही नाचवल्या होत्या.... नानासाहेबांच्या अनेक विजयी भाषणे येथूनच झालेली होती.... येथूनच अनेकांना शिक्षा सुनावण्यात आलेल्या होत्या..... अनेकांची घरेदारे उघड्यावर नेणारे निर्णय येथूनच घेण्यात आलेले होते.....
महिलांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना आज येथूनच तोंड फुटणार होते....नानासाहेब पाटलांची मावसं सून आज ह्याच व्यासपीठावरून खणखणीत बोलणार होती....तालुक्यातल्या एकाधिकारशाही व सरंजामशाही बद्दल आज एका 'तेजस्विनी'चा आवाज सर्वत्र घुमणार होता....
व्यासपीठासमोरच्या भल्यामोठ्या पटांगणावर यावलकरांची तोबा गर्दी जमलेली होती. भाजमो च्या शिस्तबद्ध कार्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे वगनाट्याचा प्रयोग सुरुवातीला सादर केला त्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जनजागृतीच्या व सुरेखाताईंच्या सभा चांगल्याच गाजलेल्या होत्या. आजच्या सभेसाठी प्रचंड जनसमुदाय जमलेला होता. वासुभाऊंपासून ते भराडे बाईंपर्यंत नेहमीची भाषणे झाली. सुरेखाताईंचे नांव पुकारण्यात आले व त्या तडफेने उभ्या राहिल्या.एक वेगळीच शांतता वातावरणात पसरली.आत्मविश्वासाने दमदार पावले टाकत सुरेखाताई माइक कडे चालू लागल्या.आपल्याच हाताने माइकची उंची स्वत:स साजेसी करीत व किंचित फुंकर मारून माइक चालू असल्याची खात्री करून त्या बोलू लागल्या......
"व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरहो, माझ्या प्रचारात राबणारे पक्ष कार्यकर्तेहो व माझ्या मतदार बंधुभगिनींनो, आपणांस आदरपूर्वक अभिवादन. ह्या व्यासपीठावरून हे भाषण सुरू करताना माझ्या भावना मी तुम्हांस कशा सांगू ?आपल्या गांवातली एक सून आज आपल्याजवळ स्वत:चे मनोगत मांडत आहे.खरंतर सुनेला उंबऱ्याच्या आंत ठेवण्यात प्रतिष्ठा समजली जाते....पण बंधुभगिनींनो, आपल्याच माणसांवर अत्याचार होत असतील तर कुठलीही सून गप्प बसून राहणारी नाही.घरातल्या गोष्टी ओट्यावर आणण्याची वेळ ह्या अत्याचारांमुळे आज आलेली आहे.....कितीही सासुरवास झाला तरी मुकाट्याने बसून सहन करण्याचे ते दिवस संपलेले आहेत......सुनाबाळींना गुलाम म्हणून वागवणाऱ्यांना जाब विचारण्याची वेळ आज आलेली आहे.....
ह्या पंचक्रोशीतल्या थोरामोठांच्या कथा मी सून म्हणून येथे येण्यापूर्वीपासून मला तोंडपाठ आहेत.स्वातंत्र्याच्या मुक्तिसंग्रामात गेलेले बळी, यावलच्या कोर्टावर तिरंगा फडकवणारे कलम केलेले हात आज आठवा.....इथल्या सुनाबाळींचे पांढरे कपाळ व अनाथ झालेल्या पोरांचे आक्रोश आज आठवा.....येथल्या उसळ्या घेणाऱ्या रक्तांना थांबवण्यासाठी जखमांमध्ये गादीतला कापूस काढून कोंबल्याच्या त्या कथा आठवा.....भारत पाक युद्धात शहीद झालेले ते यावलचे वीर जवान आठवा.....व आजच्या युगातला त्या अट्रावलला घडलेला तो घृणास्पद प्रकार आठवा......मला कधी वाटलेही नव्हते की, भारत स्वातंत्र्य होऊनही एका नव्या क्रांतीचा लढा मला येथून सुरू करावा लागेल !
माझ्या बंधुभगिनींनो मी शिक्षिका म्हणून माझा संसार सुखात करीत होते.....पण माझ्या सासरच्या माणसांवर होत असलेले हे अत्याचार मला उघड्या डोळ्यांनी पाहवेनात.माझ्या शिक्षणाचा फक्त शिक्षिका म्हणून फायदा झाला, तर उपयोग काय ?......शिक्षणाने सुसंस्कृतपणा नाही आला, तर त्या शिक्षणाचा उपयोग तो काय ?......ह्या गांवासाठी मला काही करता नाही आले, तर माझा ह्या गांवाला उपयोग काय ?......मी ह्या वणव्यात उडी घेतेय ती माझ्या सासरच्या माणसांवर होणाऱ्या अत्याचारांना तोंड फोडण्यासाठीच.....माझ्या भगिनींच्या प्रश्नांना तोंड फोडण्यासाठी.....येथली एकाधिकारशाही कायमची नष्ट करण्यासाठी.....
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण मिळाल्याने एक नवी संधी आपल्या सर्वांसमोर चालत आलेली आहे.हा हक्क आता फक्त मतदानापुरता नाही तर निवडणुका लढवून आपल्या समस्यांवर उत्तरे शोधण्याचा आहे....हा हक्क फक्त शेतात राबण्याचा नसून आपल्यावर अत्याचार करणाऱ्यांच्या पाठीवर आसूड ओढण्याचा आहे.....हा हक्क आपल्या अंगलटीला येणाऱ्या प्रत्येक मवाल्याच्या थोबाडीत देण्याचाही आहे.....
शेतात राबायचे, घरात राबायचे.धुणी-भांडी करायची, उष्टी-खरकटी काढायची.जेवायला समोर येईल ते उरले सुरलेले खायचे व नेसूला जे मिळेल त्याने आपली लाज झाकायची !हेच आजवर आपल्या गोरगरीब भगिनींना ठाऊक होते......पण आता मुलींच्या शिक्षणाचा सर्व भार सरकार उचलणार आहे.... त्यांना शाळा, महाविद्यालयांतून फी माफ करण्यात आलेली आहे,तेव्हा आता आपल्या मुलीला सुशिक्षित करणे हे प्रत्येक महिलेने आपले परम कर्तव्य समजावे.तिला भावंडे सांभाळत बसवण्यापेक्षा शाळेत पाठवून शिक्षण व चांगले संस्कार तिच्या बालमनावर घडवावे.
माझ्या भगिनींनो, महिलांना स्वयंरोजगारासाठी सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यांचा योग्य फायदा उचला.टंकलेखन मशीन, शिलाई मशीन, कांडप-गिरणी, पिको फॉल मशीन, एम्ब्रॉयडरी मशीन सारख्या मशीन सरकारतर्फे सबसीडी सह वाटल्या जातात. त्यावर प्रशिक्षण घेऊन स्वत:चा व कुटुंबाचा उदर निर्वाह सन्मानाने करता येतो त्याचा महिलांनी फायदा घ्यावा.गरीब व विधवा स्त्रियांच्या मुलींच्या लग्नासाठी अनुदान मिळते, मुलींना शिक्षणासाठी दूरवर जायचे असल्यास सायकल घेण्यासाठी अनुदान मिळते. सुर्यचुली, निर्धार चुली, खानावळ चालवण्यासाठी अनुदान, महिलांना मोफत चष्मे व विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन सरकार तर्फे करण्यात येते.
ह्या पूर्वीच्या सरपंचांनी व पंचायतीच्या अध्यक्षांनी अनुदाने स्वत:च्या खिशांत घातली त्याचा जाब आता मी त्यांना विचारणार आहे.....महिलांच्या नावाने पैशांची उचल करून तमाशाचे फड नाचवले त्याचे हिशेब आता त्यांना द्यावे लागणार आहेत......महिलांच्या अश्रूंचे मोल त्यांना येथेच द्यावे लागणार आहे.....
माझ्या भगिनींनो आता घाबरण्याचे कारण नाही..... आता आपल्या ह्या सख्या, आपल्या भगिनी आपल्यासाठी लढा देतील.आपल्या अन्यायाचा जाब विचारणारा पक्ष आज निर्माण झालेला आहे,तो आपले अश्रू वाया जाऊ देणार नाही त्याचे मोल आपल्याला मिळेलच.....'जनजागृती' पक्ष आपल्या सहकारी 'भाजमो' पक्षासोबत महिलांच्या प्रश्नांवर योग्य तोडगा काढील....ही मी माझ्या पक्षातर्फे आपल्याला ग्वाही देते.
ह्याच व्यासपीठावरून नानासाहेब पाटलांनी अनेक अन्याय केले.....येथल्या गरीब जनतेच्या जमिनी घशांत घालणारे निर्णय दिले.......निर्मल पाटलांना मारून रेल्वेखाली फेकण्याचे कट कारस्थान ह्याच ठिकाणी झाले.....येथेच तमाशातल्या बायका नाचवल्या तर गांवातल्या बायका नागवल्या गेल्या......गोरगरीबांना वाड्यावर बोलवून चाबकाने फोडण्यात आले, मुस्लिमांच्या घरादारांवरून नांगर फिरवले....ह्या गोरगरीबांवरच्या अत्याचारांचा व अश्रूंचा जाब आज मला हवाय.......अनेक शासकीय योजनांचे पैसे घशात घातले त्यांचा हिशेब मला हवाय......गोरगरीबांच्या जमिनी बळकावल्या, त्यांना देशोधडीला लावले त्याचा जाब मला हवाय.....
ह्या नानासाहेब पाटलांचे अत्याचारी राज्य संपवण्याचा आज निर्धार करा....ह्या तुळशीच्या बागेत उगवलेल्या गांज्याच्या रोपटाला उखडून फेकण्याचा निर्धार आज करा....जिल्हा परिषदांच्या निवडणूकीत 'जनजागृती' पक्षाच्या 'टांगा' ह्या निशाणीवर शिक्का मारून,विकास आघाडीला जोरदार 'धक्का' द्यायचा निर्धार आज करा....... ही माझी कळकळीची विनंती आहे.एवढे बोलून मी माझे भाषण संपवते.... जयहिंद ! जय महाराष्ट्र ! "
अखंड टाळ्यांच्या गजरासोबत 'सुरेखाताई झिंदाबाद, जनजागृती पक्षाचा विजय असो' अशा जोरदार घोषणा सुरू झाल्या.....
..........लांब कुठेतरी, एका दगडावर एकटे बसलेल्या वैद्य बुवांच्या डोळ्यांत आलेले आंनदाश्रू कुणी पाहिलेही नव्हते !

तेजस्विनी-११

"तुला लाज कशी नाही वाटली असले प्रकार करताना ? कमीत कमी आपल्या वडिलांच्या प्रतिष्ठेचा विचार तरी करायचा " प्रिया आपल्या भावाची बिनपाण्याने हजामत करत होती. समोर प्रियांक मान खाली घालून उभा होता. तर मालती वहिनी बेडच्या कोपऱ्यावर हताशपणे बसून मुलाकडे बघत होत्या. प्रियाने झाला प्रकार आईपासून लपवून न ठेवण्याचा निर्णय घेतला होता व ते एका अर्थी बरेच झाले होते. प्रियाला दुर्लक्षीत करण्याइतपत प्रियांकचे वय नक्कीच होते."जरा विचार कर; उद्या राजाभाऊंनी प्रियाला असली वागणूक दिली तर तुला कसे वाटेल " मालती वहिनी उसळून म्हणाल्या."सर असे वागायला, उकिरड्यावरचे शेण थोडंच खातात" प्रिया फणकाऱ्याने बोलली."आज पासून सुरेखा वहिनींच्या आजू बाजूने फिरकलास किंवा दुसऱ्या कुठल्याही बाईकडे मान वर करून बघितलेस तर घराबाहेर हाकलून देईन" मालती वहिनींनी त्याला बजावले."बाबांना कळले तर चाबकाने फोडून काढतील तुला.... असले प्रकार करण्यापेक्षा अभ्यासात लक्ष दे नाहीतर त्या पाटलांच्या पोरांसारखा नावारूपाला येशील" प्रिया लहान भावावर तोंडसुख घेत होती. दोघाही मायलेकींना प्रियांकने केलेल्या प्रकाराची लाज वाटत होती."तुझ्या ऐवजी आता मी जाऊन सुरेखाताईंची माफी मागणार आहे" मालती वहिनी बोलल्या."हो आई, तूच माफी माग म्हणजे त्यांना जरा धीर येईल व कळेलही की ह्या दिवट्याला आपण पाठीशी घालणार नाही ते " प्रिया म्हणाली."जा आता, तोंड काळ कर आमच्या समोरून" ह्या मालती वहिनींच्या वाक्यावर प्रियांकने मान खाली घालून चालायला सुरुवात केली.मालती वहिनींनी सुरेखा ताईंशी त्यावर बोलून त्यांची समजूत काढण्याचे ठरले व मग तो विषय तेथेच संपला होता.....एका स्त्रीला ह्या जगात कसले अनुभव घ्यावे लागतात ह्या विचारांनी प्रियाचे अंग नकळत शहारले.********************कालच्या दणदणीत सभे नंतर जाहीर सभांचा व प्रचाराचा काळ संपला होता. आचारसंहिता अजूनच कडकपणे राबवली जाणार होती. फक्त वैयक्तिक भेटीगाठींमार्फत प्रचार मोहीम राबवली जाणार होती. भा.ज.मो.च्या तरुण कल्पक कार्यकर्त्यांनी मात्र पथनाट्ये बसवून लोकांना मतदान करण्यास प्रवृत्त करायला सुरुवात केली होती. सुनील पाटलाने त्यावर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला परंतू हा 'कुठल्याही पक्षाचा प्रचार नसून, आम्ही मतदारांना उत्स्फूर्त मतदान करण्याचे आव्हान करीत आहोत' असे सांगून भा.ज.मो. ने त्या आक्षेपाची पार बोळवण करून टाकली.मतदार राजा सुज्ञ होता, कोणास काय म्हणायचे आहे, ते तो चांगलाच जाणून होता......
'आज विश्रांती घेऊ व थोडा वेळ वैशुला देऊ' असा विचार करून सुरेखाताई घरीच होत्या. भुसावळला आज शेवटची प्रचारसभा होती म्हणून राजाभाऊ प्रचारासाठी संतोषभाऊ व इतर कार्यकर्त्यांसोबत तिकडे गेले होते. गेल्या दहा बारा दिवसाची धावपळ आज जाणवत नव्हती म्हणून थोड्याश्या आळसावलेल्या सुरेखाताई घराच्या पायरीवर बसून अंगणात खेळणाऱ्या वैशुकडे पाहत होत्या."माज्या आईलाच मते द्या" असे बोबडे बोल बोलत ती आजूबाजूंच्या घरांसमोरून ओरडत जात होती. बरोबरीला दोन तीन समवयस्क पोरं, पोरी कार्यकर्ते म्हणून घेऊन तिचा रंगात आलेला खेळ त्या पाहत होत्या."सूनबाई, घरीच आहेस नां, तोवर मी पटकन शालूच्या आईकडे जाऊन येते" राजाभाऊंच्या आई म्हणाल्या."हो, मी चार पर्यंत घरीच आहे आज आई" त्यांनी संमतिदर्शक मान हालवतं म्हटले व स्वयंपाक पाण्याचा लवाजमा बघायला स्वयंपाक घराकडे मोर्चा वळवला तोवर सासूबाई बाहेर पडल्या होत्या.
दाराबाहेर रिक्शाचा आवाज आलेला पाहून सुरेखा ताई पदराला हात पुसत बाहेर आल्या व बघतात तर मालती वहिनी रिक्षावाल्याला पैसे देत बाहेर पाठमोऱ्या उभ्या होत्या. त्यांना पाहताच पटकन त्या बैठकीच्या खोलीतली आवराआवर करू लागल्या इतक्यात वैशुने त्यांच्याकडे जाऊन लाडेलाडे त्यांना 'माज्या आईला मतं द्या' चा नारा पुकारलेला त्यांनी ऐकला. हंसत हंसत त्या मालतीवहिनींच्या स्वागतासाठी दारापर्यंत गेल्या."काय सुंदर आणी दणदणीत भाषण केलेस तू सुरेखा काल, साफ दाणादाण उडवून लावली पाटलांची" मालती वहिनी कौतुकाने म्हणू लागल्या."आपले व संतोषभाऊंचे आशीर्वाद सार्थकी लागले म्हणायचे की," त्यांनी विनयाने म्हटले."माझे कसले आशीर्वाद घेऊन बसलीस, तू जात्याच हुशार; म्हणून छान बोललीस हो" वहिनींचा कौतुकाचा भर काही ओसरायला तयार नव्हता."बसा हं, मी पाणी आणते" त्या स्वयंपाकघराकडे जायला वळल्या. पाणी दिल्यावर "आज इकडे कसा दौरा वहिनी ?" सुरेखाताईंनी विचारले."खास तुला भेटायला आले; तुझी माफी मागायची होती" मालतीवहिनींच्या डोळ्यांत अपराधीपणा स्पष्ट दिसत होता.एक क्षण गोंधळून जाऊन सुरेखाताई त्यांच्याकडे बघतच राहिल्या."माझ्या कार्ट्याने जो अतिप्रसंग केला त्याबद्दल मी क्षमा मागते सुरेखा तुझी" मालती वहिनी दोन्ही हात जोडीत म्हणाल्या.काय बोलावे हे काही क्षण सुरेखाताईंना कळेचना...."प्रियांक कडून अशी अपेक्षा नव्हती त्यामुळे काय करावे हे मलाही कळेना वहिनी, त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर थोबाडीतच ठेवून दिली असती मी." त्या पटकन बोलल्या."तीच चूक केलीस सुरेखा तू, सर्वांसमक्ष दोन चढवून दिल्या असत्या तर बरं झालं असत" वहिनी म्हणाल्या."पण त्यामुळे प्रश्न सुटला नसता वहिनी; चिघळला असता. काही वेळा तरुण रक्ताला डिवचल्याने ते अजूनच उफाळून वर येते. प्रियाने एकटीने समजावले असते तरी बराच परिणाम झाला असता.""पण मला कळले हेही बरे झाले बाई, आपली मुले आपल्या अपरोक्ष बाहेर काय धंदे करतात हे घरात बसून कळणे कठीणच आहे" मालती वहिनी म्हणाल्या."वहिनी, तुमच्या जागी मी असते तरी माझीही अशीच अवस्था झाली असती. मलाही इतकेच वाईट वाटले असते....." सुरेखाताई त्यांना समजावण्याच्या सुरांत बोलल्या.मग थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून मालती वहिनी वारंवार माफी मागत घरी जायला निघाल्या.त्या गेल्यावर बराच वेळ सुरेखा ताई पायरीवर एकट्याच शून्यांत नजर लावून बसून होत्या.... एका मातेला तिने न केलेल्या गुन्ह्या बद्दल माफी मागायला लागल्याचे त्यांनाही दु:ख झाले होते. आजकालच्या सामाजिक अध:पतनाचे वैषम्य त्यांना चांगलेच जाणवून गेले.*************************************सुरेखा ताईंनी दुपारी वाड्यातल्या बायकांना जमवून गल्लीबोळांतून हळदी कुंकू लावण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. त्या निमित्ताने मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत आपला मतदारांशी संपर्क राहील अशी अटकळ त्यांनी बांधली होती. सायंकाळी उशीराने राजाभाऊ घरी परते पर्यंत बराचसा भाग त्यांनी पादाक्रांत केलेला होता.आजचा दिवस तर त्यांचा होता पण रात्र वैऱ्याची होती. रात्री धोका जास्त होता...... व तो झालाच !पैशांनी मत फोडण्यास सुरुवात झाली. घरोघर दारूच्या बाटल्या व पैशांची पाकिटे वाटली गेली. जळगांवहून आलेले राजेंद्र गाजरेंचे कार्यकर्ते रात्रभर मोठमोठ्या थैल्या घेऊन फिरत होते. संतोषभाऊंनी पोलिस स्टेशनला फोन लावला पण बोरसे साहेबांना तातडीच्या कामानिमित्त जळगांवला जावे लागल्याचे त्यांना फोनवर सांगण्यात आले. डिसीपी हेगडेंचा डाव उजवा पडल्याचे भाऊंच्या लक्षात आले. आता मतदार राजाच तो काय वाली असे समजून पक्षाचे सगळेच कार्यकर्ते गप्प बसले. सुरेखा ताईंचा राग मात्र आतल्या आत धुमसत होता.**************************************मतदानाचा दिवस उगवला.... केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या. आजचे मतदान थोडे जास्तच होणार असल्याच्या अटकळी पत्रकार लोक सकाळपासून करू लागले. खेड्यापाड्यांवरून समाधानकारक मतदान होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. काही ठिकाणी नानासाहेब पाटलांची मंडळी गटागटाने माणसांना बायांना मतदानासाठी घराबाहेर काढीत असल्याच्या बातम्या आल्या. काल परवा पर्यंत आपल्या सोबत असणारी असलेली आसपासची मंडळी आपली नजर चुकवत असल्याचा भास सुरेखाताईंना होऊ लागला. त्या मनातून घाबरल्या..... राजाभाऊंनाही बदलत्या परिस्थितीची जाणीव झाली, एक राजकीय निरीक्षक म्हणून ह्या सगळ्यांचा अर्थ त्यांना कळत होता. दिवसभर कुंद व विचित्र वातावरण पसरलेले होते.... मतदान शांततेत पार पडल्याच्या बातम्या सायंकाळी सह्याद्री वाहिनीवरून प्रदर्शित करण्यात आल्या. अट्रावलला होत असलेल्या मतदानावर डिसीपी हेगडे जातीने लक्ष ठेवून असल्याचा खास उल्लेख केला गेला तेव्हा सुरेखाताई उपहासाने व तुच्छतेने हसल्या.***********************************

तेजस्विनी-१२

मतमोजणी दोन दिवसांनंतर होती. तो दिवस उजाडला.आसपासच्या केंद्रांची मत मोजणी भुसावळच्या तहसीलदार कचेरीत होणार होती. सकाळपासून काही उत्साही कार्यकर्त्यांचा गट भुसावळला जाऊन ठेपला. राजाभाऊ इतर मंडळींबरोबर दुपारच्या सुमारास तेथे पोहचणार होते."काहीही झाले तरी घरा बाहेर पडू नकोस... वैशु व आईला सोडून अंगणाच्या बाहेरही पाय टाकू नकोस" अशी सक्त ताकीद राजाभाऊंनी सुरेखाताईंना दिलेली होती. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर अतिउत्साही कार्यकर्ते हरलेल्या उमेदवारांना कसल्या प्रकारची वागणूक देतात ह्याची त्यांना पूर्ण कल्पना होती.सुरेखाताई अस्वस्थ पणे घरातल्या घरांत फेऱ्या मारू लागल्या. दूरदर्शनाच्या मराठी वाहिनीवर मतदानासंदर्भात कुठल्याही बातम्या प्रदर्शित केल्या जात नव्हत्या. जळगांवच्या आकाशवाणीवरूनही फक्त मोघम बातम्याच दिल्या जात होत्या. मध्येच एखाद्या कार्यकर्त्यांचा गट आरडा ओरडा करीत पाटील वाड्याच्या दिशेने जाताना दिसे पण नेमके काय घडते ते कळायला मार्ग नसल्याने सुरेखाताई अजूनच अस्वस्थ होत होत्या. दुपारी अचानक बातमी थडकली.... शेजारच्या चव्हाणांच्या मुलाने मोहिनी इंगळे अडीच हजार मतांनी पुढे असल्याची बातमी चाचरत सुरेखाताईंना सांगितली.सुरेखाताईंना पायाखालची जमीन थरथरत असल्याचा भास झाला."अशक्य... केवळ अशक्य, जी बाई कधी व्यासपीठावर भाषणासाठी उभी राहिली नाही ती पुढे जाणेच अशक्य आहे." त्या म्हणाल्या."काकू, त्या पाटलांना काहीच अशक्य नाही हो...... त्यांनी उमेदवार म्हणून माणूसच नव्हे तर बैल उभा केला तरी लोक मतं त्यालाच देतील." चव्हाणांचा मुलगा त्यांची समजूत काढण्याच्या सुरांत म्हणाला.इतक्यात पाटील वाड्यासमोर फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली व सुरेखाताईंच्या छातीत धस्स झाले."सुनील पाटलांचा अठराशे मतांनी विजय झाला. विचारे साहेब हरले" कोणीतरी बातमी आणली.सुरेखाताई मटकन खाली बसल्या. त्यानंतर काय होतंय, त्यात त्यांना रस राहिलेलाच नव्हता. घराचा दरवाजा बंद करून त्या माजघरात जाऊन पलंगावर पडल्या. 'मरो.... समाजालाच माझी गरज वाटत नाही तर मी का मारावं ह्या मेंढरांसाठी' नकळत एक निरीच्छा त्यांच्यात निर्माण झाली.
इतक्यात एकाएकी रस्त्यातला गोंधळ त्यांना ऐकू आला.... सुनील पाटलाच्या विजयाने चेकाळलेला एक गट बाहेर रस्त्यावर हुल्लडबाजी करीत होता....."घाला त्या रां*च्या घरावर दगड" कुठूनतरी आवाज आला."चौधरीची र*ल, बाहेर नीघ... हरलीस तर तोंड लपवतेस का ?" कोणीतरी गर्दीतला बोलला.ही वाक्ये ऐकून सुरेखाताईंच्या तळपायाची आग मस्तकात गेली. विजेच्या चपळाईने दार उघडून त्या बाहेर आल्या."कोणाला रखेल म्हणतोस रे बेशरमा.... तुझ्या मायन तुला ह्यासाठीच जन्माला घातला का ?" दोन चार टाळक्यांकडे रोखून बघत त्यांनी सरळ प्रश्न केला.त्या रणमर्दानीचा आवेश पाहून पुढे उभे असलेले पाठ फिरवून पळ काढू लागले.... मागचे हळूहळू मागे सरकायला लागले..."कोणाची माय व्याली दगड घालायला त्येच पाह्त्ये मी पण" शेलक्या भाषेत व ओचे पदर खोचून त्या पुढे सरकल्या..... इतक्यात शेजारचे चव्हाण स्वत: बाहेर आले. "जाऊ द्या वैनीताय ह्या माणसांची डोस्की फिरलीत.... जा रे बाबा घरच्याला, तुमची काय दुश्मनी हाय ताईंशी ?" त्यांच्या ह्या वाक्याने थोडी पांगापांग झाली. इतक्यात शाळेत येणारे दोन चार नेहमीचे चेहरे गर्दीत सुरेखाताईंना दिसले."काय सोनावणे ? शाळेत भेटायला लाज वाटत होती का ?" त्यांनी सरळ प्रश्न केला तसा सोनवणे नांवाचा तो गृहस्थ "नाय मास्तरीण बाई म्या तर ह्यान्सी समजवायले आल्तू " असं बोलत मागच्या मागे कटला.
इतक्यात दोघे भाजमो चे कार्यकर्ते मोटर सायकलवर तेथे आले."जनजागृती पक्षाचा विजय असो.... सुरेखाताईंचा विजय असो..... ताई, सातशे मतांनी विजयी झाल्या..." अशी आरोळी ठोकत ते बोलले.... ते बोलत असतानाच एका पाठोपाठ एक पाच सात मोटरसायकलींवरून भाजमो व जनजागृती पक्षाचे कार्यकर्ते तेथे पोहचले.काय चाललंय ते सुरेखा ताईंना कळेचना.... हसावे की रडावे हे कळण्याच्याही मन:स्थितीबाहेर त्या होत्या.जनजागृती पक्षाच्या एका कार्यकर्त्याने आणलेली फटाक्यांची माळ ताईंच्या घरासमोर लावली गेली. लांबलचक फटाक्यांची माळ संपेपर्यंत मघाशी आलेला हुल्लडबाज्यांचा तो गट मागच्या मागे सटकला. फटाक्यांच्या आवाजाने आजूबाजूच्या घरादारांतून शेजारी मंडळी हळूहळू बाहेर पडू लागली. तोवर जनजागृती पक्षाचे भुसावळहून परतलेले बरेचसे कार्यकर्ते तेथे जमा झालेले होते. अभिनंदनाचा वर्षाव सुरेखाताईंवर सुरू झाला.एका शेजारणीने पंचारतीचे ताट करून आणले. अंगणाच्या बाहेरच गल्लीत सुरेखाताईंना ओवाळण्याची स्पर्धा महिलांमध्ये लागली.थोड्याच वेळांपूर्वी धटिंगणांच्या दडपशाही समोर नतमस्तक झालेले आपले शेजारी ते हेच का हा प्रश्न सुरेखाताईंना पडला.कोणीतरी आणलेला पेढ्यांचा बॉक्स उपस्थितांमध्ये वाटला जात होता. शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून वैशुचे कोडकौतुक सुरू होते, सासूबाईंच्या डोळ्यांतली एक कौतुकाची झाक सुरेखा ताईंना सुखावून गेली.एका कार्यकर्त्याने त्याचा मोबाईल ताईंच्या हाती दिला. संतोषभाऊ फोनवर अभिनंदन करीत होते. तातडीने दूध महासंघाच्या कार्यालयात पोहचण्याचा आदेश घेत त्यांनी फोन बंद केला तेव्हा आपण राजाभाऊंबद्दल विचारले नाही ह्याची रुखरूख त्यांना लागून गेली. दूध महासंघाच्या कार्यालयातून विजयी उमेदवारांची मिरवणूक निघत असल्याचे त्यांना एकाने सांगितले.******************************************कपडे बदलून व ठेवणीतली साडी नेसून त्या कार्यकर्त्यांसोबत वैशुला घेऊन दूध महासंघाच्या कार्यालयात जायला निघाल्या. तेथे पोहचल्यावर बऱ्याच कार्यकर्त्यांचा घोळका खाली जमा झाला असल्याचे त्यांनी पाहिले. घोळक्यांतून वाट काढत व अभिनंदनाचा वर्षाव स्वीकारत त्या वैशुला कडेवर घेऊन पुढे सरकत होत्या. त्यांच्या मागे त्यांच्या व पक्षाच्या नांवाचा जयजयकार होत होता.सभागृहात विजयी उमेदवारांसह बरेच कार्यकर्ते जमा झालेले दिसत होते. एकच गलबलाट तेथे उडाला होता. देसाई साहेब सगळ्यांना शांत करण्याचा अपयशी प्रयत्न करत होते. बराच वेळ तर काय घडले आहे ते कळायलाच मार्ग नव्हता. थोडी शांतता निर्माण होताच देसाई साहेबांनी जमावाचा ताबा घेतला. माइक वरून सभागृहात व बाहेर उभ्या असलेल्या करकरत्यांशी संपर्क साधून त्यांना निकाल ऐकण्यासाठी शांत राहण्याचे आवाहन केले गेले.तोवर परत एक गलका बाहेर ऐकू आला...... संतोषभाऊ उर्वरित गटासह भुसावळहून परत आलेले होते. ते वर पोहचे पर्यंत त्यांच्या, विजयी उमेदवारांच्या व पक्षाच्या नावाचा अखंड जयघोष सुरू होता.थोड्याच वेळांत शांतता प्रस्थापित करण्यात देसाई साहेबांना यश आले तेव्हा कुठे खरा निकाल हाती लागला.सुनील पाटलाने विचारे साहेबांचा फक्त सत्तर मतांनी पराभव केलेला होता.हा पराजय अगदी काठावर असल्याने सगळ्यांनाच त्याची प्रचंड रुखरुख लागून गेली.वासूभाऊंनी फेगडेंवर दणदणीत साडेसात हजारांनी विजय मिळवला होता.मोहिनी इंगळेचा पराभव सुरेखाताईंनी सहाशे सत्त्याण्णव मतांनी केलेला होता. ह्यांत खरा पराजय सुनील पाटलाचा होता.
अट्रावलातून अपेक्षेप्रमाणे इंदुताई भराडे विजयी झाल्या होत्या. निंभोऱ्याच्या निर्मला वहिनी व इंदुताई दोन हजारांवर मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. माळी वहिनींना निवडणूक जड गेली होती. त्यांचा मोठा पराभव अगदी अनपेक्षित होता. सावद्याला पैसे चरून मते फोडण्याचे प्रकार झालेले होते. संतोषभाऊंनी त्याबद्दल आयोगाकडे रीतसर तक्रार नोंदवली होती व म्हणूनच त्यांना यायला उशीर झालेला होता.सर्वात कमालीचा निकाल लागला तो रावेर मतदार संघातून... भाजमो च्या नवख्या अजय फालकने सुहास पाटलाच्या साडूला चारी मुंड्या चीत केले होते. तरुणांनी राजकारणात अनुभवी माणसाला हरवण्याचा हा लोकशाहीतला पहिला प्रसंग नव्हता.वरणगांव मतदारसंघातून सुनील पाटलाचा उमेदवार जेमतेम काठावर पास झाला होता, तो अवघ्या सव्वाशे मतांनी.चिनावलहून भाजमो चेच राठी नांवाचे सद्गृहस्थ विजयी झाले होते.तर जामनेर मतदारसंघातून दोन्ही पक्षांचा पराजय करीत अपक्ष उमेदवार महेश भिरूड विजयी झालेला होता. त्याचे त्या विभागातले कार्य संतोषभाऊंसारखेच असल्याचे म्हटले जात होते. फैजपूरहून अजून एका अपक्षाने बाजी मारली होती. तेथेही भाजमो व आघाडीच्या दोघा उमेदवारांचा पराभव झालेला होता.
यावल सर्कल मधून निवडणुका भाजमो व जनजागृतीने जिंकलेल्या होत्या. झेड.पी च्या ११ व ग्रामपंचायतीच्या १३ अश्या एकंदर २४ जागांवरून युतीचे ६ व ७ असे तेरा सदस्य निवडून आलेले होते. सभागृह आता युतीच्या ताब्यात राहणार होते. दोघा अपक्षांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकांतून दिलेला पाठिंबा सार्थ ठरला होता. जामनेर व फैजपूरच्या झेड.पी. च्या जागांवरून पूर्ण पाठिंबा मिळाला असता. फक्त ७ जणांचा विरोध सभागृहात होणार होता. सर्कल मधून विकास आघाडी पक्षाची जोरदार पीछेहाट झालेली होती.ह्या बारीक सारीक घटनांना राज्य पातळीवर फार महत्त्व दिले जाई कारण ज्याच्या हाती ग्रामपंचायत व जिल्हा पंचायतींचे राज्य..... त्या पक्षाच्या हाती राज्याची सत्ता असणार होती.ह्या निवडणुकांमधील विजयामुळे संतोषभाऊंची विधानसभेतली जागा जवळपास नक्की झालेली होती......
"मला तर बाई हा तेरा आकडा अशुभ वाटतो" भराडे बाई सुरेखाताईंना म्हणाल्या."काळजी करू नका..... सावद्याला फेरमतदान झाले तर तिथली जागा आपण जिंकूच" ह्या सुरेखाताईंच्या वाक्यावर त्या अचंबित होऊन त्यांच्या तोंडाकडेच पाहत राहिल्या.
यावलची सुनील पाटलाची, वरणगांवातली व सावद्यातली पैसे चरून जिंकलेली एक अश्या एकूण फक्त तीन जागांवर नानासाहेबांचे उमेदवार आलेले होते.बाकी सर्व ठिकाणी युतीने गड जिंकला होता.येत्या विधानसभा निवडणुकांत पारडे कुणीकडे झुकणार त्याचीच ही नांदी होती.ह्यावेळचा झेडपी अध्यक्ष कोण असेल त्यासाठी भल्याभल्यांना संतोषभाऊंच्या दारच्या पायऱ्या घासाव्या लागणार होत्या.
विजयी उमेदवारांची वाजत गाजत मिरवणूक निघाली तेव्हा पाटील वाड्यावर सुतकी अवकळा पसरलेली होती.************************************************