Saturday, March 10, 2007

तेजस्विनी-९

"दाजी औंदाच्या झेडपी मेंबरच्या इलेक्शनची ह्यो यादी तयार हाय" सुहास पाटलाने नानासाहेबांना सांगितले."सुनिलरावांना दावली का?" नानासाहेब न बघताच बोलले. "त्यांन्सी काय दावायची ?" सुहास चाचरत बोलला.मग मोठ्या पाटलांना वर्तमान पत्रातून डोकं वर काढावंच लागलं. "का दावायची म्हंजी ? निवडणूकीला सुनिलराव उभं राहणार, आन उमेदवारांची यादी त्यांनी न्हाय बगायची तर कुणी बगायची""तसं न्हाय दाजी, नेमीचेच तर उमेदवार हाईत त्यात बगायच काय असं म्या म्हनत हुतो" सुहास सारवासारव करायला लागला."तुमची यादी माज्या जवळ दिऊन ठेवा. मी पाहतो काय करायच त्ये." अखेरीस ते बोलले. सुहासला तिकडून निघून जाण्याचा तो संदेश होता."आता जे झालं त्यावर गपगुमान इचार करा सुहासराव, घिसडघाई करून कामं नका करत जाऊ, अखेरच निक्सून सांगतोय" मोठ्या पाटलांनी त्याला बजावले. "मोठ्या दिलानं सुनिलरावांची साथ संगत करा, ही निवडणूक जिंकून दावा मग मी समदं ठीक करतो" नानासाहेब बोलले.सुहासने मान हालवत जेमतेम होकार दिला तेव्हा त्याच्या डोळ्यांत अपराधीपणाची भावना नानासाहेबांना जाणवली."सुहासराव असे कमजोर नका पडू, मी सांगतो तुमच्या भल्यासाठी; त्यावर वाईट वाटून घेण्याऐवजी अंमल केलात तर जग जिंकाल...." नानासाहेबांनी त्याला धीर दिला. " ....तुमच्या माणसांपैकी कुनाला सदस्य बनवायच कबूल केलं हाय का तुमी?""व्हय दाजी, रावेरचे माझे साडू यंदा मागे लागलेत" त्याने हळूच सांगितले."इतकंच असेल तर त्ये काम माज्यावर सोपवा, बाकी यादी सुनिलरावांना बनवू द्या" नानासाहेब घरातही राजकारणाचे डाव व्यवस्थित खेळत. 'धाकटा सुनील मला एक दिवस बाजारात विकून येईल. मोठा सुहास फाड आहे पण मनाचा सरळ आहे' हे त्यांचे लाडके मत होते.सुनीलला बोलावले असल्याचा निरोप सांगून ते परत वाचनांत गढले. सुनील आल्यावर त्याला फक्त 'उमेदवारांची यादी तयार करून मला दुपारच्याला आणून द्या' असा हुकूम देऊन ते बैठकीवरून उठत दिवसभराच्या इतर कामांना लागले.******
संतोषभाऊ सहकार्यांबरोबर मुंबईहून परतले ते आंबट गोड बातम्या घेऊनच. तालुक्यातल्या काही जागा भा.ज.मो. ला द्याव्या लागणार होत्या तर संतोषभाऊंना विधानसभेसाठी भा.ज.मो.चे समर्थन व शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचे साहाय्य मिळणार होते. ज्या जागांवर 'जनजागृती'चे उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी तेथल्या जागा संतोषभाऊंनी भा.ज.मो. ला देऊ केल्या होत्या. पण फिरकेंची, शेळके मास्तरांची व रावेरची प्रतिष्ठेच्या लढतीची जागा हातातून गेली होती. शेळके मास्तरांची समजूत काढता काढता वासुभाऊंना नाकी नऊ आले होते.
आज पंचायतीच्या निवडणुकांच्या अर्जांवर सह्या व अनुमोदनाचा कार्यक्रम पार पडणार होता. सगळे जण दूध महासंघाच्या कार्यालयांत पोहचले तेव्हा साडे दहा वाजत आलेले होते. सुरेखा ताईंना आज रजा टाकावी लागलेलीच होती. संतोषभाऊ, वासूभाऊंसह शेकडो कार्यकर्ते वाजत गाजत मिरवणुकीने तहसीलदार कार्यालयांत पोहचले. देसाई साहेबांनी त्यापूर्वीच तेथे जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांकडून वेळ ठरवून घेतलेली होती.मिरवणूक तहसीलदार कार्यालयांत पोहचताच सुरेखाताईंना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. राजाभाऊ जातीने तेथे हजर होते. सकाळी घाईघाईत 'बेस्ट लक' इतकंच म्हणून बाहेर पडलेले राजाभाऊ आपण अर्ज भरताना आपल्या सोबत असावेत असे सुरेखा ताईंना मनापासून वाटत होते. पण कॉलेजातली लेक्चर्स सोडून ते इतर कुठलेही कामे त्यावेळेत करणार नाहीत ह्याची खात्री असल्याने उगीच अपशकून नको म्हणून त्या बोलल्या नाहीत.महिलांचे अर्ज सर्व प्रथम देण्यात आले. तालुक्यातली महिला उमेदवार म्हणून सुरेखाताईंचा अर्ज सर्वप्रथम पुढे करण्यात आला तेव्हा "मनुदेवी मात की जय" हा तालुक्यातल्या ग्रामदैवतेच गजर कार्यकर्त्यांनी केला.मनातल्या मनांत विघ्नहर्त्या गणेशाचे नांव घेत व अर्जावर सही करीत सुरेखा ताईंनी आपल्या राजकीय जीवनाचा शुभारंभ केला.सगळ्यांचे अर्ज भरून झाल्यावर मनुदेवीच्या डोंगरावरील मंदिरात वासुभाऊंच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. मनुदेवीचा आशीर्वाद घेऊन आजपासूनच प्रचाराची सुरुवात व जंगी सभेचे आयोजन करण्यात आलेले होते.
सायंकाळची प्रचाराची जंगी सभा बाजार वार्डातल्या मोठ्या चौकात भरणार होती. कधी प्रजासक्ताक दिनाच्या भाषणालाही हजेरी न लावलेली सुरेखा नावाची शालीन सुशिक्षित तरुणी, एका कन्येची माता, सुविद्य प्राध्यापकाची सुविद्य पत्नी, घरातल्या वरिष्ठांची आज्ञाधारक स्नुषा... मुलगी आज राजकीय व्यासपीठावर पक्षाच्या व स्वत:च्या प्रचारासाठी एका खुर्चीत अंग चोरून बसली होती.देसाई साहेबांच्या प्रस्तावने नंतर लगेच संतोषभाऊंनी भाषणाला सुरुवात केली. यावल तालुक्यातल्या आजवरच्या समस्या व विरोधकांनी केलेली जनतेची फसवणूक ह्यावर त्यांनी जोरदार भाषण केले. टाळ्यांच्या गजरात ते खाली बसले तोवर ते नेमके काय काय बोलले हे आठवण्याच्या मन:स्थितीतही सुरेखाताई नव्हत्या.मान्यवर व वयोवृद्ध वासुभाऊंचे भाषण नेहमीच श्रोत्यांना भावे. तालुक्यातच लहानाचे मोठे झालेले वासुभाऊ अविवाहित होते. अनाथालयातून वाढलेल्या वासुभाऊंना 'खडकू' भाऊ म्हणूनही ओळखत. एक एक पैशाचे, ज्याला गावात खडकू म्हणतं, दान घेत त्यांनी गावाच्या विकासासाठी व खास करून शाळेसाठी निधी उभारला होता. दिवसांतून फक्त एक वेळा जेवण्याचा आजन्म संकल्प त्यांनी अनाथालयात असतानाच घेतला होता. त्यांच्या भाषणांतून गरीब व पिचलेल्या लोकांसाठीची त्यांची तळमळ दिसून आली. त्यांनी वर्णन केलेल्या प्रसंगांनी सुरेखाताईच नव्हे तर बऱ्याच उपस्थितांच्या डोळ्यांच्या पापण्या ओलावल्या.भराडे बाईंचे भाषण आवेशपूर्ण होते परंतू त्याचा सर्व भर नानासाहेब पाटील व त्यांची मुले ह्यावर दिलेला होता. स्वत:च्या भाषणातून पाटलांचा करता येईल तितका पाणउतारा त्यांनी करून घेतला. झोपडपट्टी वासीयांची ही कैवारीण त्यांचे प्रश्न मांडत असताना स्वत:ला मिळणारा प्रतिसाद बघून अजून चेतावत होती. मोठ्या आवेशात तिचे भाषण संपले.हळूहळू ज्येष्ठ कार्यकर्त्यांची भाषणे संपताच, नांव पुकारले गेले सुरेखाताईंचे.गांवातली भोळी जनता समोर बसलेली होती.... कोणी दगडावर, कोणी वाड्याच्या भिंतीवर तर कोणी गच्चीच्या कठड्यावर.... महिला वर्ग कुणाच्या ओट्यावर बसला होता तर कोणाच्या दरवाज्यातल्या उंबरठ्यावर..... कुठल्या तरी दरवाज्याआडून एखादा शालीन पदर डोकावून बघत होता तर कुठे कोणी आई आपल्या रडणाऱ्या पोराला गप्प बसण्यास सांगत होती. सगळेच जण कुतूहलाने आज ही मास्तरीण बाई काय बोलणार हे ऐकायला जीवाचे कान करून बसले होते.सुरेखाताईंना दरदरून घाम फुटला. शाळेत मुलांना शिकवणे व व्यासपीठावरून भाषण देणे ह्यातला फरक आज त्यांना कळला. पदराने कपाळावरचे घर्मबींदू टिपत व उसने आणलेले धैर्य दाखवत त्या माइक समोर जाऊन उभ्या राहिल्या. उंचाड्या विचारे साहेबांचे भाषण नेमके त्यांच्या आधीच झालेले होते म्हणून माइकची उंची व सुरेखाताईंची उंची मेळ खात नव्हती. हे लक्षात येताच माइक वाल्या पोऱ्याने विविध आवाज काढत माइक त्यांना साजेसा केला. तोवर निःशब्द शांतता सर्वदूर पसरलेली होती.
"व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर........" पाच ते सात मिनिटांत त्यांनी आपले भाषण संपवले तेव्हा आपली कानशिले गरम झाल्याचा भास त्यांना होत होता. मर्यादित टाळ्या वाजल्या पण बऱ्याच कौतुकांच्या नजरा त्यांच्यावर रोखल्या गेल्या असल्याचे त्यांना जाणवले.
"आज माझं भाषण कसं झालं हो ?" रात्री बिछान्यावर पडल्या पडल्या त्यांनी राजाभाऊंना विचारले."छान झालं, काळजी करण्याचे कारणच नाही." आश्वस्तपणे राजाभाऊ बोलले."मी भाषणांत काय काय बोलली हो ?" सुरेखाताईंनी त्यांना पुढे विचारले.त्यांच्या ह्या वाक्यावर डोळ्यांतून पाणी येईपर्यंत राजाभाऊ खळखळून हसत होते....बाबा हसताहेत म्हणून वैशुही आनंदाने टाळ्या पिटत नाचून हसू लागली.....सुरेखाताईंना आपल्याच लोकांसमोर मेल्याहून मेल्यासारखे झाले !********************************************************भाषणाबाबत शाळेत सहकार्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत होत्या."छान भाषण केलंस हो पोरी..... आता ह्यापुढे थोडी तयारी करून व्यासपीठावर जात जा. राजाभाऊंकडून मुद्दे लिहून घ्यायचे - पण पूर्ण भाषण स्वत: तयार करायचे" थोडक्यातच वैद्यबुवांनी स्वत:ची प्रतिक्रिया दिली. तेव्हा मोहिनीची प्रतिक्रिया काय मिळेल ह्या विचारांतच सुरेखा ताई होत्या.मोहिनी हेडमास्तरांच्या खोलीतच डेरा घालून बसलेली असे. वर्गात फळ्यावर मुलांना "हे वहीत उतरवून घ्या' असं सांगून ती हेडमास्तरांच्या खोलीत जाऊन बसे. मधल्या सुटीत मोहिनीशी भेट झाली."मला तर बाई ह्या राजकीय भाषणांचा कंटाळाच येतो. माझ्या ऐवजी पक्षातले कोणीतरी भाषण ठोकेलच की व्यासपीठावर...." इतकीच प्रतिक्रिया तिची होती.शाळेत राजकारणावर बोलायचे नाही असा सगळ्यांचा पण पहिल्या दिवशीच तुटला. आपल्यातलीच दोघींपैकी एक सहकारीण झेडपी सदस्य होणार म्हटल्यावर असले संकल्प तडीस नेणे शाळेतल्या शिक्षकांनाही कठीण जाणार होते.*****************प्रचाराला हळूहळू जोर चढत चालला होता. भिंती रंगवणे, पोस्टर्स लावणे, पत्रके वाटणे ही कामे तरुण कार्यकर्ते जोमाने करीत होती. प्रियाला सोबत घेत सुरेखा ताईंच्या नाक्यानाक्यावर छोट्या बैठका होत होत्या. स्त्रियांना घरात आतवर जाऊन सुरेखा ताई भेटून येत होत्या. 'दादा, वहिनी, ताई, भाऊ, अक्का, माई, नाना, दाजी असली सगळी विशेषणे चपखलपणे वापरता येऊ लागलेली होती. बोलण्यातली सफाई वाढत होती. शब्दांना धार येत होती. राजाभाऊंनी लिहून दिलेले मुद्दे त्या विस्तृत करीत चांगले भाषण देऊ लागल्या होत्या. महिलांच्या प्रश्नांवर हिरीरीने बोलत होत्या.
यावलला लागून असलेल्या भुसावळ तालुक्यात भा.ज.मो.च्या जास्त जागा होत्या. जनजागृतीने फक्त एक दोघा अपक्ष उमेदवारांना समर्थन जाहीर केले होते पण त्यांचे स्वत:चे उमेदवार उभे केलेले नव्हते. भुसावळ तालुक्यातल्या भा.ज.मो.च्या उमेदवारांना उत्साह व समर्थन मिळावे म्हणून संतोषभाऊ तेथल्या सभांना नियमित जाऊ लागले.इथल्या सभा कधी वासूभाऊ, विचारे साहेब, तर कधी शेळके मास्तर, भराडे बाईंबरोबर गाजत होत्या. भराडे बाईंच्या अट्रावलातल्या दोन्ही सभांना जोरदार प्रतिसाद मिळालेला होता, ह्यापुढे अट्रावलात सभा घ्यायची आवश्यकत: त्यांना पडणारच नव्हती. त्यांची जागा ह्या निवडणूकीत नक्की झाल्यातच जमा होती. निर्मला ताई व माळी वहिनींनाही चांगलाच प्रतिसाद मिळत होता. ह्यापूर्वी असलेली राजकीय पार्श्वभुमी त्यांना मदतीची ठरत होती. गांवात प्रचार सभांच्या हजेरीवरून अटकळी बांधल्या जात होत्या. सुरेखा ताईंच्या जागेबद्दल मात्र कोणीच काही बोलायला तयार नव्हते.*****************************

No comments: