Saturday, March 10, 2007

तेजस्विनी-११

"तुला लाज कशी नाही वाटली असले प्रकार करताना ? कमीत कमी आपल्या वडिलांच्या प्रतिष्ठेचा विचार तरी करायचा " प्रिया आपल्या भावाची बिनपाण्याने हजामत करत होती. समोर प्रियांक मान खाली घालून उभा होता. तर मालती वहिनी बेडच्या कोपऱ्यावर हताशपणे बसून मुलाकडे बघत होत्या. प्रियाने झाला प्रकार आईपासून लपवून न ठेवण्याचा निर्णय घेतला होता व ते एका अर्थी बरेच झाले होते. प्रियाला दुर्लक्षीत करण्याइतपत प्रियांकचे वय नक्कीच होते."जरा विचार कर; उद्या राजाभाऊंनी प्रियाला असली वागणूक दिली तर तुला कसे वाटेल " मालती वहिनी उसळून म्हणाल्या."सर असे वागायला, उकिरड्यावरचे शेण थोडंच खातात" प्रिया फणकाऱ्याने बोलली."आज पासून सुरेखा वहिनींच्या आजू बाजूने फिरकलास किंवा दुसऱ्या कुठल्याही बाईकडे मान वर करून बघितलेस तर घराबाहेर हाकलून देईन" मालती वहिनींनी त्याला बजावले."बाबांना कळले तर चाबकाने फोडून काढतील तुला.... असले प्रकार करण्यापेक्षा अभ्यासात लक्ष दे नाहीतर त्या पाटलांच्या पोरांसारखा नावारूपाला येशील" प्रिया लहान भावावर तोंडसुख घेत होती. दोघाही मायलेकींना प्रियांकने केलेल्या प्रकाराची लाज वाटत होती."तुझ्या ऐवजी आता मी जाऊन सुरेखाताईंची माफी मागणार आहे" मालती वहिनी बोलल्या."हो आई, तूच माफी माग म्हणजे त्यांना जरा धीर येईल व कळेलही की ह्या दिवट्याला आपण पाठीशी घालणार नाही ते " प्रिया म्हणाली."जा आता, तोंड काळ कर आमच्या समोरून" ह्या मालती वहिनींच्या वाक्यावर प्रियांकने मान खाली घालून चालायला सुरुवात केली.मालती वहिनींनी सुरेखा ताईंशी त्यावर बोलून त्यांची समजूत काढण्याचे ठरले व मग तो विषय तेथेच संपला होता.....एका स्त्रीला ह्या जगात कसले अनुभव घ्यावे लागतात ह्या विचारांनी प्रियाचे अंग नकळत शहारले.********************कालच्या दणदणीत सभे नंतर जाहीर सभांचा व प्रचाराचा काळ संपला होता. आचारसंहिता अजूनच कडकपणे राबवली जाणार होती. फक्त वैयक्तिक भेटीगाठींमार्फत प्रचार मोहीम राबवली जाणार होती. भा.ज.मो.च्या तरुण कल्पक कार्यकर्त्यांनी मात्र पथनाट्ये बसवून लोकांना मतदान करण्यास प्रवृत्त करायला सुरुवात केली होती. सुनील पाटलाने त्यावर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला परंतू हा 'कुठल्याही पक्षाचा प्रचार नसून, आम्ही मतदारांना उत्स्फूर्त मतदान करण्याचे आव्हान करीत आहोत' असे सांगून भा.ज.मो. ने त्या आक्षेपाची पार बोळवण करून टाकली.मतदार राजा सुज्ञ होता, कोणास काय म्हणायचे आहे, ते तो चांगलाच जाणून होता......
'आज विश्रांती घेऊ व थोडा वेळ वैशुला देऊ' असा विचार करून सुरेखाताई घरीच होत्या. भुसावळला आज शेवटची प्रचारसभा होती म्हणून राजाभाऊ प्रचारासाठी संतोषभाऊ व इतर कार्यकर्त्यांसोबत तिकडे गेले होते. गेल्या दहा बारा दिवसाची धावपळ आज जाणवत नव्हती म्हणून थोड्याश्या आळसावलेल्या सुरेखाताई घराच्या पायरीवर बसून अंगणात खेळणाऱ्या वैशुकडे पाहत होत्या."माज्या आईलाच मते द्या" असे बोबडे बोल बोलत ती आजूबाजूंच्या घरांसमोरून ओरडत जात होती. बरोबरीला दोन तीन समवयस्क पोरं, पोरी कार्यकर्ते म्हणून घेऊन तिचा रंगात आलेला खेळ त्या पाहत होत्या."सूनबाई, घरीच आहेस नां, तोवर मी पटकन शालूच्या आईकडे जाऊन येते" राजाभाऊंच्या आई म्हणाल्या."हो, मी चार पर्यंत घरीच आहे आज आई" त्यांनी संमतिदर्शक मान हालवतं म्हटले व स्वयंपाक पाण्याचा लवाजमा बघायला स्वयंपाक घराकडे मोर्चा वळवला तोवर सासूबाई बाहेर पडल्या होत्या.
दाराबाहेर रिक्शाचा आवाज आलेला पाहून सुरेखा ताई पदराला हात पुसत बाहेर आल्या व बघतात तर मालती वहिनी रिक्षावाल्याला पैसे देत बाहेर पाठमोऱ्या उभ्या होत्या. त्यांना पाहताच पटकन त्या बैठकीच्या खोलीतली आवराआवर करू लागल्या इतक्यात वैशुने त्यांच्याकडे जाऊन लाडेलाडे त्यांना 'माज्या आईला मतं द्या' चा नारा पुकारलेला त्यांनी ऐकला. हंसत हंसत त्या मालतीवहिनींच्या स्वागतासाठी दारापर्यंत गेल्या."काय सुंदर आणी दणदणीत भाषण केलेस तू सुरेखा काल, साफ दाणादाण उडवून लावली पाटलांची" मालती वहिनी कौतुकाने म्हणू लागल्या."आपले व संतोषभाऊंचे आशीर्वाद सार्थकी लागले म्हणायचे की," त्यांनी विनयाने म्हटले."माझे कसले आशीर्वाद घेऊन बसलीस, तू जात्याच हुशार; म्हणून छान बोललीस हो" वहिनींचा कौतुकाचा भर काही ओसरायला तयार नव्हता."बसा हं, मी पाणी आणते" त्या स्वयंपाकघराकडे जायला वळल्या. पाणी दिल्यावर "आज इकडे कसा दौरा वहिनी ?" सुरेखाताईंनी विचारले."खास तुला भेटायला आले; तुझी माफी मागायची होती" मालतीवहिनींच्या डोळ्यांत अपराधीपणा स्पष्ट दिसत होता.एक क्षण गोंधळून जाऊन सुरेखाताई त्यांच्याकडे बघतच राहिल्या."माझ्या कार्ट्याने जो अतिप्रसंग केला त्याबद्दल मी क्षमा मागते सुरेखा तुझी" मालती वहिनी दोन्ही हात जोडीत म्हणाल्या.काय बोलावे हे काही क्षण सुरेखाताईंना कळेचना...."प्रियांक कडून अशी अपेक्षा नव्हती त्यामुळे काय करावे हे मलाही कळेना वहिनी, त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर थोबाडीतच ठेवून दिली असती मी." त्या पटकन बोलल्या."तीच चूक केलीस सुरेखा तू, सर्वांसमक्ष दोन चढवून दिल्या असत्या तर बरं झालं असत" वहिनी म्हणाल्या."पण त्यामुळे प्रश्न सुटला नसता वहिनी; चिघळला असता. काही वेळा तरुण रक्ताला डिवचल्याने ते अजूनच उफाळून वर येते. प्रियाने एकटीने समजावले असते तरी बराच परिणाम झाला असता.""पण मला कळले हेही बरे झाले बाई, आपली मुले आपल्या अपरोक्ष बाहेर काय धंदे करतात हे घरात बसून कळणे कठीणच आहे" मालती वहिनी म्हणाल्या."वहिनी, तुमच्या जागी मी असते तरी माझीही अशीच अवस्था झाली असती. मलाही इतकेच वाईट वाटले असते....." सुरेखाताई त्यांना समजावण्याच्या सुरांत बोलल्या.मग थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून मालती वहिनी वारंवार माफी मागत घरी जायला निघाल्या.त्या गेल्यावर बराच वेळ सुरेखा ताई पायरीवर एकट्याच शून्यांत नजर लावून बसून होत्या.... एका मातेला तिने न केलेल्या गुन्ह्या बद्दल माफी मागायला लागल्याचे त्यांनाही दु:ख झाले होते. आजकालच्या सामाजिक अध:पतनाचे वैषम्य त्यांना चांगलेच जाणवून गेले.*************************************सुरेखा ताईंनी दुपारी वाड्यातल्या बायकांना जमवून गल्लीबोळांतून हळदी कुंकू लावण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. त्या निमित्ताने मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत आपला मतदारांशी संपर्क राहील अशी अटकळ त्यांनी बांधली होती. सायंकाळी उशीराने राजाभाऊ घरी परते पर्यंत बराचसा भाग त्यांनी पादाक्रांत केलेला होता.आजचा दिवस तर त्यांचा होता पण रात्र वैऱ्याची होती. रात्री धोका जास्त होता...... व तो झालाच !पैशांनी मत फोडण्यास सुरुवात झाली. घरोघर दारूच्या बाटल्या व पैशांची पाकिटे वाटली गेली. जळगांवहून आलेले राजेंद्र गाजरेंचे कार्यकर्ते रात्रभर मोठमोठ्या थैल्या घेऊन फिरत होते. संतोषभाऊंनी पोलिस स्टेशनला फोन लावला पण बोरसे साहेबांना तातडीच्या कामानिमित्त जळगांवला जावे लागल्याचे त्यांना फोनवर सांगण्यात आले. डिसीपी हेगडेंचा डाव उजवा पडल्याचे भाऊंच्या लक्षात आले. आता मतदार राजाच तो काय वाली असे समजून पक्षाचे सगळेच कार्यकर्ते गप्प बसले. सुरेखा ताईंचा राग मात्र आतल्या आत धुमसत होता.**************************************मतदानाचा दिवस उगवला.... केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या. आजचे मतदान थोडे जास्तच होणार असल्याच्या अटकळी पत्रकार लोक सकाळपासून करू लागले. खेड्यापाड्यांवरून समाधानकारक मतदान होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. काही ठिकाणी नानासाहेब पाटलांची मंडळी गटागटाने माणसांना बायांना मतदानासाठी घराबाहेर काढीत असल्याच्या बातम्या आल्या. काल परवा पर्यंत आपल्या सोबत असणारी असलेली आसपासची मंडळी आपली नजर चुकवत असल्याचा भास सुरेखाताईंना होऊ लागला. त्या मनातून घाबरल्या..... राजाभाऊंनाही बदलत्या परिस्थितीची जाणीव झाली, एक राजकीय निरीक्षक म्हणून ह्या सगळ्यांचा अर्थ त्यांना कळत होता. दिवसभर कुंद व विचित्र वातावरण पसरलेले होते.... मतदान शांततेत पार पडल्याच्या बातम्या सायंकाळी सह्याद्री वाहिनीवरून प्रदर्शित करण्यात आल्या. अट्रावलला होत असलेल्या मतदानावर डिसीपी हेगडे जातीने लक्ष ठेवून असल्याचा खास उल्लेख केला गेला तेव्हा सुरेखाताई उपहासाने व तुच्छतेने हसल्या.***********************************

No comments: